Ind vs Aus WTC Final 2023 : सहा बाद १५२ अशी गटांगळ्या खाणारी स्थिती त्यात फॉलोऑनची घोंघावणारी नामुष्की अशा संकटात सापडलेल्या भारतीय संघाची लाज अजिंक्य रहाणे (८९) आणि शार्दुल ठाकूर (५१) यांनी राखली; तरीही भारतीय संघ १७३ धावांनी पिछाडीवर पडला. त्यानंतर जागतिक कसोटी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी ४ बाद १२३ अशी मजल मारली.
सामन्याचे दोन दिवस शिल्लक असताना ऑस्ट्रेलिया आता एकूण २९६ धावांनी पुढे आहे. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी सुधारणा केली, तरीही ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व कमी करता आले नाही.
तिसऱ्या दिवशीच्या खेळाची सुरुवात खराब झाली, जेव्हा भरत बोलंडच्या आत येणाऱ्या चेंडूवर बोल्ड झाला. ऑस्ट्रेलियन संघाला भलीमोठी आघाडी मिळवायची स्वप्न पडू लागली असताना शार्दूल ठाकूर रहाणेला सह फलंदाजी करू लागला. दोघांच्यात सामंजस्यामुळे पळून धावा काढण्याबरोबर दोघे फलंदाज कडक फटकेही मारू लागले. दोघांना नशिबाची साथ लाभली. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर दोघेही पायचित होते, जेव्हा दोनही चेंडू नोबॉल दिले गेले. दोन झेलही सुटले. लढाऊ बाण्याच्या दोघा फलंदाजांनी त्याचा फायदा उठवत रचलेली भागीदारी लक्षणीय होती.
रहाणे आणि शार्दुल ठाकूरला बऱ्याच वेळा अचानक उसळणाऱ्या चेंडूचे आघात झाले, तरीही दोघे वेदना सहन करून लढत राहिले. उपाहाराला ६ बाद २६० धावसंख्येवर रहाणे ८९ आणि शार्दुल ठाकूर ३६ धावांवर नाबाद परतले होते. उपाहारानंतर रहाणेला पॅट कमिन्सने बाद केले, तेव्हा कॅमरून ग्रीनने अफलातून झेल पकडला. अजिंक्यचे शतक हुकले तेव्हा प्रेक्षक हळहळले. रहाणे बाद झाल्यावर शार्दुल ठाकूरने पॅट कमिन्सला दोन चौकार मारत अर्धशतक साजरे केले.
आपला तो बाळ्या...
भारतात कसोटी सामना चालू असताना जर चेंडू भसकन वळाला, तर बरेच परदेशी टीव्ही कॉमेंटेटर्स लगेच टीकेचा सूर लावतात. चालू सामन्यात अगदी पहिल्या दिवशीपासून एका बाजूला फलंदाजी करताना चेंडू अचानक उसळतो आहे. मार्नस लबुशेन, अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूरसह अजूनही काही फलंदाजांना अशाच अचानक उसळणाऱ्या चेंडूचे आघात बोटांवर हातावर सहन करावे लागले असले, तरी कोणाही परदेशी समालोचक त्याबाबत चकार शब्द काढला नाही. हीच गोष्ट सुनील गावसकरांना खटकते.
परदेशात कसोटी सामना चालू असताना चेंडू जास्त स्विंग झाला, की उसळी घेऊ लागला, तर अशा वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीला खिलाडू नाव दिले जाते आणि भारतात फिरकीला साथ मिळू लागली, तर टीका केली जाते, हा दुटप्पीपणा असल्याचे मत सुनील गावसकरांनी उघड बोलून दाखवले.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया, पहिला डाव ः ४६९
भारत, पहिला डाव ः ६९.४ षटकांत सर्वबाद २९६ (रोहित शर्मा १५, गिल १३, पुजारा १४, विराट कोहली १४, अजिंक्य रहाणे ८९, जडेजा ४८, केएस भरत ५, शार्दुल ठाकूर ५१, शमी १३, मिशेल स्टार्क ७१-२, पॅट कमिंस ८३-३, बोलँड ५९-२, कॅमेरून ग्रीन ४४-२). ऑस्ट्रेलिया दुसरा डाव ः४ बाद १२३ (मार्नस लाबुशेन ४१, स्टीव स्मिथ १८, सिराज ४१-१, उमेश यादव २१-१, जडेजा २५-२)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.