IPL 2024 MI vs PBKS : निसटत्या विजयाचे मुंबईला समाधान ; सूर्यकुमारच्या ७८ धावा

मुंबई इंडियन्सने गुरुवारी आयपीएलमधील निसटता विजय मिळवला. त्यांनी पंजाब किंग्सवर नऊ धावांनी विजय मिळवला.
IPL 2024 MI vs PBKS
IPL 2024 MI vs PBKSsakal
Updated on

मुल्लानपूर: मुंबई इंडियन्सने गुरुवारी आयपीएलमधील निसटता विजय मिळवला. त्यांनी पंजाब किंग्सवर नऊ धावांनी विजय मिळवला. मुंबईकडून मिळालेल्या १९३ धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाबकडून आशुतोष शर्मा याने २८ चेंडूंमध्ये ६१ धावांची खेळी साकारत विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण तो बाद झाल्यानंतर पंजाबचा संपूर्ण डाव १८३ धावांत आटोपला.

सूर्यकुमार यादव (७८ धावा) याची दमदार फलंदाजी व जसप्रीत बुमरा (३/२१) व जेराल्ड कोएत्झी (३/३२) यांची प्रभावी गोलंदाजी मुंबईच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरली. मुंबईचा हा तिसरा विजय ठरला. मुंबईकडून पंजाबसमोर १९३ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. जेराल्ड कोएत्झी व जसप्रीत बुमरा यांच्या प्रभावी व भेदक गोलंदाजीसमोर पंजाबच्या प्रमुख फलंदाजांचा निभाव लागला नाही. पहिले चार फलंदाज १४ धावांवर, तर निम्मा संघ ४९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. कोएत्झीने प्रभसिमरन सिंग व लियाम लिव्हिंगस्टोन यांना, तर बुमराने सॅम करन व रायली रुसो यांना झटपट बाद केले.

पंजाबचा संघ संकटात असताना शशांक सिंग व आशुतोष शर्मा या दोघांनी पुन्हा डाव सावरत विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. २५ चेंडूंमध्ये ४१ धावा फटकावणारा शशांक बुमराच्या गोलंदाजीवर बाद झाला. आशुतोष शर्मा याने २८ चेंडूंमध्ये ६१ धावांची धडाकेबाज खेळी साकारत पंजाबच्या विजयाची आशा कायम ठेवली. कोएत्झीने त्याला निर्णायक क्षणी बाद करीत मुंबईसाठी शानदार कामगिरी केली. त्यानंतर पंजाबचा डाव १८३ धावांवर संपुष्टात आला. दरम्यान, याआधी पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात इशान किशन हरप्रीत ब्रारकरवी आठ धावांवर झेलबाद झाला.

त्यानंतर मात्र रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव या जोडीने ८१ धावांची भागीदारी करताना पंजाबच्या गोलंदाजांची यथेच्छ पिटाई केली. पाचवे षटक असलेल्या हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर रोहितला पंचांकडून पायचीत बाद देण्यात आले होते. मात्र चेंडू स्टम्पला स्पर्श करीत नसल्याचे रिप्लेमध्ये दिसल्यानंतर तिसऱ्या पंचांकडून त्याला नाबाद ठरवण्यात आले. दोघांनी या भागीदारीत नेत्रदीपक फटके मारले. पंजाबसाठी कर्णधार सॅम करन धावून आला. त्याने मागील लढतीतील शतकवीर रोहित शर्माला हरप्रीत ब्रारकरवी ३६ धावांवर झेलबाद केले.

रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा या जोडीने मुंबईच्या धावसंख्येला ब्रेक लागू दिला नाही. दोघांनी ४८ धावांची भागीदारीही रचली. कागिसो रबाडाच्या षटकात सूर्यकुमारला मैदानातील पंचांकडून पायचीत बाद देण्यात आले. त्यानेही तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. चेंडू लेग स्टम्पच्या बाहेरून जात होता हे रिप्लेमध्ये दिसून आले. त्यामुळे तो नाबाद ठरवण्यात आला. मात्र पुढील षटक टाकणाऱ्या सॅम करनच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार बाद झाला.

त्याने ५३ चेंडूंमध्ये सात चौकार व तीन षटकारांसह ७८ धावांची खेळी साकारली. तिलक वर्माने नाबाद ३४ धावांची खेळी केली. मुंबईने २० षटकांमध्ये सात बाद १९२ धावा फटकावल्या. हर्षल पटेलने ३१ धावा देत तीन फलंदाज बाद केले. तसेच सॅम करनने ४१ धावा देत दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स - २० षटकांत सात बाद १९२ धावा (रोहित शर्मा ३६, सूर्यकुमार यादव ७८, तिलक वर्मा नाबाद ३४, हर्षल पटेल ३/३१, सॅम करन २/४१) विजयी वि. पंजाब किंग्स १९.१ षटकांत सर्व बाद १८३ धावा (शशांक सिंग ४१, आशुतोष शर्मा ६१, जसप्रीत बुमरा ३/२१).

IPL 2024 MI vs PBKS
IPL 2024 : स्ट्राईक रेटच्या बाबतीत सर्वात गरीब कोण?

दृष्टिक्षेपात

  • यंदाच्या आयपीएलमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक २५ षटकार मुंबईच्या फलंदाजांकडून मारण्यात आले आहेत.

  • आयपीएलमध्ये मुंबईसाठी खेळताना रोहित शर्माने सर्वाधिक २२४ षटकार मारले आहेत. त्याने कायरन पोलार्डच्या २२३ षटकारांना गुरुवारी मागे टाकले.

  • पंजाबच्या पहिल्या चार क्रमांकाच्या फलंदाजांनी एकूण मिळून फक्त आठ धावा केल्या. हा पंजाबचा आयपीएलमधील नीचांक ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.