IND vs WI : वेस्ट इंडीजविरुद्ध चौथ्या टी-२० सामन्याचा थरार आज अमेरिकेत रंगणार

भारतीय फलंदाजांसाठी सातत्य महत्त्वाचे
india vs west indies 4th t20 live streaming when and where to watch ind vs wi today in america
india vs west indies 4th t20 live streaming when and where to watch ind vs wi today in americasakal
Updated on

लॉडरहिल : पहिल्या दोन सामन्यांतील फलंदाजांचे अपयश तिसऱ्या सामन्यात धुऊन काढणाऱ्या भारतीय फलंदाजांना आता मालिका जिंकायची असेल तर त्यात सातत्य ठेवावे लागणार आहे. त्यासाठी आज होणारा चौथा सामना प्रथम जिंकावा लागणार आहे.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित सलग दोन सामने अमेरिकेत शनिवार आणि रविवारी होत आहेत. वेस्ट इंडीजसह अमेरिकेतील याच काही ठिकाणी पुढील वर्षी ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. त्यासाठी या दोन सामन्यांतील अनुभव महत्त्वाचा ठरणार आहे.

तिसऱ्या सामन्यात फलंदाजीचा दर्जा कमालीचा उंचावून भारताने विजय मिळवला असला तरी मालिकेत सध्या भारतीय संघ १-२ असा पिछाडीवर आहे. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे तिसऱ्या सामन्यातील १६० धावांचे आव्हान सहज पार करण्यात आले असले तरी सलामीचा प्रश्न कायम आहे.

तिसऱ्या सामन्यात इशान किशनऐवजी यशस्वी जयस्वालला पदार्पणाची संधी देण्यात आली, तो केवळ सहा धावा करून बाद झाला असला तरी उर्वरित दोन सामन्यांतील त्याचे स्थान कायम असेल, मात्र अनुभवी शुभमन गिलला आता आपल्या अपयशाला पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. आशिया करंडक आणि त्यानंतर होणारी विश्वकरंडक स्पर्धा जवळ येत असताना गिलचे अपयश संघाची चिंता वाढवणारे आहे.

भारतीय संघात गोलंदाजांकडून फलंदाजीत योगदान मिळत नसल्यामुळे प्रमुख फलंदाजांवरच मदार आहे. अक्षर पटेल सातव्या क्रमांकावर फलंदाजीस येतो, त्यानंतर येणारे फलंदाज धावा करत नसल्याचा फटका पहिल्या दोन सामन्यांत बसला होता.

या मालिकेतून पदार्पण करणाऱ्या तिलक वर्माने मात्र चांगला विश्वास निर्माण केला आहे. त्याने तीन सामन्यांत ३९ (२२ चेंडू), ५१ (४१ चेंडू) आणि ४९ (३७ चेंडू) अशी कामगिरी केली आहे. १३९ धावांसह तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. सूर्यकुमारला सापडलेला सूर भारताची जमेची बाजू ठरली आहे. मात्र त्याला पुढच्या दोन्ही सामन्यांत सातत्य राखावे लागणार आहे. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार हे दोघे मुंबई इंडियन्सचे खेळाडू आहेत.

आम्ही दोघांनी एकत्रितपणे बराच काळ फलंदाजी केली आहे. त्यामुळे एकमेकांचा खेळ जाणतो, तिलक वर्मा फारच आत्मविश्वासाने फलंदाजी करत आहे. त्याचा फायदा मलाही होत आहे, असे सूर्यकुमार तिलकविषयी विचारलेल्या प्रश्नावर म्हणाला.

फिरकी गोलंदाजीत भारताच्या आशा पुन्हा प्रामुख्याने कुलदीप यादववर असणार आहेत. दुसऱ्या सामन्यात तो बोटाला झालेल्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता; परंतु तिसऱ्या सामन्यात पुनरागमन केल्यावर त्याने चार षटकांत २८ धावांत ३ विकेट मिळवण्याची कामगिरी केली.

वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पूरनने पहिल्या तिन्ही सामन्यांत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली, मात्र कुलदीपचे कोडे त्याला सोडवता आले नाही. कुलदीपसह अक्षर आणि युझवेंद्र चहल यांनी तिसऱ्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. आता सेंटर ब्रोवार्ड स्टेडियमवरील खेळपट्टीवर ते कसा मारा करतात हे महत्त्वाचे आहे.

पहिली फलंदाजी महत्त्वाची

सेंटर ब्रोवार्ड स्टेडियमची खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजीस पोषक असते. त्यानंतर ती संथ होत जाते. येथे आतापर्यंत झालेल्या १३ पैकी ११ सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. त्यामुळे उद्या नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचे प्रथम फलंदाजीसच प्राधान्य असेल.

भारत वि. वेस्ट इंडीज

  • चौथा : टी -२० सामना

  • ठिकाण : सेंटर ब्रोवार्ड स्टेडियम (अमेरिका)

  • वेळ : रात्री ८ पासून. प्रक्षेपण : जिओ सिनेमा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.