India Vs Pakistan World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये आज भारतीय संघाने पाकिस्तानचा विजय रथ रोखला. अहमदाबादच्या ऐतिहासिक स्टेडियममध्ये भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्स राखून पराभव करत यंदाच्या वर्ल्डकपमधील आपली विजयाची हॅट्ट्रिक केली. भारताने पाकिस्तानचे 192 धावांचे आव्हान जवळपास 20 षटके राखून पार केलं.
विशेष म्हणजे भारताने वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा सलग आठव्यांदा पराभव करत विजयाची अष्टमी पूर्ण केली. आता स्कोअर हा 8 - 0 असा आहे. रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अन् भारतीय गोलंदाजांनी बाबर सेनेची सामुहिक शिकार करत त्यांना 191 धावात गुंडाळले.
भारताने आजच्या सामन्यात तीनही क्षेत्रात उत्तम कामगिरी केली. दबावात पुनरागमन कसं करायचं हे भारतीय संघाने पुन्हा एकदा सर्वांना दाखवून दिलं.
नाणेफेकीचा कौल पदरात पडला अन्
भारताचा कर्णधार रोहित शर्माने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पहिल्या दोन सामन्यात नाणेफेक गमावली होती. मात्र त्यानंतर महत्वाच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय संघ चेस करण्यात मास्टर आहे.नरेंद्र मोदी स्टेडियमवरील कोरड्या खेळपट्टीवर दुपारच्या सत्रात गोलंदाजी करून पाकिस्तानला कमी धावत रोखण्याची रणनिती योग्य ठरली. भारतीय वातावरणात सध्या संध्याकाळी दव पडतं त्यात गोलंदाजी करणे अवघड असतं. त्यामुळे रोहितने योग्य निर्णय घेतला.
त्याचा फायदा आपल्याला झाल्याचे दिसून आले. भारताने चांगली सुरूवात करणाऱ्या पाकिस्तानला 191 धावात गुंडाळले.
वेगवान गोलंदाजांचं जोरदार पुनरागमन
नरेंद्र मोदी स्टेडियमवरील कोरड्या आणि फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर नवीन चेंडूवर भारतीय गोलंदाजांनी सुरूवातीला थोडा स्वैर मारा केला होता. त्याचा फायदा पाकिस्तानी सलामीवीरांना झाला. त्यांनी 41 धावांची सलामी दिली होती.
यानंतर भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करत ही जोडी फोडली खरी मात्र बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी डाव सावरत पाकिस्तानला 155 धावांपर्यंत पोहचवले होते. ही जोडी भारताची डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच सिराजने बाबरचा त्रिफळा उडवत भारताला पुनरागमन करण्याची संधी उपलब्ध करून दिली.
82 धावांची भागीदारी फुटल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी पाकिस्तानचे उर्वरित 8 फलंदाज अवघ्या 36 धावात गारद केले. भारताच्या प्रत्येक गोलंदाजांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत पाकची सामुहिक शिकार केली.
कुलदीपचा डबल धमाका अन् जड्डूचीही साथ
भारताच्या वेगवान गोलंदाजांनी पाकिस्तानची टॉप ऑर्डर उडवल्यानंतर कुलदीप यादवने एकाच षटकात पाकिस्ताच्या सैद शकिल आणि इफ्तिकार अहमद यांची विकेट घेत पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले. या दोन विकेट्समुळे पाकिस्तानवर प्रचंड दबाव आला. सेट झालेला मोहम्मद रिझवान देखील समोरच दोन विकेट्स पडल्यामुळे गोंधळला.
कुलदीप सोबतच रविंद्र जडेजाने देखील आपला जलवा दाखवत पाकिस्तानची शेपूट गुंडाळून संघाचा विजय सुकर करण्यास हातभार लावला. त्यानंतर हार्दिक पांड्याने देखील दोन विकेट्स घेत भारताच्या प्रमुख गोलंदाजांचा भार हलका करण्याचं काम केलं.
रोहितचे पाकच्या गोलंदाजीवर अत्याचार
पाकिस्तानने जरी भारतासमोर 192 धावांचे माफक आव्हान ठेवलं असले तरी पाकिस्तानची तगडी गोलंदाजी पाहता ते आव्हान तितकं सोपं नव्हतं. शाहीन आफ्रिदी काय करू शकतो हे आपण 2021 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पाहिलं होतं.
मात्र रोहित शर्माने त्याला आल्या आल्या चौकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. रोहितच्या आक्रमक फलंदाजीमुळे पाकिस्तानची गोलंदाजी बॅकफूटवर गेली. रोहितला शुभमन गिल आणि विराट कोहलीने छोट्या मात्र उपयुक्त भागीदारी करून दिल्या.
रोहितच्या या झंजावाताचा परिणाम असा झाला की पाकिस्तानचे खेळाडू गचाळ क्षेत्ररक्षण करू लागले. त्यांनी सामना सोडूनच दिला होता. प्रतिस्पर्धी संघावर आपल्या फटकेबाजीने अत्याचार करण्याची रोहितची जुनीच सवय आहे.
पाकिस्तानची दबावात हाराकिरी
पाकिस्तान हा वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेत भारतासमोर कायम दबावात येतो हा इतिहास आहे. या सामन्यात देखील काही वेगळं घडलं नाही. 2 बाद 155 धावांपर्यंत मजल मारून देखील मोक्याच्या क्षणी पाकिस्तीनी फलंदाजांनी विकेट फेकल्या. अन् त्यांची मधली फळी दबावात आली. त्यानंतर त्यांची फलंदाजी ऐतिहासिकरित्या ढेपाळली.
गोलंदाजीतही 191 धावा डिफेंड करताना ती धार दिसली नाही. जरी स्कोअरबोर्डवर धावा कमी असल्या तरी पाकचे गोलंदाज टिच्चून मारा करत प्रतिस्पर्धी संघाला विजयासाठी झुंजवतात. मात्र आजच्या सामन्यात ते काही झालं नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.