IPL 2024 MI vs LSG : शेवट गोड करण्याचे लक्ष्य; मुंबई - लखनौमध्ये आज लढत; रोहितला फॉर्म गवसणार?

टी-२० विश्‍वकरंडकाच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्मा व हार्दिक पंड्या या दोन खेळाडूंचा फॉर्म महत्त्वाचा ठरणार आहे.
IPL 2024 MI vs LSG
IPL 2024 MI vs LSG Sakal
Updated on

मुंबई :आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील प्ले ऑफ शर्यतीमधून बाहेर गेलेल्या दोन संघांमध्ये उद्या (ता. १६) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर लढत रंगणार आहे. यजमान मुंबई इंडियन्स व के. एल. राहुलचा लखनौ सुपर जायंटस्‌चा संघ यांच्यामध्ये ही लढत पार पडणार आहे. दोन्ही संघ विजय मिळवून शेवट गोड करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतील.

टी-२० विश्‍वकरंडकाच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्मा व हार्दिक पंड्या या दोन खेळाडूंचा फॉर्म महत्त्वाचा ठरणार आहे. या लढतीत दोघेही फलंदाजीचा फॉर्म मिळवण्यासाठी धडपड करताना दिसतील.

यंदा मुंबईच्या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा याच्याकडून हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आले. यामुळे चाहत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पहिल्या सामन्यापासून संताप व्यक्त करण्यात येत होता. याचे पडसादही मुंबई संघाच्या कामगिरीवर उमटताना दिसले. सुरुवातीपासूनच मुंबई संघाचा पाय खोलात गेला.

त्यामुळे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत मुंबईचा संघ कधीही नव्हता. तरीही अखेरच्या लढतीत विजय मिळवून पुढल्या मोसमासाठी आत्मविश्‍वास कमवता येणार आहे. अर्थात या वर्षअखेरीस मोठा लिलाव होणार आहे. त्यामुळे संघात बदल होण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई - लखनौ यांच्यामधील लढतीचा निकाल आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील प्ले ऑफच्या दृष्टिने महत्त्वाचा ठरणार नाही; पण रोहित शर्मा व हार्दिक पंड्याचा फलंदाजी फॉर्म भारतासाठी निर्णायक ठरू शकणार आहे. रोहित शर्माने १३ सामन्यांमधून ३४९ धावा फटकावल्या आहेत; पण मागील सहा सामन्यांमधील त्याची सर्वोत्तम खेळी १९ धावांची आहे.

यावरून त्याचा सुमार फॉर्म समजून येत आहे. रोहितकडे अनुभव असला तरी मोठी खेळी त्याचा आत्मविश्‍वास नक्कीच उंचावण्याची मदत करील. हार्दिक पंड्याला तर १८.१८च्या सरासरीने फक्त २०० धावाच करता आल्या आहेत. तसेच त्याला १३ सामन्यांमधून ११ फलंदाज बाद करता आले आहेत. यापैकी बहुतांशी फलंदाज त्याने मागील काही सामन्यांत बाद केलेले आहेत.

सूर्यकुमार, बुमराची चमक

मुंबईचे दोन खेळाडू शानदार खेळ करीत आहे. दुखापतीमधून बरा होत संघात पुनरागमन करणाऱ्या सूर्यकुमार यादवने दहा सामन्यांमधून ३४५ धावांची फटकेबाजी केली आहे. यामध्ये एक शतक व तीन अर्धशतकांचा समावेश आहे. जसप्रीत बुमराने १३ सामन्यांमधून २० फलंदाज बाद केले आहेत. या दरम्यान त्याने ६.४८च्या इकॉनॉमी रेटने धावा दिलेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.