India Gold Medal Victory in Chess Olympiad 2024: भारताच्या पुरुष व महिला संघाने बुडापेस्टमध्ये रविवारी इतिहास रचला. भारताच्या दोन्ही संघाने बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घालताना संस्मरणीय कामगिरी केली. देदीप्यमान यशानंतर भारतीय खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला. या यशाचे श्रेय त्यांनी सांघिक खेळाला देतानाच स्वप्नपूर्ती झाल्याच्या भावनाही त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आल्या.
भारतीय पुरुष संघाच्या अजिंक्यपदाचा शिल्पकार डी. गुकेश याप्रसंगी म्हणाला, या स्पर्धेमध्ये आम्हाला छान खेळ करता आला. वैयक्तिक तसेच सांघिक अशा दोन्ही बाजूने मी आनंदी आहे. खरेतर हे स्वप्न पूर्ण होण्यासारखेच आहे.
अर्जुन इरीगेसी याने या वेळी नमूद केले की, डी. गुकेश हा पहिल्या बोर्डवर चांगला खेळ करू शकेल, असे आम्हाला वाटले. त्यामुळे त्याची पहिल्या बोर्डसाठी निवड करण्यात आली. माझी तिसऱ्या बोर्डसाठी निवड करण्यात आली. हा योजनेचा एक भाग होता. यामुळे पश्चात्ताप करण्यासारखे काही नाही.
डी. गुकेश याने सांगितले की, अखेरच्या लढतीत आमची बैठक पार पडली. त्या वेळी आम्ही जल्लोष करण्याच्या मूडमध्ये होतो. या लढतीत पराभूत झालो असतो तरी टायब्रेकमध्ये आम्हाला विजय मिळाला असता असे मला वाटत होते; मात्र तरीही आम्ही विजय मिळवण्याच्या दृष्टिकोनातूनच उतरलो. अखेर मी व अर्जुनने विजय मिळवला आणि भारताला सुवर्णपदक मिळाले.
भारतीय संघाचे कर्णधार एन. श्रीनाथ यांनी भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले, भारतीय खेळाडू हे व्यावसायिक आहेत. त्यामुळे या सर्व खेळाडूंना माझ्या सल्ल्याची गरज नाही. बुद्धिबळाच्या पटावर काय करायचे हे त्यांना माहीत आहे. फक्त त्यांना एकत्रित आणायचे होते. त्यांना खेळताना बघायला आवडले.
याप्रसंगी भारताची अनुभवी महिला खेळाडू हरिका द्रोणावल्ली हिने तब्बल २० वर्षांनंतर स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली.
हरिका द्रोणावल्ली पुढे म्हणाली की, बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये आमची कामगिरी समाधानकारक होती; मात्र या सुवर्णपदकाने मी हे विसरले आहे. या संघातील युवा खेळाडूंनी खरोखरच कौतुकास्पद कामगिरी केली. निराशेला मागे टाकत आम्ही झोकात पुनरागमन केले.
महाराष्ट्राच्या दिव्या देशमुख हिने बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये वैयक्तिक सुवर्णपदकही पटकावले. याप्रसंगी तिने सलग ११ सामने खेळताना लागणाऱ्या कौशल्याबाबत मत व्यक्त करताना म्हटले की, करो या मरो अशीच परिस्थिती होती; पण देशासाठी सर्वस्व पणाला लावून खेळ केला. भारतीय संघाच्या कामगिरीचा मला अभिमान आहे. सुवर्णपदक पटकावल्याचा आनंद काही औरच आहे.
भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा अभिजित कुंटे यांच्याकडे होती. त्यांनी भारतीय महिला खेळाडूंचे कौतुक केले. ते म्हणाले, अखेरच्या दोन फेऱ्या महत्त्वपूर्ण होत्या. दिव्या देशमुख व वंतिका अग्रवाल या दोन्ही खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. वैशालीला काही वेळा धक्के बसले; पण हरिका हिने लय मिळवली. तानियाकडून चांगली सुरुवात मिळाली.
खुला सांघिक विभाग - सुवर्णपदक
महिला सांघिक - सुवर्णपदक
पुरुष (पहिला बोर्ड) - सुवर्णपदक (डी. गुकेश)
पुरुष (तिसरा बोर्ड) - सुवर्णपदक (अर्जुन एरीगेसी)
महिला (तिसरा बोर्ड) - सुवर्णपदक (दिव्या देशमुख)
महिला (चौथा बोर्ड) - सुवर्णपदक (वंतिका अग्रवाल)
१) भारत
२) अमेरिका
३) उझ्बेकिस्तान
१) भारत
२) कझाकस्तान
३) अमेरिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.