Wi vs Ind 2nd T20 : आयपीएल स्टार खेळाडूंचा भरणा असूनही भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात पराभव सहन करावा लागला होता. ज्या चुका झाल्या, त्यात सुधारणा करून आपला लौकिक सिद्ध करण्याची वेळ या भारतीय खेळाडूंवर आली आहे. आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारताला तळाच्या खेळाडूंना फलंदाजीत सुधारणा करणे गरजेचे आहे.
पाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना तारोऊबा येथे झाला. तेथील खेळपट्टी संथ होती आणि त्यावर १५० धावांचा पाठलाग करताना हार्दिक पंड्याच्या संघाची दमछाक झाली. त्यात तळाचे खेळाडू काहीच योगदान देऊ शकत नाहीत, हे स्पष्ट झाले. या मालिकेतील निकालाचा काही दिवसांवर आलेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेवर परिणाम होणार नाही; परंतु यातून काही कच्च्या दुव्यांवर निश्चितच सुधारणा करण्याची संधी आहे.
या ट्वेन्टी-२० मालिकेत खेळणाऱ्या इशान किशन, शुभमन गिल आणि संजू सॅमसन यांचे एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेतील स्थान जवळपास निश्चित आहे. त्यामुळे वेस्ट इंडीजविरुद्धच्या या मालिकेतून फॉर्म कायम राखण्यासाठी या फलंदाजांना प्रयत्न करावे लागणार आहे. पहिला सामना गमावला असला, तरी पदार्पण करणाऱ्या तिलक वर्माने ३९ धावांची आश्वासक खेळी साकार करून दिलासा दिला होता.
नऊ दिवसांत पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची ही मालिका होत आहे. यातील अखेरचे दोन सामने अमेरिकेत होत आहेत. वेस्ट इंडिजचा संघ विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाही. त्यामुळे या धावपळीचा त्रास त्यांना होणार नाही; मात्र शुभमन गिल, इशान किशन, कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्यासारख्या खेळाडूंना दुखापती होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागणार आहे. मुळात अशा प्रकारच्या टी-२० मालिकेत दोन सामन्यांमध्ये फारशी विश्रांती मिळत नसते. त्यात दोन सामन्यांसाठी प्रवास करावा लागत असेल, तर ताण येत असतो आणि त्याचा परिणाम तंदुरुस्तीवर होत असल्याची नाराजी खेळाडू व्यक्त करत असतात. त्यामुळे आजच्या किंवा पुढच्या काही सामन्यात यशस्वी जयस्वालला संधी मिळू शकते.
भारताला बरोबरीची संधी
आजचा सामना होणाऱ्या मैदानाचा इतिहास वेस्ट इंडिजसाठी चांगला नाही. या मैदानावर झालेल्या ११ सामन्यांपैकी तीन सामन्यांचे निकाल पावसामुळे लागलेले नाहीत, तर इतर आठ लढतींपैकी पाच सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव झालेला आहे. हा इतिहास कायम ठेऊन आजचा सामना जिंकून भारताला मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.