India vs New Zealand 1st T20I : कर्णधार रोहित शर्माची दमदार ओपनिंग आणि सूर्यकुमारनं केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत विजयी समाली दिली. भारतीय संघाने 5 विकेट राखून दिमाखदार विजय नोंदवला. टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करताना टीम इंडियाने न्यूझीलंडच्या संघाला निर्धारित 20 षटकात 6 बाद 164 धावांवर रोखले होते.
न्यूझीलंडने दिलेल्या 165 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि लोकेश राहुल जोडीनं संघाच्या डावाला सुरुवात केली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. सँटनरने लोकेश राहुलला 15 धावांवर चालते केले. त्यानंतर रोहित आणि सूर्यकुमार या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. अर्धशतकाला अवघ्या दोन धावा बाकी असताना रोहित शर्मा बाद झाला. ट्रेंट बोल्डने त्याला माघारी धाडले. रोहित शर्माने 36 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 48 धावांची खेळी केली. सूर्यकुमारने तीसरे अर्धशतक पूर्ण करत संघाला विजयाच्या समीप आणले. बोल्टने त्याला 62 धावांवर बोल्ड केले. 40 चेंडूच्या खेळीत सुर्याने 6 चौकार आणि 3 षटकार खेचले. श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर बाद झाल्यानंतर पंतने टीम इंडियाच विजय निश्चित केला.
...अन् एकतर्फी वाटणाऱ्या सामन्यात निर्माण झाली रंगत
लोकेश राहुल आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सुर्यकुमारने अर्धशतक झळकावले. तो मैदानात असताना सामना एकतर्फी भारताच्या बाजूनं झुकल्याचे वाटत होते. बोल्टने सुर्यकुमारला बोल्ड करत सामन्यात रंगत आणली. साउदीने श्रेयस अय्यरला माघारी धाडत न्यूझीलंडच्या आशा पल्लवित केल्या. अखेरच्या षटकात टीम इंडियाला 10 धावांची गरज होती. अय्यरची जागा घेण्यासाठी आलेल्या अय्यरने अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार खेचत टीम इंडियाचा दबाव कमी केला. पण तो बाद झाला आणि पुन्हा बॉल टू रन सीन पाहायला मिळाला. पंतने खणखणीत चौकार खेचत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.