Women's T20 World Cup : महिला टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलिया-विरुद्धच्या उपांत्य फेरीत भारताला एकहाती विजय मिळवून देणारी घणाघाती फलंदाजी करत असताना कर्णधार हरमनप्रीत कौरची बॅट क्रिजच्या अगोदरच अडकली आणि ती ५२ धावांवर धावचीत झाली. तेथेच सामन्याचे पारडे फिरले... माझे अशा प्रकारे धावचीत होणे यापेक्षा मोठे दुर्दैव नाही, अशी खंत आणि निराशा हरमनप्रीतने व्यक्त केली.
आजारी असल्यामुळे हरमनप्रीत या महत्त्वपूर्व सामन्यात खेळणार नव्हती, तरीही जिद्द पणाला लावून ती मैदानात उतरली. २० षटके क्षेत्ररक्षण केल्यानंतर आणि स्मृती मानधना-शेफाली वर्मा अपयशी ठरल्यानंतर हरमनप्रीत एकाकी लढून विजय आवाक्यात आणत होती. अखेरपर्यंत ती मैदानात राहिली असती तर भारताला विजयाची अधिक संधी होती; परंतु १५ व्या षटकात दुर्दैवाचा हा फेरा तिच्या बॅटमध्ये अडकला.
असे घडले नाट्य...
हरमनप्रीत दुसरी धाव पूर्ण करत होती, क्रिजपर्यंत ती पोहचलीही होती; परंतु बॅट जमिनीवरून पुढे नेत असताना बॅट तेथेच अडकून राहिली आणि हरमनप्रीत धावचीत झाली. त्यावेळी भारताला ३३ चेंडूंत ४१ धावांची गरज होती. अखेर हा सामना भारताने पाच धावांनी गमावला. भरवशाच्या सलामीवीरांनी निराशा केल्यानंतर हरमनप्रीतने जेमिमा रॉड्रिग्जसह ४१ चेंडूंत ६९ धावांची भागीदारी करून भारताच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या.
यापेक्षा दुसरे कोणतेच दुर्दैव असू शकत नाही. जेमिमाच्या साथीने आम्ही सामना भारताच्या बाजूने झुकवला होता. अशा स्थितीनंतर सामना गमावणे हे धक्कादायकच होते. मोठे आव्हान असले तरी आम्ही डगमगलो नाही, दिलेला लढा आमच्यासाठी महत्त्वाचा होता. अखेरच्या चेंडूपर्यंत आम्ही लढलो याचे समाधान आहे, असे मत हरमनप्रीतने सामन्यानंतर व्यक्त केले.
आव्हान कितीही असले तरी अखेरपर्यंत प्रयत्न करायचे हे आम्ही ठरवले होते. स्मृती आणि शेफाली लवकर बाद झाल्या तरी आपल्याकडे चांगली फलंदाजी आहे. त्यामुळे आपण लढू शकतो, हा विश्वास होता. अशा परिस्थितीनंतर सामन्याची सूत्रे आमच्या हाती आणणारी फलंदाजी जेमिमाने केली, असे हरमनप्रीत म्हणाली.
सुमार क्षेत्ररक्षणाचा फटका
सोडलेले झेल आणि सुमार मैदानी क्षेत्ररक्षण याचाही फटका बसल्याचे हरमनप्रीतने सांगितले. बेथ मुनीचा झेल शेफालीने सोडला. त्यावेळी ती ३२ धावांवर होती. त्यानंतर तिने ५३ धावा केल्या. एका धावेवर असताना ऑस्ट्रेलिया कर्णधार मेग लॅनिंगला यष्टिचीत करण्याची संधी सोडली. त्यानंतर तिने नाबाद ४९ धावा केल्या.
यातून बोधच घेऊ शकतो!
प्रतिस्पर्धी कोण आहे, याचा विचार करण्यापेक्षा आपला नैसर्गिक खेळ करायचा हे आम्ही ठरवले होते. त्यातून काहींनी आपला खेळ उंचावला; पण सोडलेल्या संधीने पाणी फेरले. अशा प्रकारच्या मोठ्या सामन्यात विजय मिळवायचे असतील तर प्रत्येक संधीचे सोने करावे लागते, या सामन्यातून आम्ही केवळ आता बोधच घेऊ शकतो, असेही हरमनप्रीत काहीशा निराशेच्या स्वरात म्हणाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.