Glenn Maxwell : फॉर्म हरवलेल्या मॅक्सवेलचा आयपीएलमधून ब्रेक; शारीरिक आणि मानसिक थकव्याचे दिले कारण

अपेक्षा पूर्ण न करू शकलेला बंगळूर संघातील धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने मानसिक आणि शारीरिक थकव्याचे कारण देत आयपीएलमधून ब्रेक घेतला आहे.
Glenn Maxwell
Glenn Maxwell Sakal
Updated on

बंगळूर : अपेक्षा पूर्ण न करू शकलेला बंगळूर संघातील धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने मानसिक आणि शारीरिक थकव्याचे कारण देत आयपीएलमधून ब्रेक घेतला आहे. या स्पर्धेत दहाव्या स्थानावर असलेल्या बंगळूरसाठी प्लेऑफ गाठणे आता फारच कठीण आहे.

सोमवारी झालेल्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलने बोटाच्या दुखापतीमुळे माघार घेतल्याचे प्रथम सांगण्यात आले. ही दुखापत त्याला मुंबईविरुद्धच्या सामन्यात झाली होती; पण दुखापतीमुळे नव्हे तर मानसिक आणि शारीरिक थकव्याच्या कारणामुळे लीगमधून ब्रेक घेतल्याचे मॅक्सवेलने स्पष्ट केले.

माझ्यासाठी हा निर्णय तसा सोपा होता, मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर मी कर्णधार फाफ डुप्लेसी आणि प्रशिक्षकांची भेट घेतली आणि माझ्या जागेसाठी आता दुसऱ्या खेळाडूचा विचार करा, असे त्यांना सांगितले. माझ्यासाठी मानसिक थकव्यामुळे ब्रेक घेण्याची ही योग्य वेळ होती. मॅक्सवेलने हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

माझा मानसिक थकवा दूर झाला आणि मी सक्षम झालो, तसेच गरज भासली तर मी पुन्हा खेळू शकेन आणि प्रभावही पाडू शकेन, असाही विश्वास मॅक्सवेलने व्यक्त केला; परंतु सातपैकी सहा सामने गमावणाऱ्या बंगळूरसाठी प्लेऑफ गाठायची असेल तर उर्वरित सर्व साखळी सामने त्यांना जिंकावे लागणार आहेत.

तोडफोड फलंदाजीची क्षमता असलेला आणि काही महिन्यांपूर्वी भारतातच झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत वानखेडेवरील अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत असताना मॅक्सवेलने तुफानी टोलेबाजी करून आपल्या संघाचे नशीबच बदलले होते; पण आयपीएलमध्ये मात्र त्याने अपेक्षाभंग केला.

त्याला ५.३३च्या सरासरीने ३२ धावाच करता आल्या आहेत. यातील २८ धावा तर त्याने कोलकताविरुद्ध केल्या होत्या. क्षेत्ररक्षणातही त्याने दोन झेल सोडलेले आहेत. बंगळूरचा संघ आपल्याकडून अपेक्षा ठेवून आहे आणि त्या आपण पूर्ण करू शकत नाही, याची खंत वाटत असल्याचे मॅक्सवेलने मान्य केले.

यापूर्वीही मी अशाच मानसिकतेचा सामना केला आहे, त्यावेळीही असाच आंतरराष्ट्रीय ब्रेक घेतला होता. फलंदाजमधून आपण संघााच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही. त्यामुळे संघाचेही नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत जागा अडवून ठेवण्यापेक्षा इतरांना संधी देणे योग्य आहे. कदाचित हा खेळाडू संघाचे नशीब बदलू शकेल, अशीही भावना मॅक्सवेलने व्यक्त केली.

एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा संपल्यानंतर मॅक्सवेलच्या प्रामुख्याने ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील फॉर्म बऱ्यापैकी राहिलेला आहे. त्याने १७ टी-२० सामन्यांत मिळून ४२च्या सरासरीने ५५२ धावा फटकावलेल्या आहेत. १८५ हा त्याचा स्ट्राईक रेट राहिलेला आहे; पण आयपीएलमध्ये येतात चेन्नईविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात मॅक्सवेल शून्यावर बाद झाला आणि तेथूनच त्याचा फॉर्म घसरू लागला.

यावेळी आपल्याला दैवाची साथ मिळाली नाही. मुळात ट्वेन्टी-२० हा प्रकाराच बेभरवशाचा आहे. कधी कधी अधिक आक्रमक पवित्रा स्वीकारण्याच्या नादात आपण क्रिकेटचे मूलभूत तंत्र विसरतो आणि फसगत होते, असे मॅक्सवेल म्हणतो.

मॅक्सवेलसाठी आयपीएलमध्ये अपेक्षाभंग होण्याचा हा प्रकार नवा नाही. २०२० मध्ये पंजाब किंग्ज संघातून खेळताना त्याला ११ सामन्यांतून केवळ १०८ धावाच करता आल्या होत्या. विशेष म्हणजे, एरवी कोणताही चेंडू षटकार ठोकण्याची क्षमता असलेल्या मॅक्सवेलला त्यावेळी ११ सामन्यांत एकही षटकार मारता आला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.