IPL 2024 RCB vs CSK: बेंगळुरूनं करून दाखवलं! चेन्नईला पराभूत करत मिळवलं प्लेऑफचं तिकीट

IPL 2024 RCB vs CSK Scorecard Updates: आयपीएल 2024 स्पर्धेतील 68 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध विजय मिळवत प्लेऑफमधील प्रवेश पक्का केला.
RCB | IPL 2024
RCB | IPL 2024X/IPL
Updated on

Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings:

आयपीएल 2024 स्पर्धेत 68 वा सामना शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने 27 धावांनी विजय मिळवला. बेंगळुरूचा हा 14 सामन्यांतील 7 वा विजय ठरला. त्यामुळे त्यांचे 14 पाँइंट्स झाले.

दरम्यान चेन्नईचा हा 7 वा पराभव होता. त्यामुळे त्यांचेही 14 पाँइंट्स आहेत. परंतु, बेंगळुरूचे चेन्नईला नेट रन रेटच्याबाबत मागे टाकले आणि पाँइंट्स टेबलमधील चौथे स्थान निश्चित केले. त्यामुळे बेंगळुरू आयपीएल 2024 प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरला आहे.

या सामन्यात बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 218 धावा केल्या. त्यामुळे चेन्नईसमोर विजयासाठी 219 धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने 20 षटकात 7 बाद 191 धावा केल्या.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूनं करून दाखवलं! चेन्नईला पराभूत करत मिळवलं प्लेऑफचं तिकीट

धोनी आणि जडेजाने शेवटच्या 5 षटकात आक्रमक खेळ केला. अखेरच्या षटकाच चेन्नईला विजयासाठी 35 धावांची गरज होती, तर प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी 17 धावांची गरज होती.

यावेळी धोनीने पहिल्या चेंडूवर षटकार मारला. परंतु, पुढच्या चेंडूवर धोनी 25 धावांवर बाद झाला. त्यानंतर शेवटच्या 2 चेंडूत 10 धावांची गरज होती. मात्र यश दयालने शेवटच्या ५ चेंडूत अप्रतिम गोलंदाजी केली. त्यामुळे चेन्नईला 20 षटकात 7 बाद 191 धावाच करता आल्या.

त्यामुळे चेन्नईला 27 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह बेंगळुरूने प्लेऑफमध्येही प्रवेश केला. अखेरीस रविंद्र जडेजा 22 चेंडूत 42 धावांवर नाबाद राहिला.

बेंगळुरूकडून यश दयालने 2 विकेट्स घेतल्या, तर ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन, कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

चेन्नईने या सामन्यात नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. पाचव्या विकेटनंतर रविंद्र जडेजाने मिचेल सँटेनरसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, सँटेनरला मोहम्मद सिराजने 15 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद केले. सँटेनरचा अफलातून झेल डू प्लेसिसने घेतला.

सँटेनरने मारलेल्या शॉवर डू प्लेसिसने वर उडी मारत उजव्या हाताने झेल घेतला. त्यामुळे सँटेनरला 3 धावांवरच मागे फिरावे लागले. त्यामुळे 16व्या षटकात एमएस धोनी फलंदाजीला उतरला.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईचा निम्मा संघ गारद; रचिन पाठोपाठ शिवम दुबेही आऊट

अर्धशतकानंतरही रचिन चांगल्या लयीत होता. मात्र 13 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. त्याने 37 चेंडूत 61 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले. तो बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात शिवम दुबे बाद झाला. त्याला कॅमेरॉन ग्रीनने बाद केले. 7 धावांवर त्याचा झेल लॉकी फर्ग्युसनने घेतला.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

एका बाजूने विकेट जात असतानाही रचिन रविंद्रने आपला खेळ कायम केला. त्याने 12 व्या षटकात लॉकी फर्ग्युसनविरुद्ध षटकार ठोकत अर्धशतक केले. त्याचे हे आयपीएलमधील पहिले अर्धशतक ठरले.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: लॉकी फर्ग्युसनने तोडली रचिन-रहाणेची पार्टनरशीप, चेन्नईला तिसरा धक्का

सुरुवातीला मोठे धक्के बसल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा डाव रचिन रविंद्र आणि अजिंक्य रहाणेने सांभाळला होता. त्यांनी अर्धशतकी भागीदारीही केली. पण अखेर त्यांची जोडी लॉकी फर्ग्युसनने तोडली. त्याने रहाणेला बाद केले. फाफ डू प्लेसिसने त्याचा झेल घेतला. त्यामुळे रहाणेला 22 चेंडूत 33 धावा करून माघारी परतावे लागले.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

चेन्नई सुपर किंग्ससाठी सुरुवात खराब झाली आहे. चेन्नईने पहिल्याच चेंडूवर ऋतुराजची विकेट गमावल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेला डॅरिल मिचेलही स्वस्तात बाद झाला. त्याला 4 धावांवर यश दयालने बाद केले. त्याचा शानदार झेल विराट कोहलीने घेतला.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला पहिल्याच चेंडूवर तगडा झटका! कर्णधार ऋतुराज गायकवाड गोल्डन डकवर बाद

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने दिलेल्या 219 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाड आणि रचिन रविंद्र सलामीला फलंदाजीला उतरले. मात्र पहिल्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलने ऋतुराज गायकवाडला बाद केले. ऋतुराज शुन्यावर बाद झाला. त्याचा झेल यश दयालने घेतला.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूच्या फलंदाजांचा आक्रमक अंदाज, चेन्नईसमोर ठेवलं 219 धावांचं लक्ष्य

रजत पाटिदार बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिकने फलंदाजीला येत छोटेखानी परंतु आक्रमक खेळी केली. त्याने 6 चेंडूत 14 धावांची खेळी करत बेंगळुरूला 200 धावांच्या पार नेलं. पण त्याला 19 व्या षटकात तुषार देशपांडेने बाद केले. त्याचा झेल धोनीने घेतला.

त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलनेही आक्रमक खेळ केला. पण तोही शेवटच्या षटकात 5 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. अखेरीस बेंगळुरूने 20 षटकात 5 बाद 218 धावा केल्या. त्यामुळे चेन्नईसमोर २१९ धावांचे लक्ष्य असणार आहे. बेंगळुरूकडून कॅमेरॉन ग्रीन 17 चेंडूत 38 धावा करून नाबाद राहिला.

चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने 2 विकेट्स घेतल्या, तसेच तुषार देशपांडे आणि मिचेल सँटेनरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूने गमावली तिसरी विकेट! आक्रमक खेळणारा रजत पाटिदार आऊट, अर्धशतकही हुकलं

डू प्लेसिस बाद झाल्यानंतर रजत पाटिदार आणि कॅमेरॉन ग्रीन यांची जोडी जमली होती. त्यांनी आक्रमक खेळ केला. मात्र 18 व्या षटकात रजत पाटिदारने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याच झेल बाऊंड्री लाईन जवळ डॅरिल मिचेलने पकडला. त्यामुळे तो 23 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांसह 41 धावांवर बाद झाला.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

फाफ डू प्लेसिस चांगल्या फॉर्ममध्ये खेळत असताना त्याने अर्धशतकही केले. मात्र तो 13 व्या षटकात दुर्दैवीरित्या धावबाद झाला. या षटकात शेवटच्या चेंडूवर रजत पाटिदारने सरळ शॉट खेळला. त्यावेळी फाफ डू प्लेसिस धाव घेण्यासाठी पुढे येत होता.

याचवेळी गोलंदाजी करणाऱ्या मिचेल सँटेनरने चेंडू आडवण्याचा प्रयत्न केलेला असताना चेंडूला त्याचा स्पर्श झाला आणि चेंडू स्टंपला धडकला. यावेळी मागे फिरलेल्या डू प्लेसिसची बॅट अगदी थोड्या अंतराने हवेत होती. त्यामुळे त्याला धावबाद देण्यात आले. तो 39 चेंडूत 54 धावा करून बाद झाला.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराट आऊट, पण फाफ डू प्लेसिसचा चेन्नईला अर्धशतकी दणका

विराट कोहली बाद झाल्यानंतर बेंगळुरुच्या फलंदाजीची जबाबदारी डू प्लेसिसने खांद्यावर घेतली होती. त्यानेही काही चांगले शॉट्स खेळले. त्याने 35 चेंडूत अर्धशतक केले.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटचं अर्धशतक हुकलं! तुफानी फटकेबाजीनंतर सँटेनरनं धाडलं माघारी

पावसाच्या व्यत्ययानंतरही पुन्हा सामना सुरु झाल्यानंतरही विराट कोहलीने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता. मात्र, त्याचा अडथळा अखेर मिचेल सँटेनरने दूर केला. त्याने 10 व्या षटकात टाकलेल्या चौथ्या चेंडूवर विराटने मोठा फटका खेळला.

मात्र डॅरिल मिचेलने लाँग ऑनला बाऊंड्री लाईन जवळ चांगला झेल घेतला. त्यामुळे विराट 29 चेंडूत 47 धावा करून बाद झाला. त्याने या खेळीदरम्या 3 चौकार आणि 4 षटकार मारले.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

पावसामुळे काही काळासाठी हा सामना थांबला होता. मात्र, काहीवेळातच पाऊस थांबल्याने सामन्याला पहिल्या डावातील चौथ्या षटकापासून पुन्हा सुरुवात झाली. एकही षटकाचा खेळ कमी करण्यात आलेला नाही. बेंगळुरूकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस फलंदाजीला उतरले, तर चौथ्या षटकात चेन्नईकडून महिश तिक्षणाने गोलंदाजी केली.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी डावाची सुरुवात केली. विराटने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्विकारला होता.

मात्र, 3 षटकांनंतर पावसाला सुरुवात झाल्याने सामना थांबवण्यात आला. सामना थांबला, तेव्हा बेंगळुरूने ३ षटकात बिनबाद 31 धावा केल्या. विराट 9 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांसह 19 धावांवर नाबाद आहे. तसेच डू प्लेसिस 1 चौकार आणि 1 षटकारासह 12 धावांवर नाबाद आहे.

जाणून घ्या बेंगळुरू-चेन्नईची प्लेइंग-11

चेन्नई सुपर किंग्स - रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महिश तिक्षणा

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - शिवम दुबे, समीर रिझवी, प्रशांत सोळंकी, शेख रशीद, मुकेश चौधरी

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - स्वप्नील सिंग, अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार वैशाख, हिमांशू शर्मा

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; दोन्ही संघात झाले मोठे बदल

आयपीएल 2024 स्पर्धेत 68 वा सामना शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना होत आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी चेन्नई आणि बेंगळुरु संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल झाला आहे. चेन्नईने प्लेइंग इलेव्हनमध्ये मोईन अलीच्या जागेवर मिचेल सँटेनरला संधी देण्यात आली आहे. तसेच बेंगळुरूने विल जॅक्सच्या जागेवर ग्लेन मॅक्सवेलला संधी दिली आहे.

Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 68 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात शनिवारी (18 मे) खेळवला जाणार आहे. हा दोन्ही संघांचा यंदाच्या हंगामातील अखेरचा साखळी सामना आहे. हा सामना बेंगळुरूच्या घरच्या मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण प्लेऑफमध्ये प्रवेश करणारे चार संघ आधीच निश्चित झाले आहेत. त्यामुळे प्लेऑफसाठी आता एकच जागा शिल्लक असून चेन्नई आणि बेंगळुरू या दोनच संघांना ही जागा मिळवण्याची संधी आहे.

या सामन्यात जर चेन्नईने कोणत्याही फरकाने विजय मिळवला, तरी ते प्लेऑफमध्ये थेट प्रवेश करतील. तसेच बेंगळुरूला प्लेऑफमध्ये जागा मिळवायची असेल, तर त्यांना चेन्नईविरुद्ध 18 धावांनी किंवा 11 चेंडू राखून विजय मिळवावा लागणार आहे.

दरम्यान, असं असलं तरी शनिवारी बेंगळुरूमध्ये पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. सध्या देखील तिथे ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे जर या सामन्यातही पावसाचा अडथळा आला आणि सामना रद्द झाला, तर चेन्नई प्लेऑफसाठी 15 पाँइंट्ससह पात्र ठरतील, तर बेंगळुरूचे आव्हान संपेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com