Rajasthan Royals vs Punjab Kings : राजस्थान रॉयल्स संघाने यंदाच्या आयपीएल मोसमात आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. मात्र, तरीही त्यांना प्ले ऑफमध्ये अधिकृतपणे प्रवेश करता आलेला नाही. राजस्थानच्या दोन लढती बाकी असून आज (ता. १५) त्यांना पंजाबशी सामना करावयाचा आहे. या लढतीत विजय मिळवून राजस्थान प्ले ऑफमध्ये सन्मानाने पोहोचण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करील. पंजाबचा संघ मात्र उर्वरित दोन लढतींत प्रतिष्ठा राखण्यासाठी मैदानात उतरताना दिसणार आहे.
राजस्थानच्या उर्वरित दोन लढती गुवाहाटी येथे होणार आहेत. हे राजस्थानचे होम ग्राऊंड आहे. रियान पराग याचेही हे घरचे मैदान आहे. पराग याने यंदाच्या आयपीएल मोसमात १२ सामन्यांमधून चार अर्धशतकांसह ४८३ धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने १५३.८२च्या स्ट्राईक रेटने धावा फटकावल्या आहेत. आगामी टी-२० विश्वकरंडकासाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नसले तरी त्यानंतर भारत जी टी-२० मालिका खेळेल त्यामध्ये त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. घरच्या मैदानावर त्याच्याकडून चमकदार खेळ करण्याच्या आशा आणखीन उंचावणार आहेत.
कर्णधार संजू सॅमसन (४८६ धावा) व रियान पराग यांच्यामुळे फलंदाजीचा स्तर उंचावला आहे. त्यामुळे जॉस बटलर (३५९ धावा) व यशस्वी जयस्वाल (३४४ धावा) यांच्याकडून छान फलंदाजी झाल्यानंतरही मोठे समाधान मिळालेले नाही. तरीही सॅमसन, पराग, बटलर व जयस्वाल या चौघांच्या जबरदस्त फॉर्ममुळे राजस्थानचा संघ कात टाकत आहे. इंग्लंडचे खेळाडू प्ले ऑफमध्ये खेळताना दिसणार नाहीत. याचा मोठा फटका राजस्थानला बसणार आहे. कारण बटलर सलामीला फलंदाजी करीत असून राजस्थानच्या वाटचालीत त्याने मोलाचा वाटा उचलला आहे.
राजस्थानचा गोलंदाजी विभागही तेवढाच भक्कम आहे. ट्रेंट बोल्ट सुरुवातीला, तर संदीप शर्मा अखेरच्या षटकांमध्ये प्रभावी गोलंदाजी करीत आहेत. रवीचंद्रन अश्विन व युझवेंद्र चहल हे अनुभवी फिरकी गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांवर अंकुश गाजवत आहेत. आवेश खानही गरज असतानाच अचूक टप्प्यात गोलंदाजी करीत आहे.
पंजाबचा कर्णधार कोण?
शिखर धवन दुखापतीमुळे बाहेर आहे. सॅम करन राजस्थानविरुद्धच्या लढतीनंतर टी-२० विश्वकरंडकासाठी इंग्लंडच्या संघाशी जोडला जाणार आहे. अशा परिस्थितीत सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत पंजाबच्या नेतृत्वपदी कोण असेल, असा प्रश्न याप्रसंगी उभा ठाकला आहे. हर्षल पटेल व शशांक सिंग या दोघांपैकी एकाकडे पंजाबचे नेतृत्व सोपवण्यात येण्याची दाट शक्यता आहे.
पराभवाचा धक्का देणार...
पंजाबच्या संघाचे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र, उर्वरित दोन लढती त्यांच्या बाकी आहेत. याप्रसंगी त्यांच्याकडून राजस्थान व हैदराबादला पराभवाचा धक्का मिळणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पंजाबकडून पराभूत झाल्यास राजस्थान, हैदराबाद या दोन्ही संघांचा पाय खोलात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.