मुंबई - मागील लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा धुव्वा उडवणारा मुंबई इंडियन्सचा संघ उद्या वानखेडे या घरच्या स्टेडियमवर गतविजेत्या गुजरात टायटन्सचा सामना करणार आहे.
याप्रसंगी पाच वेळा विजेता ठरलेला मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या आयपीएल मोसमातील गुणतक्त्यात १६ गुणांसह अव्वल स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्सला रोखण्याचा प्रयत्न करील. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मैदानात उतरणारा गुजरात टायटन्सचा संघ या वेळी नवव्या विजयासह प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल.
मुंबईने ११ पैकी ६ लढतींमध्ये विजय मिळवले असले, तरी या संघांमध्ये काही कमकुवत बाजू आहेत. कर्णधार रोहित शर्माला मागील पाच लढतींमध्ये एकेरी धावांवर बाद व्हावे लागले आहे. त्याला मागील पाच डावांमध्ये २, ३, ०, ०, ७ अशा धावा करता आल्या आहेत. सूर्यकुमार यादव (३७६ धावा), इशान किशन (३३५ धावा), तिलक वर्मा (२७४ धावा), कॅमेरुन ग्रीन (२७४ धावा) यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे रोहितचे अपयश पुसले जात आहे;
पण यापुढील सर्व महत्त्वाच्या लढतींमध्ये त्यालाही आपली जबाबदारी ओळखून खेळ करावा लागणार आहे. मुंबईचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचल्यास तो या संघाचे प्रतिनिधीत्व करील की नाही, हाही प्रश्न निर्माण होणार आहे. कारण जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना ७ जूनपासून सुरू होणार आहे.
त्याआधी टीम इंडियासोबत त्याला रहावे लागणार आहे. मुंबईला रोहितच्या फलंदाजी फॉर्मसह आणखी एक चिंता सतावत आहे. मुंबईच्या गोलंदाजांकडून अव्वल दर्जाची कामगिरी होत नाही आहे. पियूष चावला या अनुभवी फिरकी गोलंदाजाने ११ सामन्यांमधून १७ फलंदाज बाद केले आहेत; पण इतरांना ठसा उमटवता आलेला नाही.
जेसन बेहरेनडॉर्फ, रायली मेरेडीथ, अर्शद खान, कुमार कार्तिकेय यांना उद्या गुजरातच्या फलंदाजांना रोखावे लागणार आहे. शुभमन गिल, रिद्धिमान साहा, हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर हे सर्व फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. मुंबईविरुद्ध प्रतिस्पर्धी २०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करताना दिसत आहेत. मुंबईच्या गोलंदाजांना वेळीच सावध व्हावे लागणार आहे.
अफगाण गोलंदाजांची षटके महत्त्वाची
मुंबई संघाचे फलंदाज तुफान फॉर्ममध्ये आहेत. मुंबई - गुजरातमधील लढतीतही त्यांच्या फलंदाजांवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. गुजरातकडून मुंबईच्या फलंदाजांना रोखण्याची योजना तयार करण्यात आली असेल.
मोहम्मद शमी, मोहित शर्मा हे गुजरातचे गोलंदाज फॉर्ममध्ये आहेत; पण राशीद खान व नूर अहमद या दोन अफगाणिस्तानातील फिरकी गोलंदाजांची प्रत्येकी चार षटके महत्त्वाची ठरणार आहेत.
पहिल्या लढतीतील विजय आत्मविश्वास उंचावणारा
गुजरातने यंदाच्या मोसमातील साखळी फेरीच्या पहिल्या लढतीत मुंबईवर ५५ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. या विजयामुळे उद्याच्या लढतीआधी गुजरात संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल. त्यामुळे सध्या तरी उद्याच्या लढतीत दोन्ही संघांना विजयाची समसमान संधी असे म्हटले जात असले, तरी हार्दिक पंड्याच्या संघाचे पारडे किंचित जड असणार आहे.
आजची लढत
मुंबई - गुजरात
स्थळ - मुंबई
वेळ - संध्याकाळी
७.३० वाजता
प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.