बंगळूर - रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि लखनौ सुपर जायंटस् यांच्यामध्ये उद्या आयपीएलमधील लढत बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभूत झाल्यानंतर आता पुन्हा विजयपथावर येण्यासाठी यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा संघ प्रयत्न करताना दिसेल. लखनौ सुपर जायंटस् संघ तिसऱ्या विजयासाठी सर्वस्व पणाला लावेल.
बंगळूर संघाने सलामीच्या लढतीत मुंबईचा धुव्वा उडवला. त्यानंतर कोलकाताविरुद्ध २०४ धावांचा पाठलाग करताना बंगळूरच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती व सुयश शर्मा या फिरकी गोलंदाजांसमोर त्यांची डाळ शिजली नाही. १२३ धावांमध्येच त्यांचा डाव गडगडला.
बंगळूरला कर्णधार फाफ ड्युप्लेसी व विराट कोहली या दोनच फलंदाजांवर अवलंबून राहून चालणार नाही. वनिंद हसरंगा हा श्रीलंकेसाठी खेळत आहे, तर जोश हेझलवूड याला दुखापत झाली आहे. त्यामुळे गोलंदाजी विभागातही बंगळूरला अपयश येत आहे. हसरंगा व हेझलवूड हे दोघेही या आठवड्यात बंगळूर संघाशी जोडले जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मात्र मोहम्मद सिराज व हर्षल पटेल या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत अव्वल दर्जाची गोलंदाजी करणे आवश्यक आहे.
वूड, आवेश तंदुरुस्त होण्याची प्रतीक्षा
लखनौ संघाने ७ एप्रिलला झालेल्या लढतीत हैदराबादला हरवले. या लढतीत मार्क वूड व आवेश खान ही जोडगोळी खेळली नाही. वूडला ताप आला होता, तर आवेशला दुखापत झाली होती. या लढतीत कृणाल पंड्या, रवी बिश्नोई व अमित मिश्रा या फिरकी गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करीत लखनौला विजय मिळवून दिला; पण वूड व आवेश हे तंदुरुस्त होणे गरजेचे आहे. कारण त्यांच्याकडे अनुभव आहे. लखनौला गरज असताना त्यांचा उपयोग होऊ शकतो. दरम्यान, कर्णधार राहुल, काईल मेयर्स व निकोलस पुरन यांच्याकडून समाधानकारक फलंदाजी झाली असून दीपक हुडा, मार्कस स्टॉयनीस यांना आपला खेळ उंचवावा लागणार आहे.
आजची आयपीएल लढत
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर वि. लखनौ सुपर जायंटस्
स्थळ - बंगळूर
वेळ - सायंकाळी ७.३० वाजता
प्रक्षेपण - स्टार स्पोर्टस्
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.