SRH vs LSG : लखनौच्या खानमुळे हैदराबादी 'बिर्याणी'चा बेत फसला
नवी मुंबई : लखनौ सुपर जायंटने सनरायझर्स हैदराबादचा 12 धावांनी पराभव करत हंगामातील आपला दुसरा विजय साजरा केला. हैदराबादला लखनौचे 170 धावांचे आव्हान पेलवले नाही. त्यांना 20 षटकात 157 धावांपर्यंतच मजल मारता आली. लखनौकडून वेगवान गोलंदाज आवेश खानने नवीन चेंडूवर तसेच स्लॉग ओव्हरमध्ये भेदक मारा केला.
त्याने 4 षटकात 24 धावात 4 विकेट घेतल्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौने कर्णधार केएल राहुलच्या 68 आणि दीपक हुड्डाच्या 51 धावांच्या जोरावर 169 धावा केल्या होत्या. (IPL 2022 Lucknow Super Giant Defeat Sunrisers Hyderabad Avesh Khan Fabulous Bowling_
लखनौचे 170 धावांचे आव्हान पार करताना हैदराबाची देखील सुरूवात खराब झाली. आवेश खानने केन विल्यमसन आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीला बाद करत हैदराबादची अवस्था 2 बाद 38 अशी केली होती. मात्र त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि एडन मारक्रमने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्रिपाठीने आक्रमक फटकेबाजी करत 10 षटकात 82 धावांपर्यंत पोहचवले.
मात्र 10 व्या षटकानंतर लखनौने पुन्हा सामन्यावर पकड मिळवण्यास सुरूवात केली. क्रुणाल पांड्याने 11 व्या षटकात 12 धावा करणाऱ्या मारक्रमला बाद केले. त्यानंतर 14 व्या षटकात 30 चेंडूत 44 धावा करणाऱ्या राहुल त्रिपाठीला देखील बाद केले. दोन्ही सेट बॅट्समन बाद झाल्यामुळे हैदराबादवर दबाव आला होता. हा दबाव निकोलस पूरनने झुगारून देत आक्रमक फटके मारण्यास सुरूवात केली. त्याने 24 चेंडूत 34 धावा केल्या होत्या. मात्र आवेश खानने 18 षटकात पुरन आणि अब्दुल समादला पाठोपाठच्या चेंडूवर बाद करत सामन्याचे चित्रच पालटले.
दरम्यान, अखेरच्या षटकात 16 धावांची गरज असताना होल्डरने सुंदरला बाद करत षटकाची चांगली सुरूवात केली. त्यानंतर भुवनेश्वर कुमार आणि शेफर्डला बाद करत हैदराबादचा डाव 157 धावात आटोपला.
तत्पूर्वी, हैदराबादने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंटला फलंदाजी करण्यास पाचारण केले. मात्र लखनौची सुरूवात खराब झाली. हैदराबादचा कर्णधार केन विलियमसनने पॉवर प्लेमध्ये वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजी करण्यास पाचारण केले. त्यानेही क्विंटन डिकॉक आणि एल्विस लुईसला बाद करत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. पाठोपाठ शेफर्डने देखील मनिष पांडेला बाद करत लखनौला तिसरा धक्का दिला.
मात्र यानंतर लखनौचा कॅप्टन राहुलने दीपक हुड्डाला साथीला घेत डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी रचली. मात्र रोमारियो शेफर्डने हुड्डाला अर्धशतकानंतर बाद केले. दीपकनंतर राहुलने आक्रमक फलंदाजी करत संघाला 150 च्या जवळ पोहचवले. मात्र त्यानंतर हैदराबादने सामन्यात कमबॅक करण्यास सुरुवात केली. नटराजनने राहुलला 68 धावांवर बाद केले. त्यानंतर क्रुणाल पांड्याला देखील नटराजनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दरम्यान, युवा आयुष बदोनीने 12 चेंडूत 19 धावा करत लखनौला 169 धावांपर्यंत पोहचवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.