IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals : गुजरात टायटन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये आज (ता. १७) आयपीएलमधील साखळी फेरीचा सामना अहमदाबाद येथे रंगणार आहे. गुजरातने सहा सामन्यांमधून तीन सामन्यांत विजय मिळवले असून दिल्लीने सहा सामन्यांमधून दोन सामन्यांमध्ये विजय संपादन केले आहेत. या दोन्ही संघांच्या कामगिरीत चढ-उतार दिसून आले आहेत. दोन्ही संघांना या स्पर्धेच्या उत्तरार्धात सातत्यपूर्ण खेळाची गरज आहे.
गुजरातने दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सहभागी होताना विजेतेपदावर मोहर उमटवत आपले वर्चस्व अधोरेखित केले. त्यानंतर मागील वर्षात त्यांना चेन्नई सुपरकिंग्सकडून पराभूत झाल्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मागील दोन मोसमांत उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर यंदाच्या मोसमात गुजरातला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात कात टाकणारा गुजरातचा संघ शुभमन गिलच्या नेतृत्वात चढ-उतारामधून जात आहे.
गुजरातचा संग फलंदाजी शुभमन गिल (२५५ धावा) व साई सुदर्शन (२२६ धावा) या दोघांवरच अवलंबून आहे. डेव्हिड मिलरची दुखापत त्यांच्यासाठी चिंतेची ठरली आहे. राहुल तेवतिया याने सहा सामन्यांमधून १०३ धावा केल्या आहेत. मात्र, खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत असल्यामुळे त्याच्याकडून मोठ्या धावा झालेल्या नाहीत. विजय शंकरकडूनही निराशा झालेली आहे.
गुजरातच्या संघाला यंदाच्या मोसमात गोलंदाजी विभागातही ठसा उमटवता आलेला नाही. मोहित शर्मा याने आठ, तर उमेश यादव याने सात फलंदाज बाद केले आहेत. मोहितच्या गोलंदाजीवर ९.३९च्या सरासरीने, तर उमेशच्या गोलंदाजीवर १०.५५च्या सरासरीने धावा फटकावण्यात आल्या आहेत. राशीद खानने ७.९५च्या सरासरीने धावा देत सहा फलंदाज बाद केले आहेत; पण राशीदकडून यापेक्षा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. नूर अहमद व स्पेन्सर जॉन्सन यांनीही संस्मरणीय कामगिरी केलेली नाही.
रिषभ, स्टब्सवर फलंदाजीची मदार
दिल्ली संघाने सहा सामन्यांमधून दोन सामन्यांत विजय, तर चार सामन्यांत पराभव पत्करला आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित आठ लढतींमध्ये त्यांना सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. रिषभ पंत (१९४ धावा), ट्रिस्टन स्टब्स (१८९ धावा) या दोन फलंदाजांनी दिल्लीसाठी छान खेळ केला आहे. डेव्हिड वॉर्नर (१६६ धावा) व पृथ्वी शॉ (१५१ धावा) यांनीही चमक दाखवली आहे; पण सातत्यपूर्ण खेळाची गरज त्यांना आहे. जेक फ्रेसर मॅकगर्क याने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावत आपण लंबी रेस का घोडा असल्याचे दाखवून दिले आहे; पण त्याच्या कामगिरीतही सातत्य असण्याची नितांत गरज आहे.
कुलदीपच्या कामगिरीने आत्मविश्वास उंचावला
दुखापतीवर मात करीत पुनरागमन करणाऱ्या कुलदीप यादवने लखनौविरुद्धच्या लढतीत तीन विकेट बाद करीत दिल्लीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या या कामगिरीमुळे दिल्लीच्या संपूर्ण संघाचा आत्मविश्वास उंचावला. आता दिल्लीच्या गोलंदाजांनी दबावाखाली आपला खेळ उंचावण्याची गरज आहे. खलील अहमद (९ विकेट), कुलदीप यादव (६ विकेट), ॲनरिक नॉर्किया (६ विकेट), मुकेशकुमार (५ विकेट), अक्षर पटेल (४ विकेट) व इशांत शर्मा (४ विकेट) यांनी गोलंदाजीत प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याचे काम करायला हवे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.