IPL 2023 DC vs CSK : चार वेळा विजेता ठरलेला चेन्नई सुपर किंग्सचा संघ आज दिल्ली कॅपिटल्सशी दोन हात करणार आहे. याप्रसंगी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात मैदानात उतरणारा चेन्नई सुपर किंग्सचा संघ दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल.
या विजयामुळे त्यांना आयपीएलच्या यंदाच्या मोसमात प्ले-ऑफसाठी पात्र ठरता येणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर फेकला गेला आहे, पण या स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी डेव्हिड वॉर्नरचा संघ घरच्या मैदानावर सर्वस्व पणाला लावेल.
चेन्नईने १३ सामन्यांमधून ७ लढतींमध्ये विजय मिळवले आहेत. त्यांचा संघ १५ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईने दिल्लीला पराभूत केल्यास त्यांना १७ गुणांची कमाई करता येणार आहे. तसेच अशा परिस्थितीत त्यांचा प्ले-ऑफमधील प्रवेशही पक्का होणार आहे, पण विजयानंतर त्यांचा संघ दुसऱ्या स्थानावर राहतो की तिसऱ्या स्थानावर त्यांची घसरण होतेय, याचे उत्तर लखनौ-कोलकता यांच्यामधील लढतीच्या निकालानंतर मिळणार आहे. चेन्नईप्रमाणेच लखनौचेही १५ गुण झाले आहेत. लखनौने कोलकताला पराभूत केल्यास चेन्नई व लखनौ यांच्यामधील सरस नेट रनरेट असणारा संघ दुसऱ्या स्थानावर राहील.
दिल्लीतील फिरोज शाह कोटला स्टेडियमची खेळपट्टी संथ आहे. गोलंदाजांचे चेंडू थांबून फलंदाजांपर्यंत पोहचत आहेत. चेन्नईच्या फलंदाजांसाठी ही खेळपट्टी पोषक आहे. डेव्होन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे यांनी निर्णायक क्षणी चेन्नईसाठी धावा उभारल्या आहेत. रवींद्र जडेजा, अंबाती रायुडू, मोईन अली यांना फलंदाजीत अद्याप मोठी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे या तिघांना आज होणार असलेल्या महत्त्वाच्या लढतीत खेळ उंचवावा लागणार आहे.
चेन्नईचा गोलंदाजी विभाग तगडा आहे. दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पथिराना, माहीश तीक्षणा यांनी प्रभावी गोलंदाजी केली आहे. रवींद्र जडेजा व मोईन अली हे दोघेही फलंदाजीत अपयशी ठरले असले तरी गोलंदाजीत त्यांनी बाजू सांभाळली आहे. जडेजा, तीक्षणा व मोईन या तीन फिरकी गोलंदाजांवर चेन्नईची मदार असेल.
उशिरा गवसला फॉर्म
दिल्लीच्या संघाला पहिल्या पाचही लढतींत हार पत्करावी लागली; पण त्यानंतर झालेल्या आठ सामन्यांमधून पाच सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला. मात्र ‘प्ले-ऑफ’च्या शर्यतीतून त्यांचा संघ बाहेर गेला. फलंदाज व गोलंदाजांचे अपयश, तसेच क्षेत्ररक्षणात केलेल्या चुका दिल्लीला महागात पडल्या. डेव्हिड वॉर्नरचा संघ प्रतिष्ठा राखण्यासाठी चेन्नईविरुद्धच्या लढतीत मैदानात उतरेल यात शंका नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.