Ind vs Aus WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर जाऊन दोन कसोटी मालिका आम्ही जिंकल्या आहेत. त्यामुळे ते आम्हाला कधीही हलक्यात घेणार नाहीत, हा दरारा आम्ही निर्माण केला आहे, असा विश्वास भारताचा हुकमी खेळाडू विराट कोहलीने व्यक्त केला आहे.
भारतीय संघाने २०१८-१९ आणि २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकून मालिका विजयाचा गावसकर-बॉर्डर करंडक आपल्याकडेच सन्मानाने राखला आहे.
दोनदा पराभूत केल्याचा परिणाम
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी द्वंद्व संघर्षपूर्ण असायचे. वातावरणातही तणाव असायचा, मात्र ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात जाऊन दोनदा पराभूत केल्यानंतर हे द्वंद्व आमचा आदर वाढवण्यात रूपांतरित झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ आम्हाला कधीही दुर्लक्षित करणार नाही, असे विराट म्हणतो.
जेव्ह जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतो तेव्हा तेव्हा हा आदर दिसून येतो. आता आमच्यातील ही लढत समान पातळीवरची झाली आहे. पूर्वी तणापूर्व वातावरण निर्माण केले जायचे, पण जेव्हा आपण तोडीस तोड खेळ करतो तेव्हा कोणताही प्रतिस्पर्धी तुमच्याबद्दल आदरच बाळगतो, असे विराटने सांगितले.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रामुख्याने कसोटी सामन्यात विराट कोहली नेहमीच तडफेने खेळताना दिसून येतो. वर्चस्वाची एकही संधी तो सोडत नाही. ऑस्ट्रेलियाच्या सर्व ११ खेळाडूंची मानसिकता मला माहीत आहे. ते तसूभरही कमी पडत नाहीत; मात्र त्यांची ही वृत्ती मला अधिक त्वेषाने खेळण्यास प्रोत्साहित करते. त्यामुळे माझाही खेळ वेगळ्या उंचीवर जातो, असे विराट आवर्जून म्हणतो.
जागतिक कसोटी अंतिम सामन्याबाबत विराट स्वतःची मानसिकता अधिक बळकट करत आहे. हा सामना होणारे ओव्हल मैदान दोन्ही संघांसाठी अपयशी ठरलेले आहे. ओव्हलचे मैदान आव्हानात्मक असणार, तेथे पाटा खेळपट्टी नसणार त्यामुळे फलंदाजांना सावध राहावे लागणार आहे. आम्हाला शिस्तबद्ध फलंदाजी करावी लागणार आहे, असे विराटने सांगतले.
याबाबत सविस्तर बोलताना विराट म्हणाला, अशा आव्हानात्मक परिस्थितीत अनुभव पणास लावावा लागणार आहे. ओव्हलचे मैदान नेहमी असते तसे आत्ताही असेल असा ग्रह करणे चुकीचे ठरेल. त्यामुळे सावध राहून परिस्थितीनुसार मानसिकतेतही बदल करावा लागणार आहे. दोघांसाठी हे तटस्थ मैदान आहे. जो संघ लवकर याच्याशी समरस होईल त्याला वर्चस्वाची संधी असेल.
तेव्हा खेळवले होते दोन फिरकी गोलंदाज
२०२१ मध्येही झालेल्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात खेळण्याची संधी भारताला मिळाली होती, परंतु न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. परिस्थिती वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असताना भारताने दोन फिरकी गोलंदाज खेळवण्याची चूक त्या वेळी केली होती. वेगवान गोलंदाजीसाठी उपयुक्त असलेल्या परिस्थितीत धावा करणे आणि चांगल्या चेंडूंना सन्मान देणे, याचा समतोल साधणे महत्त्वाचे असते असे मत विराटने व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.