IPL 2024 MI vs RR : मुंबईचा आणखी एक पराभव ; राजस्थान प्ले ऑफच्या दिशेने,यशस्वीचे शतकी पुनरागमन

मुंबई इंडियन्सच्या संघाला आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. यजमान राजस्थान रॉयल्सने संदीप शर्माची (५/१८) प्रभावी गोलंदाजी व यशस्वी जयस्वालच्या (नाबाद १०४ धावा) झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर नऊ विकेट राखून दणदणीत विजय साकारला.
IPL 2024 MI vs RR
IPL 2024 MI vs RRsakal
Updated on

जयपूर : मुंबई इंडियन्सच्या संघाला आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. यजमान राजस्थान रॉयल्सने संदीप शर्माची (५/१८) प्रभावी गोलंदाजी व यशस्वी जयस्वालच्या (नाबाद १०४ धावा) झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर नऊ विकेट राखून दणदणीत विजय साकारला. राजस्थानने सातव्या विजयासह प्ले ऑफच्या दिशेने शानदार पाऊल टाकले. मुंबईचा पाचवा पराभव ठरला.

मुंबईकडून राजस्थानसमोर १८० धावांचे आव्हान ठेवण्यात आले. जॉस बटलर व यशस्वी जयस्वाल या सलामीवीरांनी ७४ धावांची भागीदारी करताना नेत्रदीपक फटके मारले. राजस्थानचा संघ फलंदाजी करीत असताना पावसाचा व्यत्ययही आला. बटलर नेहमीच्या आक्रमक शैलीत फलंदाजी करीत होता; पण पियूष चावलाच्या गोलंदाजीवर तो ३५ धावांवर त्रिफळाचीत झाला.

त्यानंतर यशस्वी व कर्णधार संजू सॅमसन या जोडीने नाबाद १०९ धावांची भागीदारी करताना राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सुमार फॉर्ममधून जात असलेल्या यशस्वीने या मोसमात शतकी खेळीने पुनरागमन केले. त्याने ६० चेंडूंमध्ये नऊ चौकार व सात षटकारांसह नाबाद १०४ धावांची खेळी साकारली. आयपीएलमधील हे त्याचे दुसरे शतक होय. सॅमसनने नाबाद ३८ धावांची खेळी केली.

दरम्यान, याआधी मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रेंट बोल्टने रोहित शर्माला सहा धावांवर बाद केल्यानंतर संदीप शर्माने इशान किशन (०) व सूर्यकुमार यादव (१० धावा) या प्रमुख फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मुंबईची अवस्था चौथ्या षटकात तीन बाद २० धावा अशी झाली. युझवेंद्र चहलने मोहम्मद नबीला २३ धावांवर तंबूत पाठवत मुंबईला चौथा धक्का दिला.

९९ धावांची भागीदारी

तिलक वर्मा व नेहल वधेरा या जोडीने मुंबईसाठी मोलाची कामगिरी बजावली. दोघांनी ९९ धावांची शानदार भागीदारी केली. बोल्टने ४९ धावा करणाऱ्या वधेराला बाद करीत जोडी तोडली. आवेश खानच्या गोलंदाजीवर हार्दिक पंड्या दहा धावांवर बाद झाला. त्याचा सुमार फॉर्म कायम राहिला. तिलकने ४५ चेंडूंमध्ये ६५ धावांची खेळी साकारली. या खेळीत त्याने पाच चौकार व तीन षटकार मारले. संदीप शर्माने त्याला बाद करीत झुंज मोडून काढली. मुंबईने २० षटकांत नऊ बाद १७९ धावा केल्या. संदीप शर्माने १८ धावा देत पाच फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स - २० षटकांत ९ बाद १७९ धावा (तिलक वर्मा ६५, मोहम्मद नबी २३, नेहल वधेरा ४९, संदीप शर्मा ५/१८) पराभूत वि. राजस्थान रॉयल्स १८.४ षटकांत १ बाद १८३ धावा (जॉस बटलर ३५, यशस्वी जयस्वाल नाबाद १०४ - ६० चेंडू, नऊ चौकार, सात षटकार, संजू सॅमसन नाबाद ३८).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.