India vs Syria AFC Asian Cup 2023 : भारतीय फुटबॉल संघाचे एएफसी आशियाई फुटबॉल करंडकातील आव्हान मंगळवारी संपुष्टात आले. सीरिया संघाने ब गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत भारतीय संघाचा १-० असा पराभव केला. त्यामुळे भारताच्या बाद फेरीत पोहोचण्याच्या आशांना सुरुंग लागला.
भारत - सीरिया यांच्यामधील लढतीत पूर्वार्धात दोन्ही देशांना गोल करता आला नाही; पण उत्तरार्धात सीरियाने गोल करण्यात यश मिळवले. ओमार ख्रिबिन याने ७६व्या मिनिटाला सीरियासाठी विजयी गोल केला. त्यानंतर दोन्ही देशांना गोल करता आले नाहीत. तब्बल सात वर्षांनंतर सीरियाने आशियाई करंडकात विजयाची नोंद केली. सहा गटांतील दोन अव्वल देश बाद फेरीत पोहोचणार आहेत. तसेच तिसऱ्या क्रमांकावरील अव्वल चार देशही बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. या विजयामुळे सीरियाला आता बाद फेरीची आशा बाळगता येणार आहे.
गोल करण्यात अपयश
भारतीय फुटबॉल संघाकडून यंदाच्या आशियाई करंडकात मोठ्या अपेक्षा होत्या; मात्र भारतीय संघाने साखळी फेरीच्या लढतींमध्ये एकही गोल केला नाही. ऑस्ट्रेलियाकडून २-०, उझ्बेकिस्तानकडून ३-० आणि सीरियाकडून १-० अशा फरकाने भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारताविरुद्ध सहा गोल करण्यात आले.
चौथ्या स्थानी घसरण
ब गटामध्ये भारतीय संघाची चौथ्या स्थानावर घसरण झाली. ऑस्ट्रेलियाने सात गुणांसह पहिले स्थान कायम राखले. उझ्बेकिस्तानने पाच गुणांसह दुसरे स्थान मिळवले. तसेच सीरियाने चार गुणांसह तिसऱ्या स्थानी मुसंडी मारली. भारताला गुणांचे खातेही उघडता आले नाही.
सुनील छेत्रीकडून निराशा
भारताचा अनुभवी व दिग्गज खेळाडू सुनील छेत्री याच्याकडून साखळी फेरीच्या तीनही लढतींमध्ये निराशा झाली. सध्याच्या त्याच्या वयाकडे पाहता त्याची ही अखेरची आशियाई स्पर्धा असणार आहे. पुढील स्पर्धेत तो खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.