हा किस्सा आहे वर्ल्डकप 2003चा, जो दक्षिण आफ्रिकेत खेळला गेला होता. भारतासाठी ही स्पर्धा एक वेगळा अनुभव देणारी होती. कारण साखळीत ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर बीसीसीआयने एक मोठा गेम खेळला. जो कुठे तरी 2003चा टर्निंग पॉइंट ठरला. या स्पर्धेदरम्यान बीसीसीआयने क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुडी वेबस्टर यांची नियुक्ती केली.
वेबस्टर यांनी 1970 च्या दशकात वर्ल्डकप विजेत्या वेस्ट इंडिजचा कर्णधार क्लाइव्ह लॉईडसोबतही काम केले. त्यांनी वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि भारतासोबतही काम केले आहे. याशिवाय 2006 मध्ये कॅरेबियन दौऱ्यात त्याने वीरेंद्र सेहवागला खूप मदत केली होती.
वेबस्टर यांनी उंचावलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर वर्ल्डकप 2003 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने भरारी घेण्यास सुरवात केली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याचे प्रत्यंतर आले. हा सामना सचिन तेंडुलकरसाठी खास असाच होता; कारण, स्पर्धेचे वेळापत्रक एका वर्षापूर्वी जाहीर झाल्यापासून त्याने पाकविरुद्धच्या या सामन्याची मानसिक तयारी सुरू केली होती. एक वेगळा सचिन या सामन्यातून दिसला.
शोएब अख्तरचे बाँबगोळे तेवढ्याच ताकदीने सचिनने सीमारेषेवर मारले. अपर कटचा मारलेला षटकार आजही अनेकांच्या लक्षात आहे. भारताला विजयपथावर ठेवणाऱ्या सचिनचे शतक मात्र थोडक्यात हुकले होते. विश्वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करणारा सचिन स्पर्धेत सर्वोत्तम ठरला होता.
क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना 23 मार्च 2003 रोजी दक्षिण आफ्रिकेतील वांडरर्स स्टेडियमवर खेळला गेला. त्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार सौरभ गांगुलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आदल्या दिवशी खूप पाऊस पडला होता, त्यामुळे गांगुलीने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. पण त्याचा निर्णय लवकरच चुकीचा ठरला.
ऑस्ट्रेलियाने डावाची चांगली सुरुवात केली. अॅडम गिलख्रिस्ट 57 तर पाँटिंगने 140 धावांची शानदार खेळी केली, मार्टिनने 88 धावा केल्या. यामुळे 50 षटकांच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने 359 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती.
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाकडून चाहत्यांनाही शानदार खेळाची अपेक्षा होती. पण हे होऊ शकले नाही. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग ही जोडी क्रीझवर आली. पण पहिल्याच षटकात टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का बसला आणि संपूर्ण स्पर्धेत शानदार खेळ करणारा सचिन तेंडुलकर वैयक्तिक 4 धावांवर बाद झाला.
भारतीय चाहत्यांमध्ये शांतता पसरली होती. टीम इंडिया बॅकफूटवर होती. तेंडुलकर बाद झाल्याच्या दुःखातून चाहते सावरण्याआधीच सेहवागला शून्य धावसंख्येवर जीवदान मिळाले. चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सौरभ गांगुली आणि सेहवागने सावध खेळायला सुरुवात केली. संघाची धावसंख्या 50 धावांच्या पुढे गेली. पण त्यानंतर टीम इंडियाला धक्का बसला आणि कर्णधार सौरभ गांगुली 24 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर बाद झाला. त्यानंतर शानदार फलंदाजी करणारा वीरेंद्र सेहवाग धावबाद झाला. सेहवागने 82 धावांची इनिंग खेळली होती. यानंतर एकामागून एक विकेट पडत राहिल्या. आणि टीम इंडिया 234 धावांवर ऑलआऊट झाली आणि अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने 125 धावांनी सामना जिंकून भारतीयांचे स्वप्न उद्ध्वस्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.