आयपीएल 2024 स्पर्धेतील 56 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेला. घरच्या मैदानात झालेल्या या सामन्यात दिल्लीने 20 धावांनी विजय मिळवला.
हा विजय दिल्लीसाठी महत्त्वाचा ठरला. कारण आता दिल्लीने या विजयासह 12 सामन्यांतील 6 व्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांचे आता 12 गुण झाले असून ते पाँइंट्स टेबलमध्ये 5 व्या क्रमांकावर पोहचले आहेत.
दरम्यान, पराभवानंतरही राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. हा त्यांचा 11 सामन्यांमधील केवळ तिसरा, तर सलग दुसरा पराभव होता.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकात 8 बाद 221 धावा केल्या होत्या. त्यामुळे राजस्थानसमोर विजयासाठी 222 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला 20 षटकात 8 बाद 201 धावाच करता आल्या.
राजस्थानला विजयासाठी शेवटच्या दोन षटकात 37 धावांची गरज होती. पण तीनच विकेट शिल्लक होत्या. त्यातही रसिक सलामने 19 व्या षटकात केवळ 8 धावा दिल्या. त्यामुळे अखेरच्या 6 षटकात 29 धावा असे समीकरण राजस्थान समोर होते.
मात्र दुसऱ्याच चेंडूवर मुकेश कुमारने रोवमन पॉवेलला त्रिफळाचीत केले. तसेच या षटकात त्यानेही केवळ 8 धावा दिल्या. त्यामुळे दिल्लीने हा सामना 20 धावांनी जिंकला.अखेरीस ट्रेंट बोल्ट 2 धावांवर आणि आवेश खान 7 धावांवर नाबाद राहिले.
दिल्लीकडून गोलंदाजीत खलील अहमद, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेल आणि रसिक सलाम यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादवने 18 व्या षटकात राजस्थानला दुहेरी धक्का दिला. त्याने पहिल्या चेंडूवर फेरेराला 1 धावेवरच बाद केले, तर शेवटच्या चेंडूवर आर अश्विनला 2 धावावंर बाद केले. त्यामुळे राजस्थानने 18 व्या षटकापर्यंत 7 विकेट्स गमावल्या आहेत.
सॅमसन बाद झाल्यानंतर शुभम दुबेने आक्रमक पवित्रा स्विकारला. पण त्याला 17 व्या षटकात खलील अहमदने बाद केले. त्याने 12 चेंडूत 25 धावांची खेळी केली.
अर्धशतकानंतरही संजू सॅमसनने आपली लय कायम ठेवताना शतकाच्या दिशेने वाटचाल सुरु केली होती. त्याला शुभम दुबे चांगली साथ देत होता. त्यामुळे 15 षटकाच्या आतच राजस्थानने 150 धावांचा टप्पा पार केला होता.
परंतु सॅमसनला 16 व्या षटकात मुकेश कुमारने बाद केले. त्याचा अप्रतिम झेल बाऊंड्री लाईनवर शाय होपने घेतला. त्यामुळे सॅमसन 46 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांसह 86 धावांवर बाद झाला.
संजू सॅमसनने एका बाजूने चांगली झुंज देत 28 चेंडूत अर्धशतक केले. त्यामुळे त्याने राजस्थानच्या विजयाच्या आता पल्लवित केल्या आहेत. त्याला पराग बाद झाल्यानंतर शुभम दुबे साथ देण्यासाठी आला आहे. दरम्यान, सॅमसनने अर्धशतक करण्याबरोबरच राजस्थानने 100 धावांचा टप्पा पार केला आहे.
राजस्थानचे दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर रियान परागने सॅमसनला चांगली साथ दिली होती. दरम्यान, दिल्लीच्या गोलंदाजांनी नंतर सॅमसनला काहीवेळ आक्रमण करण्यापासून थांबवले. याचदरम्यान, रियानला रसिख सलामने 11 व्या षटकात त्रिफळाचीत केले. रियानने 22 चेंडूत 27 धावा केल्या.
जैस्वाल बाद झाल्यानंतर राजस्थानचा डाव बटलरसह कर्णधार संजू सॅमसनने सावरला. सॅमसनने आक्रमक खेळ केला. त्यामुळे सॅमसन आणि बटलर यांनी अर्धशतकी भागीदारीही केली. पण ही भागीदारी अखेर अक्षर पटेलने तोडली. त्याने 6 व्या षटकात बटलरला 19 व्या षटकात त्रिफळाचीत केले.
राजस्थानकडून 222 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीला जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वाल उतरले. पहिल्याच चेंडूवर जैस्वालने चौकार ठोकला. मात्र, दुसऱ्याच चेंडूवर त्याला खलीलने अक्षर पटेलच्या हातून झेलबाद केले. जैस्वालने 4 धावा केल्या.
अखेरच्या काही षटकांमध्ये ट्रिस्टन स्टब्सने आक्रमक फलंदाजी केली होती. त्याने त्याने शेवटच्या षटकात पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकारही मारले होते. पण त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर संदीप शर्माने त्याला पायचीत केले.
स्टब्सने 20 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 41 धावांची खेळी केली. दरम्यान डावाच्या शेवटच्या चेंडूवर रसिख सलाम 9 धावबाद झाला. त्यामुळे दिल्लीच्या 20 षटकात 8 बाद 221 धावा झाल्या. आता राजस्थानसमोर विजयासाठी 222 धावांचे लक्ष्य असेल.
राजस्थानकडून गोलंदाजीत आर अश्विनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
पंत बाद झाल्यानंतर दिल्लीचा डाव ट्रिस्टन स्टब्स आणि गुलबदिन नायबने सांभाळला होता. परंतु गुलबदिनला 19 व्या षटकात 19 धावांवर ट्रेंट बोल्टने बाद केले.
पोरेलने अर्धशतक केल्यानंतरही चांगला खेळ केला होता. मात्र त्याला आर अश्विनने 13 व्या षटकात संदीप शर्माच्या हातून झेलबाद केले. पोरेलने 36 चेंडूत 65 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 3 षटकार मारले.
त्यानंतर ऋषभ पंतला 14 व्या षटकात युजवेंद्र चहलने बाद केले. पंतचा झेल ट्रेंट बोल्टने पकडला. पंतने 15 धावा केल्या. पंतची विकेट चहलसाठी ऐतिहासिक ठरली. ही त्याची टी20 कारकिर्दीतील 350 वी विकेट ठरली. तो 350 टी20 विकेट्स घेणारा भारताचा पहिलाच गोलंदाज बनला.
एकीकडून विकेट गेल्या असल्या, तरी दुसरी बाजू अभिषेक पोरेलने चांगल्याप्रकारे सांभाळली. त्याने 28 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने 11 षटकांच्या आतच दिल्लीला 120 धावांचा टप्पा पार करून दिला.
दोन विकेट्स गेल्यानंतर दिल्लीचा डाव पोरेलसह अक्षर पटेलने सांभाळला होता. त्यांनी संघाला 100 धावांचा टप्पाही पार करून दिला. परंतु, अश्विनने ही जोडी तोडली. त्याने अक्षरला 10 व्या षटकात बाद केले. त्याचा झेल रियान परागने पकडला. अक्षरने 15 धावा केल्या.
फ्रेझर-मॅकगर्क बाद झाल्यानंतर सहाव्या षटकात शाय होप धावबाद झाला. संदीप शर्माने टाकलेल्या या षटकातील पहिल्या चेंडूवर अभिषेक पोरेलने सरळ शॉट खेळला, यावेळी धाव काढण्यासाठी नॉन-स्ट्रायकरला असलेला होप थोडा पुढे आला होता.
त्याचवेळी संदीने सरळ येणाऱ्या चेंडूला स्पर्श केला, तो चेंडू स्टंपवर जाऊन आदळला. त्यावेळी होप मागे फिरला होता, मात्र बेल्स उडेपर्यंत तो क्रिजमध्ये न पोहचल्याने त्याला 1 धावेवर धावबाद व्हावे लागले.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्लीकडून सलामीला जॅक फ्रेझर-मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल उतरले. एक बाजू पोरेलने सांभाळलेली असताना फ्रेझर-मॅकगर्कने आक्रमण केले. त्याने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक केले. यावेळी त्याने 7 चौकार आणि 3 षटकार मारले.
मात्र अर्धशतकानंतर लगेचच पाचव्या षटकात आर अश्विनने त्याला फुलटॉस टाकून बाद केले, त्याचा झेल कव्हरला डोनोवन फरेराने पकडला. मॅकगर्कने 20 चेंडूत 50 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर शाय होप फलंदाजीला आला.
दिल्ली कॅपिटल्स: जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाय होप, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, गुलबदिन नायब, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद
इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - रसिक दार सलाम, प्रवीण दुबे, ललित यादव, सुमित कुमार, कुमार कुशाग्रा
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, डोनोवन फरेरा, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - जोस बटलर, कुलदीप सेन, टॉम कोहलर-कॅडमोर, तनुष कोटियन, कुणाल सिंग राठोड
आयपीएल 2024 स्पर्धेतील 56 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी राजस्थानने प्लेइंग इलेव्हनमध्ये ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायरऐवजी शुभम दुबे आणि डोनोवन फरेरा यांना संधी दिली आहे. तसेच दिल्ली संघानेही दोन बदल केले अशून त्यांच्या संघात इशांत शर्माचे पुनरागमन झाले आहे. तसेच गुलबदीन नायबलाही संधी देण्यात आली आहे.
त्यामुळे या सामन्यातून गुलबदिन नायब आणि डोनोवन फरेरा हे दोघेजण आयपीएल पदार्पण करत आहेत.
Delhi Capitals vs Rajasthan Royals: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 56 वा सामना मंगळवारी (7 मे) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना होणार आहे. हा सामना दिल्लीच्या घरच्या मैदानावर अरुण जेटली स्टेडियमवर होणार होता.
प्लेऑफसाठी आव्हान कायम ठेवण्यासाठी दिल्लीला विजय आवश्यक आहे. त्यांनी आत्तापर्यंत 11 सामन्यांतील 5 सामन्यांत विजय आणि 6 सामन्यांत पराभव स्विकारला आहे.
तसेच राजस्थान रॉयल्सचे प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्के आहे, परंतु अद्याप अधिकृतपणे ते प्लेऑफला पात्र ठरलेले नाही. पण जर त्यांनी या सामन्यात विजय मिळवला, तर मात्र त्यांचे प्लेऑफमधील स्थान पक्के होईल. राजस्थानने 10 सामन्यांमधील 8 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर 2 सामन्यात पराभव स्विकारला आहे.
दरम्यान, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आत्तापर्यंत 28 सामने आयपीएलमध्ये खेळवण्यात आले आहेत. त्यातील 13 सामने दिल्लीने जिंकले आहेत, तर 15 सामने राजस्थानने जिंकले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.