Abhishek Porel Batting in PBKS vs DC: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील (IPL 2024) दुसरा सामना पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळवला जात आहे. हा सामना पंजाबमधील मुल्लनपूर येथील क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात अभिषेक पोरेलने आक्रमक फलंदाजी करत सर्वांना प्रभावित केले.
या सामन्यात 18 वे षटक सुरू झाले, तेव्हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली संघाने 138 धावांवरच सातवी विकेट गमावली होती. त्यामुळे दिल्लीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केलेल्या रिकी भूईच्या जागेवर अभिषेक पोरेलचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून समावेश करत त्याला नवव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले.
दिल्लीची ही चाल फायदेशीर ठरली. त्यानेही इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आपली छाप पाडली. त्याने 18 व्या षटकात 3 चेंडूचा सामना करताना एका चौकारासह 6 धावा केल्या. 19 व्या षटकात त्याला एकच चेंडू खेळण्याची संधी मिळाली, यावर त्याने एकेरी धाव घेतली. याच षटकात पंजाबच्या आर्शदीपने सुमीत कुमारला बादही केले होते.
त्यामुळे 19 व्या षटकातपर्यंत दिल्लीच्या खात्यात 8 बाद 149 धावा होत्या. मात्र, अखेरच्या षटकात अभिषेकने गिअर बदलला.
20 व्या षटकात पंजाबकडून गोलंदाजी करायला आलेल्या हर्षल पटेलवर पोरेलने हल्लाबोल केला. त्याने पहिल्या चेंडूवर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार मारला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने खणखणीत षटकार मारला. इतक्यावरच पोरेल थांबला नाही, तर त्याने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरही चौकार वसूल केले, तर पाचव्या चेंडूवर स्क्वेअर लेगला षटकार ठोकला.
मात्र शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेताना कुलदीप यादव धावबाद झाला. त्यामुळे पोरेलने या षटकात तब्बल 25 धावा काढल्या. त्याच्या या आक्रमणामुळे दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 174 धावा केल्या. पोरेल 10 चेंडूत 32 धावांवर नाबाद राहिला.
दरम्यान शनिवारी होत असलेल्या या सामन्यात दिल्लीकडून पोरेलव्यतिरिक्त केवळ शाय होपलाच 30 धावांचा टप्पा पार करता आला. त्याने 33 धावा केल्या. पंजाबकडून हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
पोरेलच्या या फटकेबाजीमुळे अनेकांना 2021 मध्ये रविंद्र जडेजाने हर्षल पटेलविरुद्ध केलेली फटकेबाजी आठवली. 2021 आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून जडेजाने हर्षल पटेलविरुद्ध 37 धावा काढल्या होत्या.
झाले असे की त्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडून हर्षल पटेल खेळत होता. विशेष म्हणजे तो चांगल्या फॉर्ममध्येही होता. त्यावेळी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात 20 व्या षटकात जडेजाने त्याच्याविरुद्ध पहिल्या दोन चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर त्याने तिसरा चेंडू नो-बॉल टाकला, त्यावरही जडेजाने षटकार ठोकला.
महत्त्वाचे म्हणजे नो-बॉलमुळे परत टाकाव्या लागलेल्या तिसऱ्या अधिकृत चेंडूवरही जडेजाने षटकार मारला होता. त्यानंतरच्या शेवटच्या तीन चेंडूत जडेजाने दोन, षटकार आणि चौकार अशा धावा वसूल केल्या होत्या. त्यामुळे या षटकात तब्बल 37 धावा निघाल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.