चेन्नई, ता. १ ः पंजाब किंग्सने सोमवारी गतविजेता चेन्नई सुपरकिंग्सवर सात विकेट राखून मात केली. या विजयामुळे पंजाबचे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील आव्हान कायम राहिले. कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर यांची प्रभावी गोलंदाजी व जॉनी बेअरस्टो, रायली रुसो, शशांक सिंग, सॅम करन यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर पंजाबने चेन्नईवर विजय साकारला. पंजाबचा हा चौथा विजय ठरला. चेन्नईला पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले.
चेन्नईकडून पंजाबसमोर १६३ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. रिचर्ड ग्लीसनच्या गोलंदाजीवर प्रभसिमरन सिंग १३ धावांवर बाद झाला. त्यानंतर जॉनी बेअरस्टो व रायली रुसो या परदेशी जोडीने ६४ धावांची भागीदारी केली. या लढतीत शिवम दुबेला गोलंदाजी देण्यात आली. त्याने बेअरस्टोला ४६ धावांवर बाद करीत पंजाबला धक्का दिला. बेअरस्टोने आपल्या खेळीत सात चौकार व एक षटकार मारला. रुसो याने २३ चेंडूंमध्ये ४३ धावांची खेळी केली. पण शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. त्यानंतर शशांक सिंग (नाबाद २५ धावा) व सॅम करन (नाबाद २६ धावा) यांनी पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
दरम्यान, याआधी पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार ॠतुराज गायकवाड व अजिंक्य रहाणे या सलामी जोडीने ६४ धावांची भागीदारी करीत चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. पण हरप्रीत ब्रारच्या गोलंदाजीवर अजिंक्य २९ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर बिनबाद ६३ या धावसंख्येवरून चेन्नईची अवस्था ३ बाद ७० धावा अशी झाली. हरप्रीतने पहिल्याच चेंडूवर फॉर्ममध्ये असलेल्या शिवम दुबेला पायचीत बाद केले. राहुल चहरने रवींद्र जडेजाला दोन धावांवर पायचीत बाद करीत चेन्नईला बॅकफूटवर ढकलले.
चेन्नईकडून पाचव्या क्रमांकावर समीर रिझवीला संधी देण्यात आली. अजिंक्यला संघाबाहेर काढून त्याच डावात रिझवीची निवड करण्यात आली. त्याने २३ चेंडूंमध्ये २१ धावांची खेळी केली. पण कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.
ॠतुराजचा फॉर्म कायम, धोनी मोसमात पहिल्यांदाच बाद
ॠतुराज गायकवाड याने आपला शानदार फॉर्म कायम ठेवला. त्याने ४८ चेंडूंमध्ये ६२ धावांची खेळी केली. मागील सहा डावांमधील त्याची ही पाचवी अर्धशतक किंवा त्यापेक्षा मोठी खेळी ठरली. मोईन अलीने १५ धावांची, तर महेंद्रसिंग धोनीने १४ धावांची खेळी केली. धोनी धावचीत बाद झाला. महत्त्वाचे म्हणजे धोनी यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच बाद झाला. चेन्नईला २० षटकांमध्ये सात बाद १६२ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यांना मोठी झेप घेता आली नाही. हरप्रीत ब्रार व राहुल चहर या फिरकीपटूंनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.