आयपीएलचा मेगा लिलाव होण्यापूर्वी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हे नाव उच्चारल्यानंतर कारकिर्द संपल्यात जमा असलेला खेळाडू अशीच इमेज डोळ्यासमोर यायची. मात्र आयपीएलचा मेगा लिलावा होतो काय, त्यात हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्स 15 कोटीला खरेदी करते काय आणि संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळते काय. मुंबई इंडियन्सने रिटेन न केलेला हार्दिक पांड्या ज्यावेळी गुजरात टायटन्सचा कर्णधार झाला त्यावेळी सर्वांनीच तोंडात बोटं घातली होती. कारण सर्वांनाच अष्टपैलू हार्दिक, ग्लॅमरस हार्दिक, वादग्रस्त हार्दिक माहिती होता, मात्र कर्णधार हार्दिक कोणाच्याच परिचयाचा नव्हता. गुजरातचा हा निर्णय फसणार असा अंदाज जवळपास सर्वांनीच लावला होता.
पण म्हणतात ना, काळ आणि वेळ कधी पलटेल याचा नेम नसतो. हार्दिकच्या बाबतीतही असेच झाले. आयपीएल सुरू होण्यापूर्वी हार्दिक हा संपलेला विषय होता. त्याच्या पाठीवर ज्यावेळी शस्त्रक्रिया झाली त्याचवेळी त्याचे अष्टपैलूत्व गळून पडले असा अनेकांचा समज झाला. वेळही तशीच होती. हार्दिक ज्यावेळी दुखापतग्रस्त झाला आणि स्ट्रेचरवरून त्याला मैदान सोडावे लागले. त्याचवेळी शंकेची पाल चुकचुकली होती. भारताचा भावी कपिल देव आता मैदानावर परतेल की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर अनेक दिवस तो गोलंदाजी करण्यापासून दूर होता. ज्यावेळी तो मैदानावर परतला त्यावेळी जुना हार्दिक कुठेतरी हरवला होता. तो मैदानावरचा आक्रमक, आत्मविश्वासाने भरलेला हार्दिक लुप्त झाला होता.
हार्दिक हा एक संपूर्ण क्रिकेटिंग पॅकेज होता. जर या पॅकेजमधील एखादी गोष्ट जरी कमी पडली तरी ते पॅकेज अपूर्ण वाटायचे. हार्दिकने दुखापतीतून सावरल्यानंतर गोलंदाजी करणे बंद केले होते. हा फक्त फलंदाज हार्दिक काही भारतीय चाहत्यांना रुचला नाही. टी 20 वर्ल्डकपमध्ये आपण फक्त फलंदाज हार्दिक पाहिला. तो हार्दिक हतबल आणि दात नसलेला वाघ वाटत होता. संघातही हार्दिकची जागा ही एक अष्टपैलू खेळाडू म्हणून होती. तो भारतीय संघाला तीनही प्रकारात चांगला बॅलेंस देत होता. तो भारतीय संघाच्या फलंदाजी आणि गोलंदाजीला जोडणारा एक महत्वाचा दुवाच होता, संघाचा मनका होता. मात्र हा मनकाच निकामी झाल्याने भारतीय संघाचा समतोल डळमळला. इथूनच हार्दिकच्या डाऊन फॉलची सुरूवात झाली.
गोलंदाजी नाही तर संघात स्थान नाही. असा पवित्रा निवडसमितीने घेत नव्या ऑल राऊंडरसाठी चाचपणी सुरू देखील केली होती. त्यावेळी हार्दिकची वेळ भरली, भारताने अतिक्रिकेटमुळे एक चांगला अष्टपैलू गमावला अशी भावना निर्माण झाली. मुंबई इंडियन्सने देखील सात वर्ष मुंबईला आपले सर्वस्व देणाऱ्या हार्दिकला 'सोडून' दिले. यावेळी हार्दिक नावाचा भारतीय क्रिकेटमधील चॅप्टर आता क्लोज होणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता.
मात्र या प्रश्नाचं उत्तर हार्दिकने 'रुको जरा सबर करो' या अंदाजात दिलं. भारतीय निवडसमितीने देखील हार्दिक त्याच्या सद्याच्या स्थितीबाबत काही कल्पना देत नाही, हार्दिक 'माजलाय' अशा अविर्भावात त्यांनी वातावरण निर्मिती केली. याला आक्रमक हार्दिक प्रत्युत्तर देईल असे वाटले होते. मात्र हार्दिक शांत राहिला. या शांततेच त्याची क्रांती सुरू होती. याच दरम्यान, कधी हार्दिक गोलंदाजी करण्यास सुरूवात करतोय. तर कधी हार्दिक आता निवृत्तच होणार, अशा बातम्या वजा वावड्या येत राहिल्या. हार्दिक मात्र आपले काम करत राहिला.
अखेर आयपीएलमध्ये (IPL 2022) कर्णधारपदाचा जॅकपॉट हार्दिकला लागला आणि तो पुन्हा लाईम लाईटमध्ये आला. नवा संघ, नवा गडी, राज्य निर्माण करणार का? हा प्रश्न होताच. या सर्व चर्चांच्या वादळात स्थितप्रज्ञ हार्दिक उच्चारला, 'आयपीएलच्या हंगामात सर्वांसाठी एक सरप्राईज असणार आहे.' हार्दिकचा गोलंदाज म्हणून पुर्नजन्म हे सरप्राईज निवडसमितीसाठी होतं. मात्र भारतीय क्रिकेट रसिकांसाठी त्याने यापेक्षाही मोठं सरप्राईज दिलं. जुना हार्दिक मैदानावर परतलाच, मात्र त्याचबरोबर 'कॅप्टन हार्दिक' देखील जगासमोर आला. त्याने आपला नवा संघ अशा प्रकारे हाताळला की जणू त्याने यापूर्वी 100 सामन्यात कर्णधारपद भुषवलं आहे. इथं पाच वेळा जिंकणारी मुंबई आणि चार वेळा जिंकणारी चेन्नई जरा संघाचे कॉम्बिनेश बदलल्यानंतर बावरली. मात्र हार्दिकने संपूर्ण नवा संघ बांधला. ज्यावेळी लिलाव संपला, संघांची रूपरेषा ठरली त्यावेळी गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) पंडितांनी फार काही रेटिंग दिले नव्हते. मात्र हार्दिकच्या गुजरातने आपले 'रेटिंग' स्वतःच तयार केले. आता ते आयपीएल विजेते म्हणून ओळखले जातील. तेही पहिल्याच हंगामापासून हे सूख प्रत्येकाचा नशिबात नसते (RCB).
हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाला हंगाम सुरू झाला त्यावेळी तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा फलंदाज मिळत नव्हता. त्यावेळी हार्दिकने ही जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलत समर्थपणे सांभाळली. त्याने आपल्या प्रत्येक खेळाडूला एक सुरक्षित वातावण दिलं. असं सुरक्षित वातावरण हार्दिक टीम इंडियात गेल्या काही काळापासून मिस करत होता. याचं चांगलं उदाहरण म्हणजे डेव्हिड मिलर. डेव्हिड मिलर हा कधीकाळी आक्रमक शैलीचा फलंदाज मात्र त्याला गेल्या काही हंगामात आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता येत नव्हता. मात्र हार्दिकने त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याला हंगामातील जवळपास सर्व सामने अंतिम 11 मध्ये खेळवले. त्यानेही हा विश्वास सार्थ करून दाखवला. त्याने गुजरातला अनेक फसलेले सामने जिंकून दिले.
हार्दिक आपल्या कॅप्टन्सीबद्दल बोलताना म्हणतो की, ज्यावेळी संघ जिंकेल त्यावेळी तो विजय संघाचा, ज्यावेळी संघ पराभूत होईल तो पराभव माझा असेल. हार्दिकच्या कॅप्टन्सीवर धोनीचा प्रभाव आहे. मात्र कधी कधी त्याच्या अंगात विराट कोहली संचारतो. हार्दिक आपल्या खेळाडूंवर ओरडतो. मात्र एकूण टीम इंडियातला फेम बॉय, वादात अडकणारा, पैसा हातात खेळू लागल्यानंतर 'उधळपट्टी' करणारा हार्दिक आता मॅच्युअर होतोय. जबाबदारी घेतोय आणि ती जबाबदारी चोख पार पाडतोय. हा बदलेला हार्दिकने भारतीय संघात पुनरागमन केलंय. आता हा 'कूल 2.0 हार्दिक' आपली दुसरी इनिंग कशी खेळतो याचीच उत्सुकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.