IPL 2022 : मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरील सामन्यात चेन्नई सुपर किंग्जसमोर रॉयल चॅलेंजर्सच्या फलंदाजांनी नांगी टाकली. स्पर्धेत संघर्ष करत असलेला रविंद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील संघ पहिल्यांदाच फ्रंटफूटवर खेळताना दिसला. या सामन्यात कर्णधार जडेजाने (Ravindra Jadeja) फलंदाजीतील उणीव गोलंदाजीवेळी भरून काढली. अखेरच्या षटकात फलंदाजीला आलेला जडेजा शून्यावर बाद झाला होता. स्पर्धेत सलग चार सामने गमावल्यानंतर तो दबावात आहे का? असा प्रश्न त्याच्या फलंदाजीवरुन उपस्थितीत झाला असता. पण गोलंदाजीत त्याने दमदार कामगिरी करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ही गोष्ट जडेजासह संघासाठी फायदेशीर ठरेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या डावातील सातव्या षटकातील पाचव्या चेंडूवर रविंद्र जडेजाने संघाच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला. त्याने ग्लेन मॅक्सवेलला बोल्ड केले. टी-20 क्रिकेटमध्ये सातव्यांदा आणि आयपीएलमध्ये सहाव्यांदा जडेजाने त्याची विकेट घेतली. ही महत्त्वपूर्ण विकेट मिळाल्यावर जडेजाने फायर सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.
रविंद्र जडेजाने बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात तीन विकेट घेतल्या. यात मॅक्सवेलच्या महत्त्वपूर्ण विकेटसह वनिंदु हसरंगा आणि आकाश दीप यांच्या विकेट्सचा समावेश होता. जडेजाने आपल्या चार षटकांच्या कोट्यात 39 धावा खर्च करुन तीन विकेट्स घेतल्या. गोलंदाजीत चेन्नईकडून श्रीलंकन गोलंदाज तीक्षणा याने भेदक मारा केल्याचे पाहायला मिळाले. फाफ ड्युप्लेसीसला लवकर तंबूत धाडून त्याने आरसीबीच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. शहबाझ अहमद, सुयश प्रभुदेसाई आणि अनुज रावत यांच्या विकेट्सही त्यानेच टिपल्या. या सामन्यातील विजयामुळे चेन्नई संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. इथून पुढे विजयी मालिका कायम ठेवून पुन्हा दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाल्याचे संकेत संघाने दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.