मोहाली : फाफ डुप्लेसी इम्पॅक्ट खेळाडू झाल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचे नेतृत्व करत असलेल्या विराट कोहलीने संघाची गाडी पुन्हा विजय पथावर आणली. आज झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सचा त्यांनी २४ धावांनी पराभव केला.
या सामन्यासाठी विराट कोहली नाणेफेकीस आला. हा क्षण सर्वांसाठी धक्कादायक होता; परंतु डुप्लेसी इम्पॅक्ट खेळाडू असल्यामुळे आपण ही जबाबदारी सांभाळली असल्याचे त्याने स्पष्ट केले. इतकेच नव्हे, तर डुप्लेसीसह शतकी सलामी देऊन संघाच्या विजयाचा पाया रचला.
बंगळूरने २० षटकांत ४ बाद १७४ धावा केल्या. या आव्हानासमोर अडखळती सुरुवात झालेल्या पंजाबने अखेरपर्यंत किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला; परंतु भरवशाचे फलंदाज अपयशी ठरल्याने त्यांची लढत तोकडी पडली. (Latest Sport News)
अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट आणि लिएम लिव्हिंगस्टोन एकेरी धावांत बाद झाल्यामुळे पंजाबची अवस्था ३ बाद २७ अशी झाली होती. त्यानंतर हरप्रीत सिंग आणि कर्णधार सॅम करन धावचीत झाल्याने त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली; परंतु सलामीमीर प्रभसिमरन सिंगने ३० चेंडूत ४६ धावा करून आव्हान कायम ठेवले होते.
अगोदरच्या सामन्यातील मॅचविनर शाहरूख खानही आज अपयशी ठरला. जितेश शर्माने एकाकी किल्ला लढवत ४१ धावा केल्या; परंतु तळ्याच्या फलंदाजांची त्याला साथ लाभली नाही.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळूरला विराट आणि डुप्लेसी यांनी चांगलीच आक्रमक सुरुवात करून दिली. बंगळूरचा संघ मोठी धावसंख्या उभारणार, असे चित्र होते. ते दोघे १६ व्या षटकापर्यंत मैदानावर होते; परंतु त्यानंतर बंगळूरचा संघ १७४ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
बंगळूर संघाने पहिल्या १० षटकांत बिनबाद ९१ धावा केल्या होत्या; मात्र पुढच्या षटकांत त्यांना ४ बाद ८३ अशी मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक :
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ः २० षटकांत ४ बाद १७४ (विराट कोहली ५९ - ४७ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, फाफ डुप्लेसी ८४ - ५६ चेंडू, ५ चौकार, ५ षटकार, अर्शदीप सिंग ४-०-३४-१, हरप्रीत ब्रार ३-०-३१-२, नॅथन एलिस ४-०-४१-१). वि. वि. पंजाब किंग्ज ः १८.२ षटकांत सर्वबाद १५० (प्रभसिमरन सिंग ४६ -३० चेंडू, ३ चौकार, ४ षटकार, जितेश शर्मा ४१ - २७ चेंडू, २ चौकार, ३ षटकार, मोहम्मद सिराज ४-०-२१-४, वानिंदू हसरंगा ४-०-३९-२).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.