नवी मुंबई: आयपाएल 2022 च्या 6 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोरने 3 विकेट्सनी कोलकाता नाईट राडर्सनेचा पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली. केकेआरने ठेवलेल्या 129 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीच्या फलंदाजांना घाम फुटला. शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात दिनेश कार्तिक (7 चेंडूत 14 धावा) आणि हर्षल पटेलने (6 चेंडूत 10 धावा) केलेल्या फटकेबाजीमुळे आरसीबीला विजय मिळवता आला.
कोलकाता नाईट रायडर्सने ठेवलेल्या 129 धावांचे माफ आव्हान पार करताना देखील आरसीबीच्या फलंदाजांना घाम फुटला. केकेआरच्या उमेश यादव आणि टीम साऊदीने नवीन चेंडूवर आरसीबीची टॉप ऑर्डर पॅव्हेलियनमध्ये धाडली. उमेश यादवने विराट कोहली आणि अर्जून रावतची शिकार केली. तर साऊदीने फाफ ड्युप्लेसिसचा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे आरसीबीची अवस्था 3 बाद 17 धावा अशी झाली.
त्यानंतर आरसीबीच्या मधल्या फळीने सावध पवित्रा घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र सुनिल नारायण आणि वरूण चक्रवर्तीने आरसीबीच्या फलंदाजांना फिरकाच्या जाळ्याच फसवले. त्यानंतर साऊदीने आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये दोन विकेट काढून दिल्या. त्यामुळे आरसीबीची अवस्था 7 बाद 107 अशी झाली. नारायण आणि चक्रवर्तीने प्रत्येकी 1 विकेट घेतली. मात्र कार्तिक आणि हर्षल पटेलने अखेरच्या षटकापर्यंत सामना नेत विजयी मोहर उमटवली. दिनेश कार्तिक रन आऊट होता होता वाचला होता. त्याचा फायदा घेत त्याने सामना जिंकून दिला.
रॉयल चॅलेंजर बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्या सामन्यात खराब कामगिरी करणाऱ्या आरसीबने आजच्या सामन्यात दमदार गोलंदाजी केली. त्यांनी केकेआरला पॉवर प्ले पासूनच एका पाठोपाठ एक धक्के देण्यास सुरुवात केली.
आरसीबीच्या वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांनी केकेआऱचे दोन्ही सलामीवीर पॉवर प्लेमध्येच माघारी धाडले. त्यानंतर केकेआरची टॉप आर्डर स्वस्तात माघारी गेल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरवर डाव सावरण्याचा मोठी जबाबदारी होती. मात्र वानंदू हसरंगाने त्याला 13 धावांवर बाद करत केकेआरला मोठा धक्का दिला. त्यानंतर हसरंगाने केकेआरच्या सुनिल नारायण आणि शेल्डन जॅक्सन यांना 9 व्या षटकाच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर पाठोपाठ बाद केले. यामुळे केकेआरची अवस्था 6 बाद 67 अशी झाली.
केकेआरने हसरंगाच्या फिरकीपुढे नांगी टाकल्यानंतर हर्षल पटेल, आकाश दीप यांनी केकेआरची शेपूट लवकरात लवकर गुंडाळण्याचे मिशन सुरू केले. मात्र केकेआरची शेवटची जोडी वरूण चक्रवर्ती (10) आणि उमेश यादव (18) यांनी प्रतिकार करत दहाव्या विकेटसाठी 27 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे केकेआर 128 धावांपर्यंत मजल मारू शकला. अखेर आकाश दीपने उमेश यादवचा त्रिफळा उडवत केकेआरच्या शेवटच्या जोडीची फडफड संपवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.