Asia Cup 2022 India vs Pakistan : विश्वकरंडक असो वा आशिया करंडक, भारताने पाकिस्तानवर नेहमीच वर्चस्व मिळवलेले आहे, पण साधारणतः नऊ महिन्यांपूर्वी ज्या मैदानात ही परंपरा खंडित झाली होती, त्याच मैदानातून पुन्हा नव्या मोहिमेची सुरुवात करण्याची संधी रोहित शर्माच्या भारतीय संघाला मिळणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत पाकने भारताचा पराभव केला होता, त्याच मैदानावर आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज पुन्हा भारत-पाक सामना होत आहे. दोन्ही संघांतील क्रिकेट लढतींचा नवा अध्यायही सुरू होत आहे.
आशिया कपमध्ये भले सहा संघ सहभागी होत असतील, पण लक्ष मात्र दोन संघांकडे आहे. कारण एकदम साधे आहे ते दोन संघ भारत आणि पाकिस्तान आहेत. एक नक्की आहे, जेव्हा हे दोन संघ एकमेकांशी क्रिकेटच्या मैदानावर भिडतात तेव्हा सकारात्मक क्रिकेट खुन्नसच्या ठिणग्या पडतात आणि त्याच क्रिकेट चाहत्यांना मोहात पाडतात.
दुबईच्या मैदानावर नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करणे फायद्याचे असते. नाणेफेक ठरणाऱ्या संघाला चांगली फलंदाजी करून मोठा धावफलक उभारण्याचे आव्हान असते, कारण जी काही मदत गोलंदाजांना होते, ती फक्त सामना चालू झाल्यावर पहिल्या अर्धा तासात होते. म्हणून नाणेफेक कोण जिंकते आणि फलंदाज काय करणार याकडे लक्ष असणार. दोन्ही संघांत वेगवान गोलंदाजांबरोबर फिरकी गोलंदाजांचा बोलबाला राहणार आहे हा मोठा फरक सामन्यादरम्यान जाणवणार आहे.
भारतीय संघाची उत्सुकता
भारतीय संघात कोणाची वर्णी लागेल आणि फलंदाजीची क्रमवारी काय असेल याची उत्सुकता असेल. रोहित शर्मासोबत सलामीला कोण असेल याचे औत्सुक्य असेल. के एल राहुल संघात परतल्याने तो खेळणार हे नक्की आहे आणि विराट कोहलीची बॅट धावांची भाषा बोलते की नाही याकडे सगळ्यांची नजर असेल. पाकिस्तानी संघाच्या मनात अजूनही विराट कोहलीची भीती कायम आहे, असे उपकप्तान शादाब खानने स्पष्ट बोलून दाखवले. पाकिस्तान संघाची ताकद फलंदाजीत आहे. कप्तान बाबर आझम तुफान फॉर्मात आहे आणि त्याला मोहम्मद रिझवान, फखर जमान, शादाब खान आणि असिफ अलीची साथ आहे.
विराटचा १०० वा सामना
पाकिस्तानविरुद्ध होणारा हा सामना विराट कोहलीचा १०० वा ट्वेन्टी-२० सामना असणार आहे. या प्रकारात सामन्यांचे शतक करणारा तो पहिला भारतीय ठरणार आहे. आतापर्यंतच्या ९९ सामन्यांत विराटने ५०.१२ च्या सरासरीने ३३०८ धावा केल्या आहेत. नाबाद ९४ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
संघ यातून निवडणार
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हूडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंग आणि आवेश खान.
पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर झमान, हैदर अली, हारिस रॉफ, इफ्तेकार अहमद, शुशादिल शाह, महम्मद नवाझ, महम्मद रिझवान, हसन अली, नसीम शाह, शहनवाझ दहानी, उस्मान कादिर आणि महम्मद हसनैन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.