धरमशाला : उत्तम खेळपट्टी त्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. तीन बाद १७५ अशी सुरुवातही केली; पण इंग्लंड संघाने भारतीय फिरकीसमोर शरणीगती स्वीकारली. २१८ धावांत त्यांच्या पहिल्या डावाचा खेळ खल्लास झाला. त्यानंतर भारतीयांनी एक बाद १३५ धावा करून पाचव्या कसोटी सामन्यावर पहिल्याच दिवशी पकड मिळवली.
धरमशालामधील याच मैदानावर सात वर्षांपूर्वी कसोटी पदार्पण करणाऱ्या कुलदीप यादवने पाच तर शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या अश्विनने चार विकेट मिळवून इंग्लंड फलंदाजांना शरण आणले. अवघ्या ४३ धावांत इंग्लंडचे सात फलंदाज बाद केले. त्यानंतर रोहित शर्मा (नाबाद ५२) आणि यशस्वी जयस्वाल (५७) यांनी शतकी सलामी देऊन त्यावर कळस चढवला.
पहिल्या काही षटकात भारतीय वेगवान गोलंदाजांनी टाकलेले आणि फलंदाजांनी न खेळता सोडून दिलेले चेंडू यष्टीरक्षक जुरेल गुडघ्याखाली पकडत होता. याचाच अर्थ खेळपट्टीवर चेंडूला उसळी कमी मिळत असल्याचे दिसले. तरीही बुमराने काही चेंडू अफलातून स्वींग केले. झॅक क्रॉली अनेक वेळा खेळताना चकला; पण काही केल्या चेंडूने बॅटची कड पकडली नाही.
बुमरासोबत सिराजनेही उजव्या यष्टीबाहेरची दिशा पकडून गोलंदाजी केली, ज्याने आक्रमक फलंदाजी करणाऱ्या बेन डकेटला जास्त हालचाल करता आली नाही. पुढे पडलेल्या चेंडूवर कडकडीत चौकार मारणाऱ्या क्रॉलीने धावफलक हलता ठेवला.
सलामीच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी पार केल्यावर रोहित शर्माने कुलदीप यादवला गोलंदाजीला आणले. बराच काळ शांत खेळणे डकेटला झेपले नाही. कुलदीपला मोठा फटका मारताना डकेटचा झेल उडाला जो शुभमन गिलने पळत जात सूर मारत घेतला.
उपहाराअगोदर क्रॉलीने कडक ड्राईव्हज् मारायचे आपले कसब दाखवत अर्धशतकी मजल गाठली होती. उपहाराला काही मिनिटे बाकी असताना ओली पोप कुलदीपला जरा जास्तच अगोदर खेळायला पुढे सरसावला.
हुशार कुलदीपने मग गुगली टाकला जो टप्पा पडून बाहेर वळाला आणि टपून बसलेल्या जुरेलने पोपला यष्टीचीत केले. उपहारानंतर ७८ धावांवर क्रॉलीला जीवदान लाभले, ज्याचा जास्त तोटा सहन करावा लागला नाही. कुलदीपच्या चेंडूवर क्रॉली ७९ धावांवर त्रिफाळाचीत झाला.
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला जॉनी बेअरस्टो १००वी कसोटी खेळत होता. त्याने पहिल्या चेंडूपासून एकदम आक्रमक पवित्रा घेतला. दोन चौकार दोन लांबच्या लांब षटकार मारून बेअरस्टो सुसाट सुटला होता. कुलदीपनेच त्याचा झंझावात रोखला. बेअरस्टो २९ धावांवर झेलबाद झाला. समोरून रवींद्र जडेजाने ज्यो रूटला पायचीत केले आणि लगेचच कुलदीपने बेन स्टोक्स्ला शून्यावर पायचित केले.
इंग्लंड, पहिला डाव ः ५७.४ षटकांत सर्वबाद २१८ (झॅक क्रॉली ७९ -१०८ चेंडू, ११ चौकार, १ षटकार, बेन डकेट २७, ऑली पोप ११, ज्यो रूट २६, जॉन बेअरस्टॉ २९ - १८ चेंडू, २ चौकार, २ षटकार, बेन स्टोक्स ०, बेन फोक्स २४, रवीचंद्रन अश्विन ११.४-१-५१-४, कुलदीप यादव १५-१-७२-५, रवींद्र जडेजा १०-२-१७-१).
भारत, पहिला डाव ः ३० षटकांत १ बाद १३५ (यशस्वी जयस्वाल ५७ - ५८ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार, रोहित शर्मा खेळत आहे ५२ - ८३ चेंडू, ६ चौकार, २ षटकार, शुभमन गिल खेळत आहे २६ - ३९ चेंडू, २ चौकार, २ षटकार)
गोलंदाजांनी केलेल्या नाट्यमय कामगिरीनंतर सामन्यात वर्चस्व गाजवायची नामी संधी हाती आल्याचे रोहितला समजले होते. यशस्वी जयस्वालसह रोहितने कसोटी क्रिकेटला साजेशी फलंदाजी केली.
रोहित गोलंदाजांना चांगले फटके मारताना जयस्वाल सावध खेळत राहिला. अचानक यशस्वीने गियर बदलून शोएब बशीरच्या एकाच षटकात तीन षटकार मारले. दोन मुंबईकर फलंदाजांनी मग एकमेकांना साथ देत सलामीची शतकी भागीदारी आणि आपापले अर्धशतक पूर्ण केले.
अर्धशतक पूर्ण केल्यावर काहीही गरज नसताना यशस्वी जयस्वालने उतावळेपणाने आपली विकेट बशीरला बहाल केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.