IPL 2022, Kolkata Knight Riders vs Delhi Capitals : खलील अहमदचा भेदक मारा आणि अखेरच्या टप्प्यात कुलदीप यादवने कोलकाताच्या तळाच्या फलंदाजांची घेतलेली गिरकी या सुरेख संगमाने दिल्लीकरांच्या सलामीवीरांची अर्धशतके सार्थ ठरली. डोंगराऐवढ्या धावांचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ ढेपाळला. कर्णधार श्रेयस अय्यरचे अर्धशतक वगळता कोणालाही मैदानात तग धरता आला नाही. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने अव्वलस्थानावर असलेल्या कोलकाता संघाला नमवत स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी अर्धशतकी खेळी केली होती. पृथ्वी शॉनं 29 चेंडूत 51 धावा कुटल्या. त्याच्याशिवाय डेव्हिड वॉर्नरने 45 चेंडूत 61 धावांची खेळी केली. पंत 14 चेंडूत 27 धावा करुन परतल्यानंतर ललित यादव 1(4) आणि रामवन पॉवेल 8(6) स्वस्तात माघारी फिरले. अखेरच्या षटकात अक्षर पटेलनं 14 चेंडूत 22 तर शार्दुल ठाकूरने 11 चेंडूत धावा करत संघाची धावसंख्या 5 बाद 215 धावापर्यंत पोहचवली होती.
दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना कोलकाता संघाची सुरुवात खराब झाली. धावफलकावर अवघ्या 21 धावा असताना सलामीवीर व्यंकटेश अय्यर 18 धावा करुन तंबूत परतला. त्याच्यापाठोपाठ अजिंक्य रहाणेही 8 धावा करुन बाद झाला. ही जोडी परतल्यानंतर नितिश राणा आणि श्रेयस अय्यर जोडीनं संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारीही केली. पण ललित यादवने ही जोडी फोडली आणि कोलकातासाठी सामना अवघड झाला. कुलदीप यादवने श्रेयस अय्यरची विकेट घेत सामना दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूनं वळवला. अय्यरने कोलकाताकडून सर्वाधिक 54 धावांची खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादवने 35 धावा खर्च करत 4 विकेट्स घेतल्या. खलील अहमदने तीन, शार्दुल ठाकूर दोन आणि ललित यादवला एक विकेट मिळाली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.