India vs Pakistan World Cup : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कप-2023 मध्ये टीम इंडियाने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला.
टीम इंडियाचा या स्पर्धेतील हा तिसरा विजय आहे. टीम इंडिया 6 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाने प्रथम गोलंदाजांनी आपले कौशल्य दाखवले, त्यानंतर फलंदाजांनी चौकार आणि षटकार खेचत वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर आठवा विजय नोंदवला. पण हा किस्सा आहे 1996 च्या एकदिवसीय वर्ल्डकपचा जेव्हा अंगावर काटा आणणारी घटना पाकिस्तानमध्ये घडली.
1992 मध्ये क्रिकेटच्या महाकुंभात म्हणजे वर्ल्डकपमध्ये दोन कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघ प्रथमच आमनेसामने आले होते. त्यावेळी भारताने पाकिस्तानचा अगदी सहज पराभव केला होता, मात्र या पराभवानंतरही पाकिस्तान स्पर्धेमधून बाहेर न पडता वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठून विजेतेपदावर कब्जा केला.
त्यानंतर भारत-पाकिस्तान दुसऱ्यांदा 1996 च्या एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये आमनेसामने आले होते. दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले होते आणि बंगळुरूमध्ये खेळला गेलेला हा सामना खूपच मनोरंजक होता.
चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या रोमहर्षक सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने निर्धारित 50 षटकात 8 विकेट गमावत 287 धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 248 धावांत गारद झाला. या ऐतिहासिक सामन्यात मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाकिस्तानचा 39 धावांनी पराभव केला. टीम इंडियाकडून झालेल्या दारूण पराभवानंतर पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडला होता.
भारताकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये शोककळा पसरली होती. कारण या पराभवानंतर महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या जाफर खानने स्वतःला बंदुकीची गोळी मारून घेत आत्महत्या केली होती. मदीन शहरात ही घटना घडल्याचे वृत्त त्यावेळी उर्दू दैनिक 'जंग'ने दिले होते.
पाकिस्तानमधील 'Frontier Post' या दैनिकाने त्यावेळी पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी कबर खणून ठेवल्याचे व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुट्टांचे पती आसिफ अली झरदारी यांनी पाक खेळाडूंसाठी बक्षीस म्हणून भूखंडाची घोषणा केली होती, ते भूखंड म्हणजे हेच कबर असल्याचे व्यंगचित्रातून सुचविण्यात आले होते.
आमीर सोहेल, इजाज अहमद व इंझमाम-उल-हक यांच्यामुळे पाकिस्तानला पराभव पत्करावा लागल्याचे काही लोक म्हटले होते. तर पाकिस्तान संघाचे त्यावेळचे व्यवस्थापक इंतिखाब आलम यांची तातडीने हकालपट्टी करावी अशी मागणी निवड समितीचे माजी सदस्य हसीह अहसन यांनी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.