मुल्लानपूर : गुजरात टायटन्सविरुद्धच्या रोमहर्षक लढतीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या राजस्थान रॉयल्सने शनिवारी पंजाब किंग्सवर तीन विकेट राखून मात केली. राजस्थानचा आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील हा पाचवा विजय ठरला. पंजाबला चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन, आवेश खान, युझवेंद्र चहल व केशव महाराज यांची प्रभावी गोलंदाजी राजस्थानच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.
अखेरच्या षटकात विजयासाठी १० धावांची गरज असताना शिमरोन हेटमायर याने अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर ६, २, ६ अशा धावा काढत राजस्थानला रोमहर्षक विजय मिळवून दिला. त्याची नाबाद २७ धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. पंजाबकडून राजस्थानसमोर १४८ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. राजस्थान संघाकडून दोन मुंबईकरांना सलामीला पाठवण्यात आले.
तनुष कोटियानने रणजी स्पर्धेत केलेल्या कामगिरीच्या जोरावर राजस्थान संघात स्थान मिळवले. यशस्वी जयस्वाल व तनुष कोटियान या दोघांनी ५६ धावांची भागीदारी करत आश्वासक सुरुवात केली. लियाम लिव्हिंगस्टोनच्या गोलंदाजीवर कोटियान २४ धावांवर बाद झाला. कागिसो रबाडाने यशस्वीला ३९ धावांवर बाद करीत राजस्थानला धक्का दिला. रबाडानेच संजू सॅमसनला १८ धावांवर पायचीत बाद केले. त्यानंतर शिमरोन हेटमायर याने १० चेंडूंमध्ये एक चौकार व तीन षटकारांसह नाबाद २७ धावांची खेळी साकारत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यात गोलंदाजी करीत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. आवेश खान, युझवेंद्र चहल, केशव महाराज व कुलदीप सेन यांनी प्रभावी गोलंदाजी केली. त्याचमुळे पंजाबची अवस्था १३व्या षटकांत ५ बाद ७० धावा अशी झाली. अथर्व तायडे (१५ धावा), जॉनी बेअरस्टो (१५ धावा), प्रभसिमरन सिंग (१० धावा), सॅम करन (६ धावा), शशांक सिंग (९ धावा) यांच्याकडून सपशेल निराशा झाली.
पंजाबचा संघ संकटात असताना जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन यांनी डाव धावसंख्येत भर टाकण्याचा प्रयत्न केला; पण आवेश खानने जितेशला २९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तसेच लिव्हिंगस्टोन २१ धावांवर धावचीत बाद झाला. यानंतर आशुतोष शर्मा याने नेहमीच्या आक्रमक शैलीत फलंदाजी केली. त्याने १६ चेंडूंत एक चौकार व तीन षटकारांच्या सहाय्याने ३१ धावांची खेळी साकारली. पंजाबला २० षटकांत ८ बाद १४७ धावांपर्यंत मजल मारता आली. केशव महाराजने २३ धावा देत दोन फलंदाज बाद केले. आवेश खानने ३४ धावा देत दोन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
संक्षिप्त धावफलक : पंजाब किंग्स - २० षटकांत ८ बाद १४७ धावा (जितेश शर्मा २९, आशुतोष शर्मा ३१, केशव महाराज २/२३, आवेश खान २/३४) पराभूत वि. राजस्थान रॉयल्स - १९.५ षटकांत ७ बाद १५२ धावा (यशस्वी जयस्वाल ३९, शिमरोन हेटमायर नाबाद २७, कागिसो रबाडा २/१८, सॅम करन २/२५).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.