Interstate Athletics Sanjeevani Jadhav wins gold silver Prajakta Godbole Maharashtra nagpur
Interstate Athletics Sanjeevani Jadhav wins gold silver Prajakta Godbole Maharashtra nagpursakal

आंतरराज्य ॲथलेटिक्स : संजीवनी जाधवला सुवर्ण, रौप्यही महाराष्ट्राच्या प्राजक्ताला

महिलांच्या दहा हजार मीटर शर्यतीत नाशिककर संजीवनी जाधवने सुवर्ण व नागपूरच्या प्राजक्ता गोडबोलेने रौप्यपदक जिंकून महाराष्ट्राला झकास सुरुवात करून दिली.
Published on

नागपूर : आगामी राष्ट्रकुल व पुढे ढकलण्यात आलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी महत्त्वाच्या असलेल्या सीनियर आंतरराज्य ॲथलेटिक्स स्पर्धेची सकाळ महाराष्ट्रासाठी शुभ ठरली. चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुरू झालेल्या स्पर्धेत महिलांच्या दहा हजार मीटर शर्यतीत नाशिककर संजीवनी जाधवने सुवर्ण व नागपूरच्या प्राजक्ता गोडबोलेने रौप्यपदक जिंकून महाराष्ट्राला झकास सुरुवात करून दिली.

तालुका क्रीडा अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या संजीवनीने तब्बल चार वर्षांनंतर सीनियर आंतरराज्य स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. साईचे प्रशिक्षक विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या संजीवनीने पात्रता गाठण्याच्या दृष्टीने शर्यतीची आखणी केली होती. मात्र, प्रचंड उकाड्यामुळे तिला ३३ मिनिटे १६.४३ सेकंद अशीच वेळ देता आली. यंदा फेडरेशन करंडक स्पर्धेत नोंदविलेल्या आपल्या सर्वोत्तम वेळेपेक्षा ती तीन सेकंद दूर राहिली. त्याचप्रमाणे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पात्रता वेळेपासून १ मिनिटे ६ सेकंद, तर राष्ट्रकुल पात्रतेपासून २ मिनिटे ६ सेकंद दूर राहिली.

संजीवनीचे हे सीनियर आंतरराज्य स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीतील चौथे पदक आणि तिसरे सुवर्णपदक होय. आंतर विद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेची सुवर्णपदक विजेती असलेल्या प्राजक्ताने संजीवनीला फॉलो करण्याचे धोरण आखले होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात ती माघारली आणि दुसरी आली. तिने ३३ मिनिटे ५९.३४ सेकंद अशी वेळ दिली. गौरव मिराशे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या प्राजक्ताचे हे राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेतील पहिलेच पदक होय. त्याचप्रमाणे ही तिची सर्वोत्तम वेळही ठरली. यापूर्वी पुणे येथे राज्य निवड चाचणी स्पर्धेत तिने ३४ मिनिटे ११.०९ सेकंद अशी सर्वोत्तम वेळ दिली होती.

ऐश्वर्या मिश्रा बाद

महिलांच्या चारशे मीटर शर्यतीत कालिकत येथे फेडरेशन करंडक स्पर्धेत ५१.१८ सेकंदांची वेळ नोंदवून खळबळ उडविणारी महाराष्ट्राची ऐश्वर्या मिश्रा हीटमध्ये (प्राथमिक फेरी) चुकीचा प्रारंभ केल्याने स्पर्धेतून बाद झाली. कालिकत स्पर्धेनंतर तिला विशेष प्रशिक्षणासाठी तुर्कीला पाठविण्यात येणार होते. मात्र, तिचा ॲथलेटिक्स महासंघाशी संपर्क होत नसल्याने तिला तुर्कीला जाता आले नव्हते. तेव्हापासून तिच्या कामगिरीविषयी शंका घेण्यात येत होती. येथेही ‘डोप टेस्ट'' टाळण्यासाठी ऐश्वर्याने मुद्दाम चुकीचा प्रारंभ केला, अशी चर्चा रंगली होती.

द्युती, हिमा दास उपांत्य फेरीत

महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत द्युतीचंद, हिमा दास, सरबानी नंदा यांच्यात सुवर्णपदकासाठी चुरस आहे. तिघींनी प्राथमिक फेरी जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राची डिआंड्रा वल्लाडरेस हिनेही उपांत्य फेरी गाठली. पुरुषांच्या लांब उडीत ऑलिंपियन व राष्ट्रीय विक्रमवीर केरळच्या मुरली श्रीशंकरने प्राथमिक फेरीतच ८.०१ मीटरचा स्पर्धा विक्रम प्रस्थापित केला. यात महाराष्ट्राच्या अनिल शाहूने ७.२९ मीटर कामगिरीसह अंतिम फेरी गाठली.

पदकविजेत्यांची डोप टेस्ट

नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीचे (नाडा) अधिकारी येथे दाखल झाले असून यावेळी ॲथलिट्‍सच्या रँडम डोप टेस्ट करणार नसल्याचे नाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. केवळ पदकविजेत्यांची टेस्ट होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.