अहमदाबाद : आजच्या सामन्यापूर्वी तळाच्या स्थानावर असलेल्या गुजरातने गतविजेत्या चेन्नईची प्लेऑमधील वाटचाल खडतर केली आहे. शतकवीर शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या द्विशतकी सलामीच्या जोरावर २३१ धावा उभारणाऱ्या गुजरातने चेन्नईचा ३५ धावांनी पराभव केला.
या पराभवानंतरही चेन्नईचा संघ चौथ्या स्थानावर कायम राहिला असला तरी प्लेऑफसाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामन्यात विजय आवश्यक आहे. अहमदाबादच्या याच मैदानावर गतवर्षी गुजरातचा पराभव करुन चेन्नईने पाचवे आयपीएल विजेतेपद मिळवले होते. यावेळी मात्र त्यांची गोलंदाजी सफशेल अपयशी ठरली.
२३२ धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी धडाकेबाज सलामी आवश्यक होती, परंतु चेन्नईची ३ बाद १० अशी अवस्था झाली. त्यानंतर डॅरेल मिचेल आणि मोईन अली यांनी अर्धशतके करत १०९ धावांची भागीदारी करुन पाठलाग कायम ठेवला होता. मोहित शर्माने या दोघांनाही बाद केल्यावर धोकादायक शिवम दुबेचीही विकेट मिळवली आणि चेन्नईचा पराभव निश्चित केला. याच मोहित शर्माच्या अखेरच्या षटकात जडेजाने चौकार मारुन गतवर्षी चेन्नईला विजेतेपद मिळवून दिले होते.
चेन्नईने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजी दिली, पण हा निर्णय चुकल्याचे काही षटकांतच त्यांच्या लक्षात आले कारण १७.२ षटकानंतर त्यांना पहिले यश मिळाले आणि तोपर्यंत गुजरातचे सलामीवी शुभमन गिल व साई सुदर्शन यांनी २१० धावांचा झंझावात सादर केला होता.
चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडचे सर्व पयत्न फोल ठरत होते. चौकार-षटकारांची आतषबाजीच या दोघांकडून सुरु होती. त्यांनी केलेल्या २१० धावांच्या सलामीनुसार गुजरातने अडीचशे धावा करणे शक्य होते. पण तुषार देशपांडेने एकाच षटकात गिल आणि साई सुदर्शन यांना बाद केले त्यानंतर पुढच्या १२ चेंडूत २१ धावाच करता आल्या.
संक्षिप्त धावफलक
गुजरात :२० षटकात : ३ बाद २३१ (साई सुदर्शन १०३ - ५१ चेंडू, ५ चौकार, ७ षटकार, शुभमन गिल १०४ - ५५ चेंडू, ९ चौकार, ६ षटकार, तुषार देशपांडे ४-०-३३-२)
चेन्नई : २० षटकांत ८ बाद १९६ (डॅरेल मिचेल ६३ - ३४ चेंडू, ७ चौकार, ३ षटकार, मोईन अली ५६ - ३६ चेंडू, ४ चौकार, ४ षटकार, महेंद्रसिंग धोनी नाबाद २६ - ११ चेंडू, १ चौकार ३ षटकार, राशीद खान ४-०-३८-२, मोहित शर्मा ४-०-३१-३)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.