विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यात असताना शनिवार, रविवार मिळून होणाऱ्या तीन सामन्यांपेक्षा भारतीय क्रिकेट रसिकांना बुधवार-गुरुवारच्या उपांत्य सामन्यांची ओढ लागली आहे. शेवटच्या साखळी सामन्यातील निकालावर भारतीय संघाचे कोणतेच भवितव्य अवलंबून नसल्याने संघात काही बदलाचे प्रयोग केले जातील, अशी चर्चा असली तरी प्रयोग करायची ही वेळ नाही, असा विचार करतो आहे. म्हणजेच गरज नसताना उगाच संघात बदल करायच्या मन:स्थितीत कप्तान रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन नसल्याचे दिसून आले.
नेदरलँडसच्या संघाने एखाद-दुसरा सामना असा काही जोमाने खेळला की प्रस्थापित संघांना दणका बसला. भारतीय संघ चांगल्या खेळाची लय कायम ठेवायच्या विचारात आहे. ४ ऑक्टोबरला चेन्नईत ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध पहिला सामना खेळताना ज्या एकाग्रतेने सराव केला जात होता अगदी तसाच शेवटच्या साखळी सामन्याअगोदर केला जात आहे.
शुक्रवारी पर्यायी सराव असून भारतीय संघातील सर्व खेळाडू चिन्नास्वामी मैदानावर हजर झाले. शमी, बुमरा यांनी सर्वात प्रथम फलंदाजीचा सराव केला. रवींद्र जडेजा त्यांना गोलंदाजी टाकून सतावत होता. बुमरा जरा जास्तच मन लावून फलंदाजीचा सराव करतोय, त्याला आता लोअर मिडल् ऑर्डर फलंदाज म्हणलेले आवडते, त्याने गरज पडल्यास खेळपट्टीवर तग धरून धावा जमा करायची जबाबदारी स्वीकारली आहे, राहुल द्रविड अगोदरच्या पत्रकार परिषदेत हसत हसत म्हणाला होता. सराव बघता नेमका त्याचा प्रत्यय येत होता. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि कप्तान रोहित शर्माने चिन्नास्वामी मैदानावरच्या खेळपट्टीचा अंदाज घेत पाच मिनिटे चर्चा केली.
सरावात बहुतेक खेळाडू व्हॉलीबॉल, फुटबॉल खेळत होते, या संदर्भात सरावानंतर भेटलेला जडेजा म्हणतो, क्रिकेट सोडून काहीच येत नाही. बाकी कशात मन रमत नाही. मग उगाच त्यांच्या चांगल्या खेळाचा रसभंग का करू. त्यापेक्षा मला फलंदाजी-गोलंदाजी येते, ते करतो ना, असे म्हणत जडेजा फलंदाजी करायच्या उद्देशाने पॅडस् बांधायला गेला. सामन्याच्या दोन दिवस अगोदर जोरदार सराव करून भारतीय संघ शेवटच्या साखळी सामन्यासाठी तयार झाल्याची सर्व चिन्हे चिन्नास्वामी मैदानावरील सरावात बघायला मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.