IPL 2020 : KIXP vs RCB : दुबई : 'के. एल. राहुल...कमाल राहुल' असे समालोचक आकाश चोप्राकडून नेहमीच कौतुकाचे विशेषण मिळणाऱ्या राहुलने जबरदस्त नाबाद शतक झळकावले. यंदाच्या आयपीएलमध्ये शतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला. राहुलच्या या खेळीमुळे द्विशतकी धावा उभारणाऱ्या पंजाबने विराट कोहलीच्या बंगळूर संघाचा 97 धावांनी पराभव करुन पहिला विजय नोंदवला.
टीम इंडियातही आता तेवढ्याच जबाबदारीने खेळणाऱ्या राहुलने गुरुवारच्या सामन्यात परिपूर्ण फलंदाजीचा नजराणा सादर केले. सावध सुरुवात... डावाच्या मध्यावर आकार घेणारी फलंदाजी आणि अंतिम क्षणी बेदम टोलेबाजी असे गिअर बदलणाऱ्या राहुलने अवघ्या 69 चेंडूत 14 चौकार आणि सात षटकारांची आतषबाजी केली. त्यामुळे पंजाबने 3 बाद 206 धावा केल्या.
दिल्लीविरुद्ध सलामीला सुपर ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागलेल्या पंजाबने या सामन्यात डावपेच बदलले होते. सुरुवातीला विकेट गमावायच्या नाहीत, हे त्यांचे धोरण होते. राहुलसह अर्धशतकी सलामीनंतर मयांक अगरवाल बाद झाला. त्यानंतर पूरन आणि मॅक्सवेल यांनी निराशा केली, तरी राहुलने संयम गमावला नाही. 15 व्या षटकापर्यंत त्यांच्या खात्यात 128 धावाच झाल्या होत्या, परंतु अखेरच्या दोन षटकांत राहुल डेल स्टेन आणि शिवम दुबे यांच्यावर तुटून पडला. शतकच नव्हे तर 132 धावा त्याने पार केल्या.
राहुलच्या या टोलेबाजीने खरे तर बंगळूर संघाच्या गोलंदाजांचे खच्चीकरण झाले, परंतु त्याचा परिणाम त्यांच्या फलंदाजीवरही झाला. पहिल्या 16 चेंडूत देवदत्त पदिक्कल, जोश फिलिप आणि विराट कोहली तंबूत परतले. त्यानंतर 8.2 षटकांत ऍरॉन फिन्च आणि एबी डिव्हिलिअर्स माघारी फिरले. तेव्हा बंगळूर संघाच्या पराभवाची केवळ औपचारिकताच शिल्लक राहिली होती. नंतरच्या फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले.
संक्षिप्त धावफलक :
पंजाब 20 षटकांत 3 बाद 206 (केएल राहुल 132- 69 चेंडू, 14 चौकार, 7 षटकार, मयांक अगरवाल 26- 20 चेंडू, 4 चौकार, शिवम दुबे 33-2) वि. वि. बंगळूर 17 षटकांत सर्वबाद 109 (ऍरॉन फिन्च 20, एबी डिव्हिल्यर्स 28- 18 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, रवी बिश्णोई 32-3, मुरुगन अश्विन 21-3)
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.