India 29 Medals at Paris Paralympic 2024: पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी मिळून तब्बल २९ पदके जिंकली. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे सर्वोत्तम प्रदर्शन ठरले. यापूर्वी भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये १९ पदके ( ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य) जिंकली होती. यंदा या विक्रमालाही मागे टाकत भारतीय खेळाडूंनी ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह एकूण २९ पदके जिंकली. या अविश्वसनीय कामगिरीनंतर क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी आज खेळाडूंचा सत्कार केला आणि रोष बक्षिसांचीही घोषणा केली.
पॅरालिम्पिकमध्ये भारत २९ पदकांसह १८ व्या क्रमांकावर राहिला. भारताला सर्वाधिक १७ पदके ऍथलेटिक्समध्ये मिळाली. या १७ पदकांमध्ये ४ सुवर्ण, ६ रौप्य आणि ७ कांस्य पदकांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ बॅडमिंटनमध्ये १ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य अशी ५ पदके, तर नेमबाजीत १ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य अशी ४ पदके भारताला मिळाली. तिरंदाजीत भारताला दोन पदके मिळाली, ज्यात एक सुवर्ण आणि एक कांस्यपदक आहे. याबरोबर ज्युदोमध्ये भारताला पहिलं आणि एकमेव पदक कपील परमारने मिळवून दिलं.
पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक विजेत्यांना ७५ लाख रुपये, रौप्य विजेत्यांना ५० लाख रुपये आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना ३० लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्याची घोषणा क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी केली.