टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा युएई आणि ओमनच्या मैदानात रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्पर्धेचा शुभांरभ आणि फायनलची तारीखही आयसीसीने स्पष्ट केलीय. या स्पर्धेपूर्वी आयपीएलमधील उर्वरित सामने देखील युएईच्या मैदानात होणार आहेत. आयपीएल स्पर्धा आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी टर्निंग पॉइंट ठरु शकते, असे भाकित दक्षिण आफ्रिकेचे मुख्य कोच मार्क बाउचर यांनी केले आहे. आयपीएल स्पर्धेतील सामन्यांचा वर्ल्डकप स्पर्धेतील सामन्यावर परिणाम दिसेल. आयपीएलमधील सामन्यामुळे युएईतील मैदानातील खेळपट्टी फिरकीला अनकूल ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढावली होती. या स्पर्धेतील उर्वरित सामने युएईच्या मैदानात खेळवण्याचे नियोजित आहे. आयपीएल पाठोपाठ भारतात रंगणारी आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धाही युएईत शिफ्ट करण्यात आलीये. आयपीएल स्पर्धेतील सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान नियोजित आहेत. आयपीएल स्पर्धेनंतर लगेच 17 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपचा रणसंग्राम रंगणार आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीमध्ये मार्क बाउचर म्हणाले की, आयपीएल स्पर्धेतील सामन्यानंतर युएईतील खेळपट्टी कोरडी होईल. त्यामुळे या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेप्रमाणे 180 आणि 200 धावसंख्या उभारणे कठीण असेल. त्यामुळे फलंदाजांसाठी चांगलीच कसोटी असणार आहे, असे ते म्हणाले. वर्ल्ड कपमध्ये टर्निंग पिचवर फिरकीपटू सामन्याला कलाटणी देतील, अशी भविष्यवाणी देखील त्यांनी केलीये.
ते म्हणाले की, आयपीएलमधील सामन्यामुळे वर्ल्ड कपपर्यंत पिच खूपच रफ होईल. त्यामुळे फिरकीपटूंचा सामना करणे मोठी कसोटी असले. आयपीएल स्पर्धेतील सामन्यानंतर टार्गेट किती सेट करायला हवे, याचा अंदाज येईल, असेही बाउचर यांनी म्हटले आहे.
वर्ल्ड कप स्पर्धा युएई आणि ओमनमध्ये होणार असली तरी या स्पर्धेचे यजमानपद हे भारताकडेच ठेवण्यात आले आहे. बाउचर यांनी म्हटल्याप्रमाणे जर खेळपट्टी फिरकीसाठी अनकूल ठरली, तर भारतीय संघाची दावेदारी आणखी मजबूत होऊ शकते. फिरकी ही भारतीय संघाची ताकद आहे. त्यामुळे आयपीएलनंतर खेळपट्टीने रंग बदलला आणि फिरकीला साथ दिली तर भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कपमध्ये विशेष छाप सोडू शकतो. वर्ल्ड कपमधील सर्व सामने चार मैदानात खेळवण्यात येणार आहेत. याशिवाय आयपीएलनंतर भारतीय संघ स्पर्धेला सामोरे जाणार असल्यामुळे त्याचाही त्यांना फायदा मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.