India vs South Africa 2nd ODI : दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था झालेल्या भारताला आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी लढावे लागणार आहे. वेगवान गोलंदाज अपयशी ठरत असताना ज्याच्याकडे अपेक्षा ठेवून राहावे तो दीपक चहर गुडघा मुरगाळ्यामुळे उर्वरित दोन सामन्यांतून बाहेर गेला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ असो वा आता शिखर धवनच्या कर्णधारपदी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणारा भारतीय संघ असो. वेगवान गोलंदाजांच्या प्रामुख्याने डेथ ओव्हरमधील अपयशाने पाठ सोडलेली नाही. कर्णधाराने आशेने पाहावे असा एकमेव गोलंदाज दीपक चहर होता, परंतु तोही आता जायबंदी झाला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने अंतिम षटकांत दिलेल्या भरपूर धावांमुळे गमावला होता. शिखर धवनने सामन्यानंतर ही खंत बोलून दाखवली होती. निवड समितीने चहरऐवजी फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरची निवड केली आहे.
मुकेश कुमारला संधी?
आजच्या सामन्यात अंतिम ११ खेळाडूंमध्ये मुकेश कुमारची वर्णी लागू शकते. नुकत्याच झालेल्या इराणी अंतिम सामन्यात त्याने प्रभावी गोलंदाजी केली होती. त्यासाठी आवेश खान किंवा महम्मद सिराज यापैकी एकाला वगळण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात या दोघांनी मिळून १६ षटकांत १०० धावा दिल्या होत्या आणि एकही विकेट मिळवता आली नव्हती. आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेतून निवड समिती वेगवान गोलंदाजीचे आणखी पर्याय शोधत आहेत. मुकेश कुमारला संधी देणे हा त्यातलाच भाग असू शकेल.
पावसाचा व्यत्यय अपेक्षित
लखनौ येथे झालेल्या पहिल्या सामन्यात पावसामुळे खेळ उशिरा सुरू झाल्याने प्रत्येकी ४० षटकांचा करण्यात आला होती. रांचीमध्येही पावसाळी वातावरण आहे. गेले काही दिवस पावसाची हजेरी आहे. उद्याही ५० टक्के पावसाचे भाकित करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.