आयपीएल 2024 स्पर्धेतील 64 वा सामना मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात झाला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने 19 धावांनी विजय मिळवला.
हा दिल्लीचा सातवा विजय होता. त्यामुळे त्यांचे आता 14 गुण झालेले असल्याने दिल्लीचे प्लेऑफच्या शर्यतीतील आव्हान कायम राहिले आहे. पण हा त्यांचा अखेरचा साखळी सामना होता. त्यामुळे आता त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.
लखनौ संघासमोरील अडचणी मात्र वाढल्या आहेत. हा त्यांचा 7 वा पराभव ठरला. दरम्यान, त्यांचा आणखी एक साखळी सामना बाकी आहे. त्यामुळे त्यांना 14 गुणांपर्यंत पोहचण्याची संधी आहे. मात्र असे असले तरी त्यांना बाकी संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल.
दरम्यान, या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 208 धावा केल्या होत्या. त्यामुळे लखनौसमोर विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौला 20 षटकात 9 बाद 189 धावाच करता आल्या.
एकीकडून अर्शद खान आक्रमक खेळत असताना 19 व्या षटकात रबी बिश्नोई दुसरी धाव घेताना धावबाद झाला. त्याने 2 धावा केल्या. जॅक फ्रेझर-मॅकगर्कने डायरेक्ट थ्रो करत त्याला बाद केले. त्यानंतरही अर्शदने लखनौला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु लखनौला 20 षटकात 9 बाद 189 धावाच करता आल्या. त्यामुळे लखनौला 19 धावांनी पराभूत व्हावे लागले.
लखनौकडून अर्शद खानने 33 चेंडूत 58 धावांची नाबाद खेळी केली. तसेच नवीन-उल-हक 2 धावांवर नाबाद राहिला.
दिल्लीकडून इशांत शर्माने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच खलील अहमद, अक्षर पटेल, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
एकीकडे विकेट जात असताना अर्शदने मात्र आक्रमक खेळ केला. त्याने 25 चेंडूत अर्धशतक केले. त्यामुळे लखनौच्या आशा फुलल्या आहेत. त्याच्या अर्धशतकामुळे लखनौने 18 षटकात 180 धावा केल्या.
पुरनची विकेट गमावल्यानंतर कुलदीप यादवने कृणाल पांड्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्याच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने पांड्याला 18 धावांवर यष्टीचीत केले. त्यानंतर मात्र अर्शद खानने युधवीर सिंगला साथीला घेत आक्रमक खेळ केला होता. त्यामुळे लखनौच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र युधवीरला खलील अहमदने 17 व्या षटकात 14 धावांवर बाद केले.
निकोलस पूरनची झुंज मुकेश कुमारने संपवली. त्याने 12 व्या षटकात पूरनला बाद केलं. त्याने टाकलेल्या आखुड टप्प्याच्या चेंडूवर पूरनने मोठा फटका खेळला, परंतु कव्हर्सला असलेल्या अक्षर पटेलने त्याचा झेल घेतला. पूरनने 27 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकार मारले.
निकोलस पूरनने दुसऱ्या बाजूने जात असलेल्या विकेट्सचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर होऊ दिला नाही. त्याने आक्रमक खेळताना 20 चेंडूतच अर्धशतक झळकावलं. त्यामुळे पाच विकेट्स लवकर गमवावे लागले तरी 9 षटकात लखनौने 80 धावांचा टप्पा ओलांडला.
एकिकडे विकेट जात असताना दुसरीकडून निकोलस पूरनने आक्रमक पवित्रा स्विकारला आणि लखनौचा डाव पुढे नेला. मात्र याचदरम्यान आयुष बडोनीनेही स्वस्तात विकेट गमावली. तो 8 व्या षटकात ट्रिस्टन स्टब्सच्या गोलंदाजीवर गुलबदिन नायबकडे झेल देत बाद झाला. तो 6 धावांवर बाद झाला. बडोनी लखनौच्या 5 व्या विकेटच्या रुपात माघारी परतला आहे. 8 षटकात लखनौचे 5 बाद 73 धावा झाल्या.
इशांत शर्माने सुरुवातीला शानदार गोलंदाजी केली. त्याने त्याच्या तिसऱ्या, तर डावाच्या 5 व्या षटकात दीपक हुड्डालाही पायचीत केले. त्याने हुड्डाला भोपळाही फोडू दिला नाही. ही त्याची तिसरी विकेट ठरली. तसेच हुड्डा लखनौच्या चौथ्या विकेटच्या रुपात बाद झाला.
केएल राहुल आणि क्विंटन डी कॉकला इशांत शर्माने पहिल्या तीन षटकातच माघारी धाडल्यानंतर अक्षर पटेलने मार्कस स्टॉयनिसचा अडथळा दूर केला.
विशेष म्हणजे चौथ्या षटकात गोलंदाजीला आलेल्या अक्षरने पहिल्याच चेंडूवर स्टॉयनिसला चकवले आणि ऋषभ पंतने चपळाईने त्याला यष्टीचीत केले. स्टॉयनिसने 5 धावा केल्या.
केएल राहुल बाद झाल्यानंतर क्विंटन डी कॉक आणि मार्कस स्टॉयनिसने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तिसऱ्या षटकात इशांत शर्माने डी कॉकचा अडथळा दूर केला. त्याने त्याला 12 धावांवरच बाद केले. त्याचा झेलही मुकेश कुमारनेच घेतला.
दिल्लीने दिलेल्या 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी लखनौकडून कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक सलामीला फलंदाजीसाठी उतरले. मात्र पहिल्याच षटकात इशांत शर्माने लखनौला मोठा धक्का दिला. त्याने केएल राहुलला 5 धावांवर बाद केले. केएल राहुलचा झेल मुकेश कुमारने घेतला.
ऋषभ पंतच्या विकेटनंतर ट्रिस्टन स्टब्सने आक्रमक पवित्रा स्विकारला. त्याने शेवटच्या तीन षटकात चौकार षटकारांची बरसात केली. त्याने 22 चेंडूत अर्धशतक केले. याबरोबरच त्याच्या या तुफानी फटकेबाजीमुळे दिल्लीने 20 षटकात 4 बाद 208 धावा केल्या.
त्यामुळे आता लखनौसमोर विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य असेल. स्टब्स 25 चेंडूत 57 धावा करून नाबाद राहिला. त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच अक्षर पटेल 10 चेंडूत 14 धावांवर नाबाद राहिला.
लखनौकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या, तर अर्शद खान आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दिल्लीच्या 17 व्या षटकात नवीन-उल-हकने ऋषभ पंतचा अडथळा दूर केला. पंतचा झेल दीपक हुडाने पकडला. त्यामुळे पंत 33 धावा करून बाद झाला. त्याने ही खेळी 23 चेंडूत 5 चौकारांसह केली.
अभिषेक पोरेलने शाय होप बाद झाल्यानंतरही चांगल्या लयीत खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याला 12 व्या षटकात नवीन-उल-हकने बाद केले. त्याचा झेल निकोलस पूरनने घेतला. त्यामुळे अर्धशतक केल्यानंतर अभिषेकला माघारी परतावे लागले. त्याने 33 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 58 धावा केल्या.
अभिषेक पोरेल आणि शाय होप यांची भागीदारी चांगली रंगली होती. त्यांनी जवळपास 10 च्या धावगतीने धावा जमवल्या होत्या. मात्र 9 व्या षटकात रवी बिश्नोईने शाय होपला बाद करत त्यांची जोडी तोडली.
होपचा झेल केएल राहुलने घेतला. खरंतर होपने कव्हरच्या दिशेने खेळलेल्या शॉटवर केएल राहुलकडून पहिल्यांदा चेंडू हातून सुटला, मात्र नंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने अचूक चेंडू झेलला. त्यामुळे होपला 27 चेंडूत 38 धावा करून माघारी परतावे लागले.
फ्रेझर-मॅकगर्क बाद झाल्यानंतर अभिषेक पोरेलने शाय होपच्या साथीने दिल्लीचा डाव पुढे नेला. या दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारीही झाली. अभिषेकने आक्रमक खेळताना चौकार-षटकारांची बरसात करत अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे लखनौने 8 षटकातच 80 धावांचा टप्पा पार केला.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या दिल्लीकडून जॅक फ्रेझर-मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांनी डावाची सुरुवात केली. परंतु, पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर फ्रेझर-मॅकगर्कला अर्शद खानने नवीन-उल-हकच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे फ्रेझर एकही धाव न करता पॅव्हेलियनमध्ये परतला.
दिल्ली कॅपिटल्स: अभिषेक पोरेल, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, शाय होप, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, गुलबदिन नायब, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद
इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - इशांत शर्मा, कुमार कुशाग्र, प्रवीण दुबे, स्वस्तिक चिकारा, ललित यादव
लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, कृणाल पांड्या, युधवीर सिंग चरक, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान
इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - मणिमारन सिद्धार्थ, देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, प्रेरक मंकड, कृष्णप्पा गॉथम
आयपीएल २०२४ स्पर्धेतील ६४ वा सामना मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात होत आहे. या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी लखनौने प्लेइंग इलेव्हनमध्ये युधवीर सिंग आणि अर्शद खान यांना संधी दिली आहे.
तसेच दिल्लीकडून कर्णधार ऋषभ पंतचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे. गेल्या सामन्यात षटकांच्या गती तिसऱ्या कमी राखल्याने त्याला बंदीला सामोरे जावे लागले होते. तसेच पंत व्यतिरिक्त दिल्लीकडून गुलबदिन नायबला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.
Delhi Capitals vs Lucknow Super Giants: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) स्पर्धेतील 64 वा सामना मंगळवारी (14 मे) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात रंगणार आहे. दिल्लीच्या घरच्या मैदानात अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल.
दरम्यान, दिल्लीचा हा अखेरचा साखळी सामना आहे, तर लखनौचा साखळी फेरीतील 13 वा सामना आहे. दोन्ही संघ संघांचे सध्या 12 गुण आहेत. त्याचमुळे प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.
दिल्ली जर या सामन्यात पराभूत झाले, तर त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात येईल. तसेच जर लखनौला पराभवाचा धक्का बसला, तर त्यांचे आव्हान अधिकृतरित्या संपणार नसले, तरी त्यांच्यासमोरील प्लेऑफसाठीची आव्हाने आणखी कठीण होतील.
सध्या दिल्लीने 13 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत आणि 7 सामने पराभूत झाले आहेत. तसेच लखनौने 12 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत आणि 6 पराभूत झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.