India vs England, 3rd Test: इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. लीड्सच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 78 धांवात आटोपला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ((Virat Kohli) देखील स्वस्तात बाद झाला. त्याला संघाच्या धावसंख्येत केवळ 7 धावांची भर घालता आली. सातत्याने पदरी निराशा पडत असलेल्या विराट कोहलीला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात येत आहे. दुसरीकडे चुका सुधारण्यासाठी दिग्गज मंडळीकडून त्याला सल्ले देण्यात येत आहेत. यात माजी क्रिकेटर मनिंदर सिंग (Maninder Singh) यांनी कोहलीला दिलेला सल्ला सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
सातत्याने अपयशी ठरत असलेल्या विराट कोहलीची त्यांनी चांगलीच शाळा घेतलीये. अहंकार बाजूला ठेवून कोहलीने सरावावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे मनिंदर सिंग यांनी म्हटले आहे. मनिंदर सिंग यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोहलीवर बरसले. यावेळी त्यांनी कोहलीच्याच वक्तव्याचा दाखला दिला. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी कोहलीने इंग्लंडमधील खेळपट्टीवर अहंकार बाजूला ठेवून परिस्थितीनुसार खेळावे लागेल, असे म्हटले होते. पण विराट कोहली आक्रमकतेला प्राधान्य देत आहे. संयमी खेळ करत त्याने मैदानात तग धरण्याचा प्रयत्न केला तर तो मोठी धावसंख्या उभा करु शकेल.
यासाठी मनिंदर सिंग यांनी मागील इंग्लंड दौऱ्याचा दाखला दिला. यापूर्वी इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहलीने जवळपास 600 धावा केल्या होत्या. इंग्लंडमधील खेळपट्टीही भारतातील खेळपट्टीसारखी फ्लॅट नाही. इथे तुम्ही एक पाय बाहेर काढून सहज ड्राइव्ह शॉट खेळू शकत नाही. कोहलीने मालिकेपूर्वी म्हटल्याप्रमाणे सरावावर फोकस करायला हवे. अहंकार बाजूला ठेवून जर त्याने सराव केला तर तो अपयश भरुन काढेल, असा विश्वासही मनिंदर सिंग यांनी व्यक्त केलाय.
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यातही विराट कोहली नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला होता. त्याच्या भात्यातून मोठी खेळी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण कोहली सध्या चांगलाच संघर्ष करताना दिसतोय. लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी विराटला चक्क मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला फोन करण्याचाही सल्ला दिलाय. या दोन दिग्गजांचा सल्ला मनावर घेऊन कोहली उर्वरित सामन्यात बहरदार खेळी करुन दाखवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.