IPL 2024 Playoffs Race Rcb Vs Dc : तिसऱ्या सामन्यातही निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे रिषभ पंतवर आर्थिक दंडाची आणि एका सामन्याच्या बंदीची कारवाई करण्यात आली, त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत आजच्या आयपीएल सामन्यात दिल्ली संघाला फॉर्मात आलेल्या बंगळूर संघाविरुद्ध खेळावे लागणार आहे.
प्रत्येकी १२ सामने झालेल्या दिल्ली आणि बंगळूर संघात दोन गुणांचे अंतर आहे. दिल्लीचा संघ १२ गुणांसह पाचव्या तर बंगळूरचा संघ १० गुणांसह सातव्या स्थानावर आहे. आज विजयी होणाऱ्या संघासाठी प्लेऑफच्या आशा कायम रहाणार आहे. त्यातल्या त्यात दिल्लीला अधिक संधी आहे; परंतु रिषभ पंतची अनुपस्थिती त्यांच्या मुळावर आणि बंगळूर संघाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी बंगळूरचा संघ तळाच्या स्थानावर होता; परंतु विराट कोहलीच्या सातत्यपूर्ण खेळी आणि गोलंदाजीतील प्रगती यामुळे त्यांनी सलग चार सामने जिंकले. सध्याच्या गुणतक्त्यानुसार राजस्थान, कोलकता आणि हैदराबाद हे तीन संघ प्लेऑफमध्ये निश्चित असू शकतील, त्यामुळे चौथ्या स्थानासाठी दिल्ली, बंगळूर, लखनौ आणि चेन्नई या चार संघांत चुरस आहे.
आयपीएलच्या अंतिम टप्प्यात जोर पकडणाऱ्या बंगळूरने गुजरातला दोनदा त्यानंतर पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघाला प्रत्येकी एकदा पराभूत केले आहे, त्यामुळे वाढलेला आत्मविश्वास ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. यंदा सर्वाधिक ६३४ धावा करणाऱ्या विराट कोहलीच्या फॉर्ममुळे बंगळूर संघातील प्रत्येक खेळाडूची देहबोली बदलली आहे.
कोहली सातत्याने धावा करत असला तरी त्याच्या स्ट्राईक रेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते; परंतु गेल्या सामन्यात त्याचे शतक थोडक्यात हुकले असले तरी त्याच्या स्ट्राईक रेट १५३ एवढा होता. कोहलीच्या परिणाकारक फलंदाजीमुळे कर्णधार फाफ डुप्लेसी, रजत पाटिदार, कॅमेरून ग्रीन आणि दिनेश कार्तिकही चांगल्या धावा करत आहेत. या फलंदाजांना खलिल अहमद (१४ विकेट), मुकेश कुमार (१५) हे वेगवान गोलंदाज आणि कुलदीप यादव व अक्षर पटेल कसे रोखणार हे महत्त्वाचे आहे.
बंगळूर संघाच्या फलंदाजीचा प्रश्न नव्हता, गोलंदाजी ही त्यांची कमकुवत बाजू होती; परंतु गेल्या काही सामन्यांपासून मोहम्मद सिराज कमालीचा प्रभावी मारा करत आहेत त्याचे यॉर्करही अचूक होत आहे. आता त्याला यश दयाल आणि स्वप्नील सिंग यांची मिळणारी साथ बंगळूरसाठी मोलाची ठरत आहे; परंतु त्यांची उद्या रिषभ पंत नसला तरी परीक्षा जॅक फ्रेझर मॅकगर्कसमोर होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा हा फलंदाज एकट्याने सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता बागळून आहे. तो जेवढा अधिक खेळपट्टीवर राहील तेवढा अधिक धोका बंगळूरसाठी असेल. त्यामुळे फ्रेझरचा झंझावात कसा रोखला जाईल, यावर बंगळूरच्या गोलंदाजीचे भवितव्य अवलंबून असेल.
रिषभ पंतच्या अनुपस्थितीत कोणाला संधी दिली जाते, हे महत्त्वाचे आहे; परंतु अभिषक पोरेल, त्रिस्टन स्चब्स यांनाही फलंदाजीचा भार वाहावा लागणार आहे.
पंतने ३० लाखही गमावले
रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी तर करण्यात आली; परंतु त्याचबरोबर ३० लाखांचा दंडही करण्यात आला. त्याचबरोबर संघातील इंपॅक्ट खेळाडूसह सामन्यात खेळलेल्या सर्व खेळाडूंना प्रत्येकी १२ लाख किंवा ५० टक्के सामना मानधन कपात यापैकी कमी असलेल्या रकमेचा दंड करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.