IND vs PAK World Cup 2023 : दर चार वर्षांनी होणारा वनडे वर्ल्डकप यंदा भारतात होत आहे. यापूर्वी 2011 मध्ये भारताने वनडे वर्ल्डकपचे आयोजन केले होते. त्यावेळी भारत सह आयोजक होता. मात्र वर्ल्डकपचे सर्व सामने भारतातच खेळवले जाणार आहेत. 45 दिवस चालणाऱ्या या मेगा इव्हेंटसाठी बीसीसीआयने जय्यत तयारी केल्याचा प्रचार करण्यात आला. त्यात भारताने 2011 चा मायदेशात झालेला वर्ल्डकप जिंकला होता.
यंदा टीम इंडियाने 2011 ची पुनरावृत्ती करावी अशी आस क्रिकेट चाहते बाळगून आहेत. मात्र बीसीसीआयच्या डोक्यात फक्त भारत - पाकिस्तान सामन्याचीच आर्थिक, राजकीय गणितं पक्की बसली आहेत. या फायद्याच्या गणितासाठी संपूर्ण वर्ल्डकपचा खेळखंडोबा झाला आहे.
जय शहांच गंडलेलं प्लॅनिंग
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सुपूत्र जय शहा हे बीसीसीआयचे सचिव आहेत. त्यामुळे हा मोठा इव्हेंट व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी ही त्यांच्याच खांद्यावर होती. मात्र आयोजकांनी सामन्याच्या वेळापत्रकापासून ते स्टेडियमच्या स्वच्छतेबाबत निष्काळजीपणाचा कळस गाठला आहे. आधी तिकीट बुकिंगची क्लिष्ट पद्धत पाहून चाहत्यांची भावना ही रॉकेलसाठी लागलेली भल्या पहाटेची रांग बरी मात्र बुक माय शोचा खेळ नको अशी झाली होती.
इथंच क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला. बीसीसीआय वर्ल्डकपचा माहोल तयार करण्यात सपशेल गंडली आहे. भारतात वर्ल्डकप सुरू आहे याची जाणीव व्हावी असं काहीही आजूबाजूला घडत नाहीये.
फक्त आणि फक्त अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील भारत - पाकिस्तान सामन्यावरच बीसीसीआयने आपले लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्टपणे जावणत आहे. मात्र बीसीसीआयचा हा अट्टाहास प्रेक्षकांना फारसा रुचलेला दिसत नाहीये.
पाकिस्तानवरच जीव ओवाळून टाकलाय?
विशेष म्हणजे वर्ल्डकपपूर्वीचा उद्घघाटन सोहळा देखील ऐनवेळी रद्द करण्यात आला. त्यानंतर बीसीसीआयने उद्घाटन सोहळा होणार नव्हता असे सांगत सर्वांना मोठा धक्का दिला. उद्घाटन सोहळ्याऐवजी भारत - पाकिस्तान सामन्यापूर्वी भर दुपारी 'सुगम' संगिताचा अन् बॉलीवूड नाईटचा फक्कड बेत आखण्यात आला आहे.
सहसा असे कार्यक्रम हे स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापूर्वी किंवा स्पर्धा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी आयोजित केले जातात. मात्र बीसीसीआयने हा कार्यक्रम भारत - पाकिस्तान सामन्यापूर्वी आयोजित केला. हा बदल बीसीसीआयने का केला? याचे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
वर्ल्डकपमध्ये भारत - पाकिस्तान हा फोकल पॉईंट असतो. भारताने आतापर्यंत पाकिस्तानचा 7 वेळा पराभव केला आहे. भारताला भारतात पराभूत करणं तितकं सोपं नसतं. म्हणजेच या वर्ल्डकपमध्ये देखील पाकिस्तानचा पराभव होणार हे जवळपास निश्चित आहे. यावरच आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सामन्याचे ठिकाण, गायन कार्यक्रम, पाकिस्तान संघाचं जंगी स्वागत या सर्व गोष्टी ठरवून केल्या आहेत.
बीसीसीआय राबवतंय भाजपचा अजेंडा?
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम हे तसं नवं स्टेडियम आहे. मात्र इंग्लंड - न्यूझीलंड यांच्यातील पहिल्याच सामन्यात तेथील पक्षांच्या विष्ठेने माखलेल्या खुर्च्या पाहून बीसीसीआयची पर्यायाने भारताताचीच नाचक्की झाली. बीसीसीआयला याचं काही पडलं नव्हतं कारण इतर संघांच्या सामन्यात काही 'फायदा' नाही.
भारत - पाकिस्तान सामना अहमदाबादमध्येच खेळवण्याचा देखील मोठा अट्टाहास करण्यात आला. यासाठी संपूर्ण वेळापत्रकामध्ये बदल झाला. तिकीट विक्री लांबली, तिकीट विक्रीत गोंधळ झाला जो अजूनपर्यंत निस्तरता येत नाहीये.
यामुळे वर्ल्डकपची हाईप तयार व्हायला हवी होती ती काही झाली नाही. भारत - पाकिस्तान सामना हा वर्ल्डकपचा फोकल पॉईंट असतो. मात्र तो फक्त या दोन देशांसाठीचा मुद्दा आहे. त्यासाठी इतर संघांना खिजगणतीतच न धरणं हे कितपत योग्य आहे.
टीम इंडियाचं भगवीकरण?
बीसीसीआयने टीम इंडियाच्या जर्सीसाठी अदिदासशी नुकताच करार केला. त्यानंतर भारतीय संघाच्या जर्सीचं आणि प्रॅक्टिस कीटचं डिझाईन नुकतंच बदलण्यात आलं होतं. मात्र वर्ल्डकपसाठी मुख्य जर्सीसोबतच प्रॅक्टिस कीट देखील बदलण्यात आलं.
ब्लीड ब्लू असं ब्रीदवाक्य असलेल्या टीम इंडियाच्या प्रॅक्टिस जर्सीचा रंग भगवा करण्यात आला. यावरून बीसीसीआयचा हेतू हा काही शुद्ध आहे असं वाटत नाही.
आयसीसीचा वर्ल्डकप हा चार वर्षांनी होतो. भारतात त्याचं आयोजन तब्बल 12 वर्षांनी होतंय. त्यातही आपण हे शिवधनुष्य एकट्याने पेलण्याचा 'नुसता' निर्धार केला. आपलं लक्ष फक्त पाकिस्तानवरच होतं. ज्या पाकिस्तानच्या नावाने रोज गळे काढणारे आपण आता त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतोय. आजूबाजूला नृत्याविष्काराचा नुमाना पेश करतोय. हे सर्व काशासाठी करतोय?
क्रिकेटची पंढरी पळवण्याचा प्रयत्न फसला?
भारतातील क्रिकेटची पंढरी म्हणून वानखेडे स्टेडियम ओळखलं जातं. मुंबईतील क्रिकेट कल्चर पाहिलं तर तिथे फक्त भारत - पाकिस्तान सामन्याला गर्दी होत नाही तर इतर चांगल्या संघातील चांगल्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी देखील दर्दी क्रिकेट रसिक मैदानात उपस्थिती लावतात.
मात्र यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्व महत्वाचे सामने हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम म्हणून शेखी मिरवणाऱ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. मात्र पहिल्याच इंग्लंड - न्यूझीलंड सामन्यात तेथील क्रिकेट कल्चर सर्वांसमोर आलं.
गतविजेत्या आणि उपविजेत्यांचे रिकाम्या खुर्च्यांनीच स्वागत झालं. त्यामुळे मैदानाची साईज नाही तर तेथील क्रिकेटिंग कल्चर हे त्या ठिकाणाला क्रिकेटची पंढरी बवनतं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.