Ind vs Aus T20 : भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी-20 सामन्यावर पावसाचे सावट

विदर्भात २१ सप्टेंबरनंतर पुन्हा जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
India Australia 2nd T-20
India Australia 2nd T-20sakal
Updated on

India Australia 2nd T-20 : उपराजधानीत तब्बल तीन वर्षांच्या दीर्घकाळानंतर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे नागपूरकर क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मात्र, हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तविल्याने या सामन्यावर पावसाचे दाट सावट आहे. त्यामुळे क्रिकेटशौकिनांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्याच्या प्रभावामुळे विदर्भात २१ सप्टेंबर किंवा त्यानंतर पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागासह ‘विंडी डॉट कॉम’ या संकेतस्थळानेही तसा अंदाज व्यक्त केला आहे. याच काळात विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा स्टेडियमवर यजमान भारत आणि विश्वविजेता ऑस्ट्रेलिया संघादरम्यान दुसरा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना २३ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.

वरुणराजाचा विदर्भात दोन-तीन दिवस मुक्काम राहिल्यास सामना निश्चितच वांध्यात येणार आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास, हजारो क्रिकेटप्रेमींच्या उत्साहावर विरजण पडणार आहे. शिवाय व्हीसीएसाठीही तो फार मोठा धक्का असणार आहे.

जामठ्याची ‘ड्रेनेज सिस्टीम'' उत्तम आहे. त्यामुळे थोडाफार पाऊस आला तरीदेखील सामना होऊ शकतो. दुर्दैवाने २३ तारखेला मुसळधार बरसला तर, त्या स्थितीत सामना होण्याची शक्यता खूप कमी राहील. नागपुरात तीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे वैदर्भी क्रिकेटप्रेमींमध्ये सध्या कमालीची उत्सुकता आहे. प्रकाशझोतात होणाऱ्या या सामन्याची ऑनलाइन तिकीटविक्री येत्या रविवारपासून (ता. १८) सुरू होत आहे.

...तर प्रेक्षकांचे पैसे परत मिळणार

यासंदर्भात विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे सीईओ फारुख दस्तुर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सामन्याचा विमा काढण्यासाठी विविध विमा कंपन्यांशी सध्या वाटाघाटी सुरू असून, त्यांना कोटेशन मागितले आहे. दुर्दैवाने पावसामुळे सामना होऊ शकला नाही तर, त्या स्थितीत प्रेक्षकांना त्यांच्या तिकिटांचे पूर्ण पैसे परत केले जाणार आहे. जर वेळेपर्यंत विमा निघाला नाही आणि पावसामुळे सामना रद्द करण्यात आल्यास व्हीसीएला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. सध्याचे पावसाळी वातावरण आणि पुढील आठवड्यात पुन्हा पावसाची शक्यता लक्षात घेता विमा कंपन्याही सध्या द्विधा मनःस्थितीत आहेत. कारण सामना खेळला न गेल्यास विमा कंपनीला नुकसानापोटी व्हीसीएला मोठी रक्कम द्यावी लागणार आहे.

''बंगालच्या उपसागरात लवकरच नव्याने कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुढील आठवड्यात जोरदार पावसाची दाट शक्यता आहे. पावसाळी वातावरण कमितकमी दोन-तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.''

- मोहनलाल साहू, संचालक, प्रादेशिक हवामान विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.