चेन्नई - यजमान भारतीय हॉकी संघ आणि जपान यांच्यामध्ये उद्या (ता. ११) पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडकातील उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. याप्रसंगी भारतीय हॉकी संघाला ६० मिनिटांमध्ये तीव्रतेने अन् टिच्चून खेळ करावा लागणार आहे. तसेच फिनिशिंगमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचे ध्येय भारतीय हॉकी संघाचे असणार आहे.
भारतीय हॉकी संघाने यंदाच्या आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडकातील साखळी फेरीच्या लढतींमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. भारताने पाच सामन्यांमधून चार सामन्यांमध्ये विजय मिळवत एकूण १३ गुणांसह पहिले स्थान प्राप्त केले.
जपानला मात्र मोठी कामगिरी करता आलेली नाही. त्यांना फक्त एकाच लढतीत विजय मिळवता आलेला आहे. त्यामुळे पाच गुणांवरच त्यांना समाधान मानावे लागले. पाकिस्तानचा गोलफरक त्यांच्यापेक्षा वाईट असल्यामुळे जपानला अंतिम चार देशांमध्ये संधी मिळाली. त्यामुळे कागदावर तरी भारताचे पारडे जड असणार आहे.
इतिहासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
भारत-जपान यांच्यामध्ये २०२१ मधील आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडकातील साखळी फेरीची लढत रंगली. या लढतीत भारताने जपानचा ६-० असा धुव्वा उडवला. त्या वेळी साखळी फेरी संपल्यानंतर भारत पहिल्या स्थानावर आणि जपानचा संघ चौथ्या स्थानावर विराजमान होता.
त्यामुळे साहजिकच भारत-जपान यांच्यामध्ये उपांत्य लढत पार पडली. या लढतीत जपानने भारतावर ५-३ असा विजय साकारत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे यजमान भारतीय हॉकी संघाला या इतिहासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उपांत्य लढतीत सर्वस्व पणाला लावावेच लागणार आहे.
उपांत्य फेरीच्या लढती
मलेशिया-दक्षिण कोरिया
संध्याकाळी ६ वाजता
भारत-जपान
रात्री ८.३० वाजता
आकडे यजमानांच्या बाजूने
भारत-जपान यांच्यामध्ये आतापर्यंत ३४ लढती झाल्या आहेत. त्यापैकी २७ लढतींमध्ये यजमान भारताने विजय संपादन केला आहे. जपानला फक्त तीनच लढतींमध्ये विजय मिळवता आले आहेत. दोन देशांमधील चार सामने बरोबरीत राहिले आहेत.
साखळी फेरीत बरोबरी
भारतीय संघाने यंदाच्या आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडकातील साखळी फेरीच्या चार लढतींमध्ये विजय मिळवले. फक्त एकाच लढतीत भारताला १-१ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले. ही लढत होती जपानशी. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन याप्रसंगी म्हणाले, पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत चारही क्वॉर्टरमध्ये आमच्याकडून अव्वल दर्जाचा खेळ झाला. आता सातत्यपूर्ण कामगिरीची पुनरावृत्ती करावयाची आहे, असे ते स्पष्टपणे म्हणाले.
सहाव्यांदा प्रयत्न
मलेशियन संघाने आशियाई चॅम्पियन्स करंडकात आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०११ ते २०१८ या दरम्यान झालेल्या पाचही स्पर्धांमध्ये त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला. आता सहाव्या प्रयत्नांत त्यांना आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
पाचव्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी सज्ज
भारत व पाकिस्तान या दोन देशांनी आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडकाच्या जेतेपदावर सर्वाधिक तीन वेळा मोहोर उमटवली आहे. भारताने आतापर्यंत २०११, २०१२, २०१६, २०१८ या वर्षांमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
२०१२ मध्ये त्यांना पाकिस्तानकडून पराभूत झाल्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आता भारतीय संघ पाचव्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी सज्ज झाला असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.