विशाखापट्टणम : क्रिकेट विश्वातील अनुभवी फिरकी गोलंदाज आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी इंग्लिश फलंदाजांना स्वीप आणि रिव्हर्स स्वीपने नामोहरम केले. त्यांच्या या खेळाला चतुराईने उत्तर द्यावे लागेल, असे मत भारतीय फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांनी व्यक्त केले. त्याच वेळी फॉर्म हरपलेल्या शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांचीही पाठराखण केली.
भारतीय फिरकीवर स्वीप आणि रिव्हर्स स्वीपचे अस्त्र वापरून इंग्लंड संघाने हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला. त्यांचा नववा-दहाव्या क्रमांकावरील फलंदाजही या दोन फटक्यांचा वापर करत होता.
स्वीप किंवा रिव्हर्स स्वीपचे फटके एका रात्रीत तयार होत नसतात. त्यासाठी अगोदरपासून सराव करावा लागतो. आपल्या खेळात असे वैविध्यपूर्ण फटके आणले तर ते फायदेशीरच असतात; परंतु आम्ही पारंपरिक खेळावर भर दिला आहे, पायाचा वापर अधिक करून खेळणे असा आपला खेळ आहे, असे राठोर यांनी सांगितले.
शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही इंग्लंडचे फलंदाज या फटक्यांचा वापर करणार हे उघड आहे. त्यासाठी आम्हाला हुशारीने खेळ करावा लागेल, असेही राठोर म्हणाले. एकीकडे इंग्लिश फलंदाज भारतीय फिरकी माऱ्याला निष्प्रभ करण्यासाठी वेगवेगळ्या फटक्यांचा प्रयत्न करत आहेत,
पण त्याच वेळी भारताचे शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरसारखे भरवशाचे फलंदाज साफ निराशा करत आहेत, याचाही फटका पहिला कसोटी सामना गमावण्यात बसला. पण राठोर यांनी त्यांची पाठराखण केली. या दोघांबाबत संयम राखायला हवा, असे ते म्हणतात.
गेल्या नऊ कसोटी डावांत गिलला अर्धशतक करता आलेले नाही, तर अय्यरने आपले अखेरचे कसोटी शतक दोन वर्षांपूर्वी झळकावलेले आहे.
हैदराबाद येथील कसोटीतील दुसऱ्या डावात आपल्या फलंदाजांनी बेजबाबदार खेळ केला. प्रत्येकाने आपले ध्येय समोर ठेवून फलंदाजी करायला हवी होती. संयम महत्त्वाचा आहेच, पण धावा करणे हे फलंदाजाचे सर्वात मोठे कर्तव्य आहे. शेवटी तुम्ही धावफलकावर किती धावा नोंदविल्या याचीच गणती केली जाते, अशा शब्दांत राठोर यांनी आपल्या फलंदाजांची कानउघाडणीही केली.
केएल राहुलच्या रिकाम्या झालेल्या जागेवर रजत पाटीदार किंवा सर्फराझ खान यापैकी एकाला संधी द्यावी लागणार आहे; परंतु या दोघांतून एकाची निवड करणे हे खरोखरीच आव्हानात्मक आहे, असे राठोर म्हणाले. दोघेही कसोटीसाठी नवखे आहेत; परंतु देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्यांनी भरपूर धावा केलेल्या आहेत. त्यातून एकाची निवड करण्याची वेळ आली तर ती डोकेदुखी असेल. शेवटी हा निर्णय रोहित आणि राहुल द्रविड यांना घ्यावा लागेल, असेही ते म्हणाले.
विशाखापट्टणमच्या खेळपट्टीचे भाकीत आताच करणे कठीण आहे. चेंडू कदाचित पहिल्या दिवसापासून फिरक घेणार नाही; परंतु तो उत्तरोत्तर फिरक घेणार, असे सध्या तरी वाटत आहे, असे राठोर यांनी सांगितले.
आक्रमक वृत्ती आणि ध्येयशक्ती असे दोन प्रकार असतात. आपल्या खेळाडूंनी ध्येयशक्तीला प्राधान्य देऊन खेळ करावा आणि धावा करण्याची संधी असेल तेथे निश्चितच फटकेबाजी करावी.
- विक्रम राठोर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.