लखनौ : आजचा दिवस तुझा असेल, असे एक वाक्य कर्णधार केएल राहुल मला म्हणाला आणि तीच स्फूर्ती घेऊन मी गोलंदाजी केली व आमच्या लखनौ संघाला सामना जिंकून दिला. याचा आपल्याला अभिमान आहे, असे वेगवान गोलंदाज यश ठाकूरने सांगितले.
यश ठाकूर हा मुळात विदर्भचा, आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात लखनौने गुजरातवर मिळवलेल्या विजयात यशने ३० धावांत ५ विकेट अशी निर्णायक कामगिरी केली. तेजतर्रार गोलंदाज मयंक यादव बरगड्या दुखावल्यामुळे केवळ एकच षटक गोलंदाजी करून परतला होता. त्याच्या अनुपस्थितीत यशने ही यशस्वी कामगिरी केली.
मयंक हा भन्नाट वेग असलेला गोलंदाज आहे. मला माझी ताकद आणि मर्यादा माहिती आहेत. त्यामुळे स्वतःमध्ये असलेल्या बलस्थानाला प्राधान्य देण्याचे काम मी केले, असे यशने सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक स्वीकारल्यानंतर सांगितले.मयंकच्या दुखापतीबाबत विचारले असता यश म्हणाला, तो सध्या तंदुरुस्त होत आहे, काळजी करण्याचे कारण नाही, लवकरच तो मैदानात उतरेल.
क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यावर यश ठाकूरला यष्टीरक्षक व्हायचे होते; परंतु नंतर तो वेगवान गोलंदाज झाला. यंदाच्या रणजी मोसमात विदर्भ संघाला अंतिम फेरी गाठून देण्यात त्याचा वाटा मोलाचा राहिला आहे.
गुजरातविरुद्धच्या कामगिरीचे श्रेय त्याने कर्णधार केएल राहुल याला दिले. मयंक मैदानातून बाहेर गेल्यानंतर राहुल मला म्हणाला, आजचा दिवस तुझा असेल, तू संघाला सामना जिंकून देऊ शकतोस. राहुलच्या या प्रोत्सानंतर मी दुसरा कोणताच विचार केला नाही. मी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि चेंडूच्या नियंत्रणावर अधिक भर दिला, यश मला मिळत गेले. विनाकारण अधिक दडपण घेऊन त्याचा परिणाम कामगिरीवर होऊ द्यायचा नव्हता, असे यश म्हणाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.