'कोरबो लोरबो जितबो..' या नाऱ्यासह आयपीएलच्या मैदानात रणशिंग फुंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने दोन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सपर किंग्ज या टीमशिवाय हैदराबाद आणि कोलकात हे असे संघ आहेत की ज्यांनी एकपेक्षा अधिकवेळा जेतेपद पटकावले आहे. कोलकाताने 2012 आणि 2014 मध्ये आयपीएलचे जेतेपद मिळवले होते.
मागील वर्षी युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेतही हा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर होता. यावेळीही त्यांना 14 पैकी 7 सामने जिंकले होते. मायनस नेटरनरेट यंदा प्लसमध्ये करुन कोलकाताची टीम प्ले ऑफसाठी पात्र ठरलीये. कोलकाता संघ प्ले ऑफचा दावेदार असेल, असा विचार कोणीही केला नव्हता. यामागे कारणंही तशीच होती.
मागील वर्षीच्या हंगामात दिनेश कार्तिकने निम्म्या स्पर्धेनंतर आपल्या खांद्यावरील नेतृत्वाचा भार इयॉन मॉर्गनच्या खांद्यावर टाकला. बॅटिंगवर लक्षकेंद्रीत करण्यासाठी हे पाउल उतरल्याचे त्याने स्पष्ट केले. इयॉन मॉर्गन हा नेतृत्वाच्या बाबतीती दिनेश कार्तिकपेक्षा निश्चितच उजवा आहे. त्याने इंग्लंडच्या संघाला विश्वविजेता करुन दाखवले आहे. तरीही कोलकाताच्या या बदलाकडे कोणी फार गांभिर्याने घेतले नाही.
नेतृत्वाप्रमाणेच टीम कॉम्बिनेशमध्येही अस्थिरता जाणवली. मागील हंगामापासून ते यंदा भारतातर रंगलेल्या पहिल्या टप्प्यात त्यांची अवस्था तीच होती. डावाची सुरुवात कोण करणार? मध्यफळीची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर असणार हे निश्चित वाटले नाही. त्यामुळेच वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन असूनही कोलकात्याला कोणी जमेत धरले नाही. यंदाच्या हंगामातील पहिल्या टप्प्यात त्यांनी 6 पैकी केवळ 2 सामने जिंकले होते.
युएईमध्ये गेल्यावर या संघाने संघात स्थिरता ठेवली. मसल पावर रसेलच्या अनुपस्थितीत संघातील संतुलन कायम ठेवण्यात इयॉन मॉर्गनला यश आले. तो संघासाठी नावाला साजेसा खेळ करताना दिसला नाही. पण त्याची रणनिती संघाच्या फायद्याची ठरली. अष्टपैलू व्यंकटेश अय्यरवर त्याने टाकलेला विश्वास हा संघाच्या फायद्याचा ठरला. त्याच्या रुपात कोलकाताला एक मॅचविनर ओपनर मिळाला आहे. मध्यफळीत राहुल त्रिपाठी लक्षवेधी खेळी करताना दिसतोय.
शुबमन गिल, दिनेश कार्तिक हे देखील सामन्याला कलाटणी देणार शिलेदार त्यांच्या ताफ्यात आहेत. रसेलही फिट असून प्ले ऑफच्या लढतीत तो खेळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे हा संघ पुढे सरकला तर नवल वाटणारन नाही. मागील हंगामापासून ते पहिल्या टप्प्यातील कामगिरीनंतर त्यांनी ज्या तोऱ्यात कमबॅक केलं ते कौतुकास्पद आहे. टीमचा हा प्रवास काना मागून आली तिखट झाली... असाच काहीसा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.