Ind vs Pak World Cup 2023 : डेंगीच्या आजारातून बरा झालेला सलामीवीर शुभमन गिल आज पाकविरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात खेळण्याची शक्यता ९९ टक्के आहे, असा विश्वास कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला. फॉर्मात असलेल्या गिलसाठी अहमदाबादचे हे स्टेडियम आयपीएलमुळे होम ग्राऊंड आहे, त्यामुळे त्याचा सहभाग भारतासाठी मोलाचा ठरू शकेल.
भारतीय संघ सध्या उत्तम लयीत खेळत आहे. सात-आठ सामन्यांत सर्व खेळाडूंना चांगल्या खेळाची लय सापडली आहे. भारतीय संघ मागे वळून बघत नाही. अगोदर काय झाले याचा जास्त विचार करत नाही. कारण सर्वांना कल्पना आहे की रोजचा दिवस नवा, सामना नवा, आव्हाने नवीन. त्यामुळे नव्या दिवसाचा ताजा विचार करून सामन्यात उतरणे चांगले पडते, असे रोहितने सांगितले.
भारतीय संघातील सगळे खेळाडू अनुभवी आहेत, त्यांना दडपण कसे हाताळायचे माहीत आहे. म्हणूनच सगळे खेळाडू मोठ्या सामन्यांची प्रतीक्षा करत आहेत. भारतात खेळताना नेहमी मोठा पाठिंबा भारतीय संघाला मिळतो. आम्हाला त्यातून प्रेरणा मिळते. प्रेक्षकांचा आवाजी प्रतिसाद खेळाडूंना सर्वोत्तम खेळ करायला प्रेरणा देतो. शनिवारच्या सामन्याबाबत बोलायचे झाले तर सामना चालू होताना दोनही संघ समान पातळीवर आहेत, असेही रोहित म्हणाला.
दडपणाचा सामना करून त्या दिवशी सातत्याने चांगला खेळ कोण करेल, यावर सामन्याचा निकाल ठरेल. भारतीय संघ कोणत्याही खेळपट्टीवर खेळायला तयार आहे. येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याची तयारी आमची आहे, असा विश्वास रोहितने व्यक्त केला.
दडपण हाताळताना अनुभव येतो कामी : बाबर आझम
भारत-पाकिस्तान सामना नेहमीच सगळ्यांचे लक्ष खेचून घेतो. माझ्या पहिल्या सामन्याच्या वेळी खूप दडपण आले होते. दडपण हाताळताना अनुभव कामी येतो, असे माझे ठाम मत आहे, असे पाक कर्णधार बाबर आझमने सांगितले. संघातील ज्येष्ठ खेळाडू तरुण खेळाडूंना दडपण कसे हाताळायचे, हे थोडे शिकवतात. वर्तमानात राहाणे, एका वेळी एका चेंडूचा विचार करणे या गोष्टींवर लक्ष दिले, तर दडपण कमी होत जाते, असे तो म्हणाला.
माझा स्वत:चा खेळ गेल्या दोन सामन्यांत चांगला झाला नाहीये. आशा आहे की, योग्य सामन्यात माझ्या फलंदाजीला बहर येईल. शाहीन शाह आफ्रिदी मोठ्या सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करणारा मोठा खेळाडू आहे. भारतासमोर खेळताना त्याला वेगळा जोष जाणवतो. पाकिस्तान संघातील खेळाडूंना मी सतत सांगतो आहे की, चांगले क्षेत्ररक्षण संघाचे मनोबल उंचावते. तेव्हा सर्वस्व पणाला लावून क्षेत्ररक्षण करा आणि आपल्या गोलंदाजांच्या मागे उभे राहा, असे मत त्याने मांडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.